रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभाग रत्नागिरी यांना दिले होते. हे निर्देश मिळताच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत अनधिकृत बांधकाम स्वतः हटवा अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाने मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली आहे. मंत्री नितेश राणे यांनी पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
Great Maratha : नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना ‘दि ग्रेट मराठा’ पुरस्कार जाहीर
मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे आहे. या सरकारी जागेत खासगी बांधकामांना सक्त मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करत ३१९ अनधिकृत बांधकामं झाली आहेत. ही बांधकामं हटवण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. प्रशासनाने कारवाई केली तर ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांच्याकडूनच बांधकाम हटवण्याचा खर्च वसूल केला जाणार आहे. नियोजीत विकासकामांतील अडथळे दूर करण्यासाठी अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू झाले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे १९ जानेवारीला जिल्हा अधिवेशन
मिरकरवाडा बंदराच्या ११ हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन विकासकामं केली जाणार आहेत. बंदरात ३०० ट्रॉलर्स आणि २०० पर्ससीन नौका अशा एकूण ५०० नौका उभ्या राहतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. याकरिता बंदरातील जागा मोकळी करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.