ज्यांच्या लिखाणातून, बोलण्यातून आपुलकीचा माणुसकीचा ओलावा जाणवतो, वाचकांच्या मनातील दंद्व शमून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, मनाची मलिनता दूर होऊन दु:खांवर हलकेच प्रेमळ सुखाची लहर झळकते. अशा या आठवणीतल्या माझ्या आवडत्या लेखिका, माणूसपण जपत १०० पुरस्कारांच्या मानकरी १६० पुस्तकांच्या लेखिका, त्यांना उदंड आयुष्य लाभो एवढीच वाढदिवसाच्या निमित्ताने परमेश्वराजवळ प्रार्थना…
पूनम राणे
‘टिंग टाँग’ दारावरची बेल वाजली, कोण आलाय इतक्यात, असं मनात म्हणतच दरवाजा उघडला. नमस्कार मॅडम, आत येऊ का? मला ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी आपल्याकडे पाठवले. या या असं म्हणत त्यांचे स्वागत केले. मी मुंबई शहर संपादक, विलास परुळेकर. वाड बाईंनी तुम्हांला माझ्या पेपरसाठी लिहायला सांगितले आहे. हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. एका ज्येष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिका, प्राध्यापिका यांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला लिहीत करण्यासाठी प्रत्यक्ष पेपरच्या संपादकांना घरी पाठवतात आणि संपादकही त्यांच्या सांगण्यानुसार माझ्या घरी येतात. खरंच दोघेही माझ्यासाठी देव माणसं आहेत. मनात राहून राहून नकळत विचार येतात… ‘‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती ’’ त्यानंतर जवळजवळ दोन वर्षे मी त्या पेपरमध्ये लिहीत राहिले आणि माझे पहिले पुस्तक कवडसे त्यांच्याच प्रस्तावनेसह त्यांच्याच ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकाशित झाले. पुस्तक नावाच्या पहिल्याच अपत्याचा जन्म आणि लेखिका म्हणून नवीन झालेला माझा जन्म याचे सारे श्रेय डॉ. विजया वाड यांचे आहे. दुसरी आठवण सांगायची म्हणजे गेल्याच वर्षी शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय स्वरचित काव्य लेखनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यभरातील साहित्यिकांकडून ५१ कविता जमा झाल्या होत्या. कवितेचे पुस्तक तयार करायचे होते, त्यातील एक-दोन कविता यमक अभावी घ्याव्यात की नाही असा विचार मनात चालू होता. अशावेळी डॉ. वाड यांना फोन केला, त्यांना कविता फोनवरून वाचून दाखवल्या आणि या कविता पुस्तकांमध्ये छापायला घ्याव्यात का असे विचारले, “त्या म्हणाल्या, अगं, कवी नवोदित आहेत,” जर आपण आपल्या पुस्तकात या कविता छापल्या नाहीत तर त्या दोघींना किती बरं वाईट वाटेल!” त्या कदाचित लिहीणं सोडून देतील. त्यामुळे ह्या कविता तू पुस्तकांमध्ये छापायला दे.’ माणूसपण जपणारे त्यांचे हे विचार आठवले की वाटतं, “आठवण आपली सांगताना, आमच्या शब्दांनी ही बहरून यावं
आपल्यातील माणूसपण टिपताना आमच्यातील माणूसपणही जाग व्हावं” बाल साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या, समोर पंचवीस हजार विद्यार्थी बसले होते, त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, “पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त वाचलेल्या एखाद्या गोष्टीच्या पुस्तकाचे नाव सांगा,” केवळ एकाच विद्यार्थिनीने हात वर करून पुस्तकाचे नाव सांगितले. मॅडमना खूप वाईट वाटले. त्यांनी विचारले, “आपण गोष्टींची पुस्तके का नाही वाचत? विद्यार्थ्यांमधून उत्तर आले की, आधुनिक युगात आम्हांला आवडतील अशी पुस्तके सध्या नाहीत?” कार्यक्रमावरून आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट त्यांची मुलगी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांना बोलून दाखवली आणि मग ठरवलं आपण राज्यभरातील साहित्यिकांना एकत्र करून सोळा-सोळा पानांची १५ ते २० मिनिटांत वाचून होणारी पुस्तक तयार करून घ्यावीत. “ही गोष्ट डॉ. निशिगंधा यांनी मनावर घेतली आणि ७६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १११ पुस्तकांचे प्रकाशन एकाच वेळेस, माजी महापौर मा. किशोरीताई पेडणेकर, यांच्या हस्ते झाले व महानगरपालिकेतील ७५ शाळांना प्रत्येकी शंभर पुस्तके मोफत देण्यात आली. यासाठी चार लाख रुपये खर्च डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्टने केले. मराठीतील सकस साहित्य, समृद्ध माणूस घडवू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. अशीच एक आठवण आठवते. एक कार्यक्रम संपवून मी त्यांच्यासोबत पवईच्या घरी गेले होते. बाबा..बाबा.. मी आले.. मी आले, असा आवाज दारावरून त्यांनी दिला, समोरून हसत आणि प्रसन्न मुद्रेने बाबा आले. त्यांनी दार उघडून त्यांना ये, ये असं म्हणत आमचं स्वागत केलं. मॅडम हात पाय धुवून फ्रेश झाल्या. दोघींनी छान चहा घेतला. गप्पा रंगात आल्या. “सांग बरं…कसा झाला तुझा कार्यक्रम? आणि पाहुणे कोण कोण होते? आणि तुझं भाषण कसं झालं ते सांग बर आधी! सुंदर!अप्रतिम! खूपच छान. नियोजन आणि आयोजन अप्रतिम! मनापासून तयारी केली की हो बाबा आयोजकानी. बाबा..माझं भाषणही छानच झालं. मी जी आरती रचली होती ना, तुम्हांला इथेच वाचून दाखवली होती सुरुवातीला, ती खूप खूप आवडली सर्वांना.
वाचक हो, बाबा…बाबा…म्हणून जो आवाज दिला होता तो कोणी? आणि कुणाला? आपण अंदाज लावाल कदाचित मुलगी आपल्या बाबांना किंवा आई आपल्या लाडाने मोठ्या मुलाला म्हणत असावी. पण फसलात! दोन्हीही उत्तर चुकीचीच! बाबा हा आवाज दिला होता एका पत्नीने आपल्या पतिराजांना! किती छान!” अग तुला एक गंमत सांगते हं, मुली यांना बाबा म्हणतात, म्हणून मी यांना बाबाच म्हणते.” अग मला दोन मुली एक प्राजक्ता, दुसरी निशिगंधा. माझी एक मैत्रीण म्हणाली, “एक प्राजक्ता आणि दुसरी निशिगंधा आता तिसरा मुलगा झाल्यावर त्याचं नाव काय झेंडू ठेवणार!” माझ्या मैत्रिणीला किती बरं घाई माझी फुलबाग पूर्ण करायची!” मी घरी आल्यावर बाबांना सांगितले, त्यावर बाबा म्हणाले, “आता तिसरा नकोच मीच तुझा झेंडू! आणि बरं का मी याला बाबाच म्हणते.” हे ऐकून आम्ही दिलखुलास हसलो. मॅडम म्हणाल्या, तुला हे घरामध्ये असणार बक्षिसांचं म्युझियम दिसतंय ना.. त्याचं सारं श्रेय या बाबांच आहे, त्यांनी मला प्रेरणा प्रोत्साहन दिलं. वाचक हो, खरंच प्रेरणा ही अग्नीसारखी असते तिला इंधन पुरवावं लागतं. खरंच हे इंधन मिळालं होतं डॉ. वाड यांच्याकडून. अशा पती-पत्नींचा आदर्श समाजातल्या पती-पत्नीने घ्यावा असच मनोमन वाटतं. अशीच एक आठवण… माझ्या मैत्रिणीला त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करून घ्यायचं होतं. त्यावेळेला मॅडम पोद्दार येथे होत्या, आम्ही फोनवर अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आम्हांला बसायला सांगून त्यांनी फोन लावला. राजा, “राजा तू कुठे आहेस?” ऐकतोयस ना, माझ्यासमोर दोन गुणी मुली बसल्या आहेत. तुला माहीत आहे ना, मला त्या हॉटेलमधला वडा सांबार खूप आवडतो. चार प्लेट घेऊन ये.
मंडळी, काय वाटतं ….त्या कोणाशी बोलत होत्या? आपण म्हणाल वेटरशी! चूक… पंधरा मिनिटात राजा चार प्लेट वडा सांबर घेऊन हजर. ये, ये, तू पण बैस… आणि बरं का या माझ्या दोन मुली…पुस्तकाचे प्रकाशन आहे त्याकरता आल्यात. पण आपण पहिल्यांदा खाऊन घेऊ आणि मग पुस्तक प्रकाशन. वडा सांबार खाऊन झाल्यावर पुस्तक प्रत्येकाच्या हातात देऊन प्रकाशन करण्यात आले. मी त्या राजाला म्हणाली… राजा,”आपण किती भाग्यवान आहात!” या बाईंच्या सहवासात नित्य आपल्याला राहायला मिळतं. त्यावर राजा हसला. प्रसन्न मुद्रेने मनाच्या गाभाऱ्यातून तो म्हणाला, “मॅडम त्या बाई नाहीत माझ्या आई आहेत…. “आता सांगा हा राजा कोण! हा राजा म्हणजे मॅडमचा शिपाई. वाचक हो, ज्या घरात पतीला बाबा आणि ऑफिसमध्ये शिपायाला राजा म्हणून संबोधलं जातं, ज्यांच्या लिखाणातून बोलण्यातून आपुलकीचा माणुसकीचा ओलावा जाणवतो, वाचकांच्या मनातील दंद्व शमून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, मनाची मलिनता दूर होऊन दु:खांवर हलकेच प्रेमळ सुखाची लहर झळकते. अशा ह्या आठवणीतल्या माझ्या आवडत्या लेखिका, माणूसपण जपत १०० पुरस्कारांच्या मानकरी १६० पुस्तकांच्या लेखिका, ज्यांनी आपल्या वहीतील दुःखाची पान चिकटवत, सतत नावीन्याचा व्यासंग, परिश्रम, मेहनत, चिकाटी, सातत्य त्याग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, हृदयसंवाद साधण्याची कला असणाऱ्या माझ्यावर मुलीप्रत प्रेम करणाऱ्या माझ्या आई डॉ. विजया वाड. ‘मनाच्या गाभाऱ्यातून उघडले आठवणींचे द्वार ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण शंभरावी करावी पार’ त्यांना उदंड आयुष्य लाभो एवढीच वाढदिवसाच्या निमित्ताने परमेश्वराजवळ प्रार्थना करते.