कोकणी बाणा – सतीश पाटणकर
रांगणा गडाच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य कुडाळ तालुक्यातील नारूर येथील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराला प्राचीन इतिहास आहे. नारूर गावापासून तालुक्याचे ठिकाण कुडाळ सुमारे २२ कि.मी. अंतरावर आहे. रांगणा गडाच्या पायथ्याशीच नारूर गाव वसले असून पूर्वी बैलगाडीतूनच व्यापारी आपल्या मालाची ने-आण या गडावरूनच करीत असत. या इतिहासाला १ हजार वर्षांहून अधिक काळ उलटला आहे.
मध्ययुगीन काळात चालुक्य राजवटीचे महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीचे संरक्षण करण्याची जबाबदारी यादवांवर होती. यासाठी त्यांनी सह्याद्रीच्या भागात अनेक गडकिल्ले उभारले. महालक्ष्मीच्या या प्रांगणात सह्याद्रीच्या रांगांमध्ये रांगणागडही असाच उभा झाला आहे. विशेष म्हणजे या रांगणागडावरही रांगणाई (महिषासूरमर्दिनी)चे प्राचीन मंदिर आहे. मारुती, महादेव यांची प्राचीन शिल्पेही येथे पाहायला मिळतात. शिलाहारातील गडरादित्यानंतर विजयादित्य इ.स. ११४० मध्ये गादीवर आला. त्याचा पुत्र राजा महामंडलेश्वर भोज दुसरा शिलाहार शाखेतील शेवटचा राजा. याने इ.स. ११८७ च्या आसपास रांगणागडाची निर्मिती केली. हे शिलाहार राजे महालक्ष्मीचे भक्त होते. हे सर्व सांगायची गरज म्हणजे या राजाने कोल्हापूरची महालक्ष्मी अंबामाता, महासरस्वतीचे मंदिर बांधले. त्यानंतर बहामणी राजा महंमद गवाण याने १४७० मध्ये रांगणा गड जिंकून घेतला. १६५८ पर्यंत हा गड आदिलशहाच्या ताब्यात होता. त्यानंतर १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून रांगणागड जिंकून घेतला; परंतु पुन्हा एकदा १६६६ मध्ये हा गड विजापूरकर यांच्या ताब्यात आला; परंतु राजांनी आपली जिद्द सोडली नाही आणि ५ सप्टेंबर १६६६ मध्ये त्यांनी पुन्हा तो स्वराज्यात सामील करून घेतला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी इ. स. १६७०-७१ मध्ये किल्ल्याच्या डागडुजीसाठी सहा हजार खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे.
नारूरचे महालक्ष्मी पंचायतन आणि राजापूरजवळील आडीवरे येथील महाकाली मंदिर यामधील मूर्तींमध्ये कमालीचे सामर्थ्य आहे. या भागात शिलाहार राजांचे असलेले राज्य, त्यांची उपासना पद्धती, वैशिष्ट्यपूर्ण महाकाली, सरस्वती, लक्ष्मी, भैरव, रवळनाथ ही मंदिरे व मूर्ती पाहता कोकणातील देवस्थानांच्या पद्धती वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि ग्रामदेवतांचा संयोग
दिसून येतो.
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रांगणागडाच्या पायथ्याशी ‘नारूर’ हे गाव असून या गावात महालक्ष्मी हे प्रमुख ग्रामदैवत आहे; परंतु फार पूर्वी श्री देव लिंगेश्वर हे नारूर गावचे ग्रामदैवत होते असे तेथील जाणकारांच्या सांगण्यावरून कळते; परंतु कालांतराने हा मान महालक्ष्मीला मिळाला. श्री देवी महालक्ष्मी ही वैश्य समाजाची कुलदेवता असून या देवीची पूजा-अर्चा ब्राह्मणाकरवी केली जात असे. वैश्य समाजाने स्वतःच्या उन्नतीसाठी तसेच आर्थिक भरभराटीसाठी महालक्ष्मीची स्थापना केल्याचेही येथील ग्रामस्थांच्या सांगण्यावरून समजते. त्या काळात नारूर गावात वैश्य समाजाची वस्ती जास्त असल्याने गावातील गावकऱ्यांनी त्यांना मान देऊन सर्व अधिकार त्यांनाच दिले. त्यापूर्वी सर्व उत्सव श्री लिंगेश्वराच्या मंदिरात साजरे केले जात होते.
इ. स. १९०५ साली आलेल्या प्लेगच्या साथीने संपूर्ण गाव खालसा झाल; परंतु महालक्ष्मीच्या कृपेने पुन्हा या गावात वस्ती निर्माण झाली; परंतु त्यानंतर गावात ब्राह्मणाचे घर नसल्याने गावातील गावकरीच देवीची पूजा-अर्चा करू लागले; परंतु देवीला ती पूजा-अर्चा मान्य नसल्याने संचार रूपात येऊन तिने स्वतःच्या पूजे-अर्चेसाठी ब्राह्मणाची नियुक्ती करावयास सांगितले, तसेच त्यानंतर पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी देवीला कौल लावला गेला आणि त्याही वेळी देवीने तसेच सांगितले आणि त्यानुसार मग देवीच्या पूजे-अर्चेसाठी वालावल येथून भागवत कुटुंबीयांच्या पूर्वजांना देवीच्या पूजे-अर्चेसाठी नारूर येथे बोलविण्यात आले. तेव्हापासून आजतागायत श्री देवी महालक्ष्मीची पूजा-अर्चा त्यांच्याकडूनच पार पाडली जात आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)