हलकं फुलकं – राजश्री वटे
नामस्मरण करणे म्हणजे भगवंताचे नाव सतत घेणे, ध्यान लावणे, जप करणे असे नामस्मरण अनेक प्रकारे केले जाते, ईश्वर चिंतनी मन रमते, शांत होते व अध्यात्म्याची वाटचाल सुरू होते.
पण नामस्मरणाच्या आधीचा काळ… नाम म्हणजे नाव!
पाण्यातील असो. आयुष्याची असो किंवा व्यक्तीची ओळख असो…
चला, पहिले तर आयुष्याच्या नावेत बसून जन्मापासून मरणापर्यंत वाहणाऱ्या जीवनाची सैर करू…
बाळ जन्मला की, पाळण्यात ठेवून त्याचं “नाव’’ ठेवले जाते. पाण्यात कागदाची नाव करून खेळण्यात बालपण सरतं, “माझ्या नावाला काळिमा लागेल असे वागू नको’’ अशी धमकी बापाकडून शिस्तीत दिली जाते आणि त्या नावाला कसं समाजात स्थान द्यायचं याचे प्रयत्न ती व्यक्ती करत असते… आयुष्यभर!!
प्रत्येक नावाला वेगवेगळं स्थान मिळतं. एखाद्या नावाचा मोठा ‘नावलौकिक’ मिळतो तर एखाद्याचं नाव पार धुळीला मिळतं… हा एकदम विरोधाभास!
समाजात दुसऱ्यांना नावं ठेवणे हा संसर्गजन्य प्रघात आहे. एखाद्याला सवयच असते कोणाला नाव नाही ठेवले तर त्याचा दिवस डुबत नाही… खरं आहे ना!
नावात खूप काही दडलं आहे. ‘फार नाव ऐकलं हो त्याचं’ असं ठासून म्हणतात, यात सकारात्मक व नकारात्मक दोन्ही भाव येतात, बोलण्याचा सूर कसा आहे, हावभाव कसे आहेत त्यावरून “नाव’’ कशाप्रकारे प्रसिद्ध आहे हे नक्कीच ओळखता येतं.
लग्नामध्ये काय त्या नवरीचा ‘‘नाव घे, नाव घे’’ पिच्छा पुरवतात, ती कधीचीच त्याच्या नावाचा जप करत असते हे कळत असूनसुद्धा… जनरीत… दुसरं काय?
आयुष्याच्या चढाओढीत जगता जगता कधी नाव पैलतीरी जाते तर कधी ही नाव डुबते देखील!
नावात काय आहे हो… असं म्हणतात पण सगळं नावाभोवतीच फिरत असतं. प्रसिद्धी, बदनामी हे त्याचे रूपं आहेत. कोणाच्या नावाला हे मिळतं तर कोणाच्या नावाला ते मिळतं… नसीब की बात है!
आता, एखादं भांडण झालं तर नावावरच गदा येते पहिली… तावातावात बोलले जातं “नाव घेऊ नका समोर’’… किंवा ‘‘नाव टाकलं मी त्याचं’’… नाहीतर… “असं झालं नाहीतर नाव बदलून टाकीन स्वतःच’’…या अशा नावाआड धमक्या दिल्या जातात हो… मग कसं म्हणता येईल नावात काय आहे, त्यातच तर सर्व आहे… पटतंय ना…!!
“शंभर वर्ष आयुष्य’’ असं नाव घेताच हाजीर होणाऱ्याला म्हटलं जातं… आशीर्वाद ही दिला जातो, “ खूप नाव कमव’’… मोठं नाव होऊ दे’!!
पण असे आशीर्वाद काहींच्याच नशिबी सफलसंपूर्ण होतात. अगदी एखाद्याचं नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं… तर एखाद्याचं नाव रसातळाला जातं!
नाव घेतो तसं नाव दिलही जातं… पुस्तकाचे शीर्षक म्हणून आकर्षक नाव दिलं जातं… दुकानाच्या पाटीवर नावं असतात… रस्त्याला प्रसिद्ध व्यक्तीचं नावं दिलं जातं… बरंच काही असतं नावात…. नावाला डाग लागू नये म्हणून आयुष्यात बरंच काही जपावं लागतं, तसं वागावं लागतं…
नाव जपता जपता आयुष्याची नाव पैलतीरी पोहोचत असते… मग कशाला दुसऱ्यांना नाव ठेवण्यात वेळ व्यर्थ घालवायचा… नामस्मरण करायचं… भगवंताचं नाव घेत “ जप’’ करायचा… अन् पैलतीर गाठायचा!
ऐसी ही है जिंदगी…
नाम गुम जायेगा…
चेहरा ये बदल जायेगा…
मेरी शायरी ही पहचान है…
अगर याद रहे…