प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
माझी मुलगी साधारण सहा महिन्यांची होती. माझे वय पंचवीसच्या आसपासचे. मुलीला बरे नव्हते म्हणून लहान मुलांच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो. हिवाळ्याचे दिवस होते. बऱ्यापैकी थंडी होती. माझ्याकडे एका कडेवर मुलगी होती आणि दुसऱ्या हातात मोठी अवाढव्य कमरेपर्यंत जाणारी पिशवी. आमचा नंबर आल्याचे कंपाऊंडरने सांगितले, तसे मी तिला घेऊन आत गेले. मुलीला डॉक्टरांच्या समोरच्या टेबलावर बसवले. डॉक्टरांनी तपासायला घेतले आणि मला प्रश्न विचारला, “तुम्ही अंगात स्वेटर घातलेला आहे आणि मुलीला एका छोट्याशा फ्रॉकवर तुम्ही घेऊन आलात? त्यात तिला तापही आहे.”
मी म्हटले, “नाही डॉक्टर, मी तिला कोट घातला होता पण तिनंच काढून टाकायला सांगितला. डॉक्टर प्रसन्न हसले आणि म्हणाले, “द्या तो कोट.” कोट हातात घेऊन डॉक्टरांनी तो न्याहाळला आणि ते म्हणाले, “किती छान कोट आहे. तिला काय मलाही घालायला आवडेल. ती का बरं नाकारेल?” मग त्यांनी स्वतःच तो तिच्या अंगावर चढवला आणि दोन मिनिटे काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिले. ती पण त्यांच्याकडे मोठे मोठे डोळे करत पाहत राहिली. मग माझ्याकडे बघून म्हणाले, “ही तर काहीच बोलत नाही. तुमच्याशी कशी काय बोलली? मी उसने हसत म्हणाले, “म्हणजे तिनं रडारड केली. हात जोराजोराने खाली-वर केले. मला वाटलं की तिला तो कोट नको आहे. ती काढायला सांगत आहे. म्हणून मी तो काढला. डॉक्टर म्हणाले, “आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की तिला काय आवश्यक आहे, हे आपल्याला माहीत असायला हवं ना?”
यावरून मी एक धडा शिकले. तिला बोलता येत नव्हते तोपर्यंत ठीक होते; परंतु ती बोलायला लागल्यावरही, जेव्हा केव्हा मुलीने एखाद्या गोष्टीसाठी नकार दिला तर मी तिला समजावून एखादी गोष्ट करायला सांगायची मग ती कपड्यांबाबत असो किंवा खाण्याबाबत किंवा आणखी कशाबाबत!
हे ठीकच परंतु समाजाचे काय करायचे? कोणत्याही आईला जणू सल्ले देण्याचा समाजाने ठेकाच घेतलेला असतो. अलीकडे डॉक्टर लहान मुलांना ‘काजळ लावायचे नाही’ असे सांगतात. एखाद्या वेळेस बाळाच्या दोन्ही आज्या हे समजूनही घेतील पण त्या घरातील इतर नातेवाईक ‘काजळ कसे महत्त्वाचे आहे. वर्षांनुवर्षे आपण कसे लावत आलेलो आहोत. तुलासुद्धा कसे लावले होते वगैरे सांगयला लागतात.’ ‘कानानाकात तेल घालायचे नाही’ असे डाॅक्टर सांगतात पण मालिशला येणारी बाई हमखास बाळाच्या काना-नाकात तेल टाकतेच आणि वरून शाळेची पायरीही न चढलेली ती बाई आपल्याला सल्लाही देते की या तेलाचे काय महत्त्व आहे. त्या तरुण आईला काही कळतच नाही, काय करावे ते!
पूर्वी बाळाच्या बाबतीत जे काही करत होते ते बरोबरच होते, असे जुन्या लोकांना वाटणे स्वाभाविक आहे; परंतु अलीकडच्या काळात काजळ असो वा तेल असो वा आणखी काही, पदार्थ हे शुद्ध स्वरूपात मिळत नाहीत. त्यात अशी काही भेसळ असते की त्याचा फायदा बाळाला होतच नाही उलट त्यामुळे त्याचे फार मोठे नुकसान होते. त्याला संसर्ग (इन्फेक्शन) होते. आणखी काहीबाही. तरुण आई आपल्या परिवारातील वा बाहेरच्या कोणालाही, त्यांच्या वय ज्येष्ठतेमुळे काहीच बोलू शकत नाही. तिला डॉक्टरांचे ऐकावे की येता-जाता सल्ले देणाऱ्यांचे, कळतच नाही. तिची चिडचिड होते. लहान मुले तर सारखीच आजारी पडत असतात. ती कधी डॉक्टरांचे ऐकायचा प्रयत्न करते तर कधी घरातल्यांचे!
असे म्हटले जाते की एकत्रित कुटुंबात वाढणारी मुले संस्कारक्षम होतात, हे मला पटण्यासारखे आहे कारण मीही एकत्र कुटुंबाचा भाग होते. मुलीला वाढवताना मला सोपे गेले. घरातल्या ज्येष्ठांच्या अनुभवाचा मला तरी नक्कीच फायदा झाला. याचा अर्थ १०० टक्के आनंदी आनंद असतो, असा मी काही दावा करत नाही. याचीही मला एक गंमत सांगावीशी वाटते.
कितीही नाही म्हटले तरी घरात लहान मूल आहे, म्हटल्यावर त्या घरात येणारा प्रत्येक जण आठवणीने चॉकलेट घेऊन येतोच! त्यामुळे लहान मुले मोठ्या प्रमाणात चॉकलेट खातात. एकदा सासूबाई चारीधाम यात्रेसाठी निघाल्या तेव्हा त्यांनी एक मोठी कॅडबरी माझ्या मुलीसाठी आणली. मी नाराजीने त्यांना म्हटले, “इतर लोकं देतात, आपण त्यांना काही बोलू शकत नाही. घरातल्यांनी तरी तिला चॉकलेट द्यायला नको.”
आम्ही काय बोलतोय याच्याशी मुलीला काहीच घेणे-देणे नव्हते तिने चॉकलेटचे रॅपर उघडले आणि मस्त खायला सुरुवात केली. आम्हा दोघींकडे प्रेमाने पाहत हसून सासूबाई म्हणाल्या,
“अगं हेच वय आहे तिचं चॉकलेट खाण्याचं, मग काय माझ्या वयाची झाल्यावर ती चॉकलेट खाणार?”
‘चॉकलेटचे तर जाऊ दे, साधे गोड पदार्थांकडे पाहिल्यावरच माझा मधुमेह वाढतो’, असा स्वतःवर विनोद करणाऱ्या सासूबाईंच्या वक्तव्यावर मी काय बोलणार?
थोड्याफार फरकाने सगळीकडे हेच चालू असते. संसारात जसा सुवर्णमध्य शोधायचा असतो तसाच समाजात वावरतानाही तो शोधत राहावा लागतो, बस इतके लक्षात घ्या म्हणजे बाळाबरोबर आईचीही सर्वांगीण वाढ होईल!