 
                            भोपाळ: मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एका चोरासाठी त्याची चोरी शेवटची ठरली. चोर लोडिंग ऑटो चोरून पळून जात होता. यावेळी त्याचा अपघात झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल करून घेत अज्ञात चोराची ओळख पटवली. त्याचे कुटुंबीय आल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात येईल.
खरंतर, बैतूलच्या सारणी ठाणे क्षेत्रातील पाथाखेडामध्ये बुधवारी रात्री उशिरा संतोषकुमार नावाच्या व्यक्तीच्या घरासमोर त्याची लोडिंग ऑटो उभी होती. संधी साधून एक चोर ही ऑटो घेऊन गेला. ऑटो मालकाला रात्री ३ वाजता समजले की ऑटोची चोरी झाली आहे आणि त्याचा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पाथाखेडा आणि कालीमाई या दरम्यान वेगाने ऑटो चालवत असताना ऑटोवरील नियंत्रण गमावल्याने ती झाडाला धडकली. त्यानंतर आणखी एका झाडाला धडकली. यात ऑटोचे दोन तुकडे झाले आणि ऑटो चालवणाऱ्या चोराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दिसले नाहीत.

 
     
    




