मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका कमी झालेला दिसून येतोय. राज्यात ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. अनेक ठिकाणी मळभाचे वातावरण तयार झाले आहे.आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असणार आहे. कमाल तापमानातही २ ते ३ अंशानी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यामध्येही तापमानामध्ये चढउतार होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान असेच राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वाऱ्यांची स्थिती बदलली आहे. यामुळे तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अशा वातावरणातील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. ढगाळ वातावरण अथवा अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे.
दुसरीकडे उत्तर भारतात हिमवृष्टी होत आहे. तेथील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी तसेच धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी राज्यात मात्र दिवसा तापमानात वाढ पाहायला मिळत आहे.