भारतीय लोकांना क्रिकेट खेळणाऱ्या रणजी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे तसेच सिनेमा क्षेत्रातील कलावंतांचे कमालीचे आकर्षण असते. एकवेळ घरातील सदस्यांचे काय सुरू आहे, हे एका छताखाली वावरूनही अनेकांना माहिती नसते. पण क्रिकेटपटूंचे व सिनेकलावंतांचे काय सुरू आहे, याची इंत्यभूत माहिती त्यांना असते. भारतीयांच्या मनावर इतका क्रीडापटूंचा आणि कलाकारांचा फोबिया स्वार झालेला असतो. अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला असो अथवा शाहरुख खान यांचा मन्नत बंगला. सिनेकलावंतांचे एकदा दर्शन व्हावे यासाठी रसिकवर्ग कित्येक तास त्यांच्या बंगल्यासमोर ताटकळत उभा असतो. त्यावेळी त्यांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या कवचाचे सर्वांना अप्रुप असते; परंतु बुधवारी मध्यरात्री हिंदी सिनेअभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्याच घरात झालेल्या खुनी हल्ल्यामुळे त्यांच्या सभोवताली असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुळातच सिने क्षेत्रातला कलावंत इतपतच सैफ अली खानची ओळख नाही. सैफची ओळख क्रीडा व सिनेक्षेत्राशी वर्षांनुवर्षे आहे. भारतीय क्रिकेटमधील नावाजलेले खेळाडू नबाब पतोडी व सिनेक्षेत्रातील जुन्या काळातील गाजलेल्या प्रख्यात कलाकार शर्मिला टागोर यांचा मुलगा म्हणून सैफला जन्मापासूनच वलय प्राप्त झाले आहे. त्यातच सिनेअभिनेत्री अमृतासिंगबरोबर झालेला पहिला विवाह व त्यानंतर करिना कपूरसोबत झालेला दुसरा विवाह यामुळे सैफ नेहमीच चर्चेच्या प्रकाशझोतात राहिलेला आहे. याशिवाय तो स्वत: एक अभिनेता असून त्याचे अनेक चित्रपट गाजलेही आहेत. अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाला किती सुरक्षेचे कवच असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही; परंतु कल्पनाविश्व आणि वास्तव यात जमीन आस्मानचा फरक असतो, हे सैफवर त्याच्या राहत्या घरातच झालेल्या खुनी हल्ल्यामुळे दिसून आले आहे.
स्वत:च्या घरातही कलाकार सुरक्षित राहिले नसल्याचे सैफ अलीच्या घटनेवरून पाहावयास मिळाले. मुळात सैफच्या घरात कोणालाही सहजासहजी प्रवेश मिळणे शक्यच नाही. इमारतीच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येणे, त्यातून सैफची सदनिका शोधून त्यात प्रवेश करणे, सैफची मुले असलेल्या रूमपर्यंत कोणत्याही अडथळ्याविना पोहोचणे या गोष्टी वरवर वाटतात, तितक्या साध्या व सोप्या नाहीत. सैफच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी घरामध्ये शिरल्यावर वाद घालणे, त्यांच्यावर हल्ला करून जखमी करणे आणि सैफ तिथे आल्यावर त्याच्यावरही हल्ला करून त्याला जखमी करणे आणि घरामध्ये पाच ते सहा कर्मचारी असतानाही हल्लेखोर बिनबोभाटपणे सदनिकेच्याच नाही, तर सैफचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या बाहेर निघून जातो. सोसायटीतील कोणालाही या घटनेचा थांगपत्ताही लागत नाही. विशेष म्हणजे हल्लेखोर निघून जात असतानाही सैफच्या घरातील कर्मचारीही त्या हल्लेखोराला पकडण्यासाठी आरडाओरड करत नाहीत. त्याचा पाठलाग करत नाहीत अथवा सोसायटीच्या गेटवर फोन करून प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांनाही हल्लेखोराला पकडण्यासाठी सूचनाही देत नाहीत. हा प्रकार मुळातच सर्व गूढ असून तूर्तास समजण्यापलीकडचा आहे. पोलीस तपासामध्ये या सर्व गोष्टींचा उलगडा होईलच. पण मध्यरात्री सोसायटीतून हल्लेखोर बाहेर पडत असतानाही प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक काय करत होते? झोपा काढत होते काय? सोसायटीमध्ये कोणी, कोणत्याही वेळी ये-जा करायला ती अत्यल्प उत्पन्न गटातील रहिवाशांची सोसायटी नव्हती, तर सैफ अली, करिना कपूरसारख्या नावाजलेल्या कलाकारांचे निवासी वास्तव्य असलेल्या श्रीमतांची व सेलिब्रिटींची सोसायटी होती. अशा लोकांच्या सुरक्षेसाठी अशी गलथान स्वरूपातील सुरक्षा व्यवस्था असेल, यावर कोणाचाही विश्वास बसणे शक्य नाही.
सैफवरील खुनी हल्ल्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. सिनेक्षेत्रातील अभिनेत्यांची घरांतील सुरक्षा व्यवस्था इतकी ठिसूळ असेल, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल? याचा विचार करणेही शक्य नाही. अर्थात वरवर पाहता या गोष्टी सहजशक्य नाहीत. सैफच्या मुलाने तातडीने रिक्षातून लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने सैफचे प्राण बचावले आहेत. मात्र काही वेगळीच घटना घडण्याचा धोका होता, भीती होती. सैफच्या घरामध्ये तुम्हा-आम्हा, सर्वसामान्यांना सहजासहजी प्रवेश मिळणे शक्यच नाही. सैफच्या घरामध्ये दिवसा उजेड तर सोडा, रात्री-अपरात्रीसुद्धा सैफच्या घरामध्ये प्रवेश मिळणे अशक्य आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उच्चभ्रू प्रतिष्ठितांच्या इमारतीमध्ये मध्यरात्री खुलेआम हल्लेखोर प्रवेश करतो. सिने अभिनेत्याच्या घरी बिनधास्तपणे प्रवेश करतो. सिने अभिनेत्याच्या घरातील कर्मचाऱ्यांवर तसेच सिने अभिनेत्यावर प्राणघातक खुनी हल्ला करून तेथून निघून जातो. त्याला पकडण्यासाठी कोण धावपळ करत नाही अथवा आरडाओरड केला जात नाही. हा सर्वच प्रकार संशयास्पद आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील तसेच घरातील सुरक्षेवर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेव्हा पोलीस खोलवर तपास करतील, तेव्हा अनेक गोष्टींवर तपासामध्ये प्रकाशझोत पडेल.
सोसायटीत तसेच सैफच्या घरामध्ये राजरोसपणे प्रवेश मिळाल्याने हल्लेखोराचा कोणाशी परिचय होता का? अथवा सोसायटीत तसेच घरामध्ये प्रवेश होईपर्यंत कोणी-कोणी त्याला मदत केली आहे, या घटनाही लवकरच उजेडात येतील. मुळात घडला प्रकार हा सुरक्षेला आव्हान देणारा आहे. यामुळे सिनेक्षेत्रातील सेलेब्रिटींची, क्रीडा क्षेत्रातील रथी-महारथींची व उद्योग वर्तुळातील उद्योजकांची झोप उडाली आहे. पोलीस पथके स्थापन झाली आहेत. आरोपीचे रेखाचित्रही सीसीटीव्हीच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. आरोपीला कोणत्याही क्षणी जेरबंद करणार असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत त्याच्या मणक्यातील चाकूची पात काढली. सैफवर हल्लेखोराने तब्बल ६ वार केले होते. सैफची प्रकृती आता चिंताजनक नसली तरी त्याला आता काही दिवस आराम करावा लागणार आहे. सैफवरील हल्लेखोराचा लवकरात लवकर शोध घेणे मुंबई पोलिसांसमोर आव्हान आहे. हल्लेखोराच्या साथीदारांचाही शोध घ्यावा लागणार आहे. मात्र या घटनेमुळे सैफ व त्याचा परिवार राहत्या घरातच गलथान सुरक्षेमुळे ‘अनसेफ’ असल्याचे सर्वांना पाहावयास मिळाले आहे.