पेव्हर ब्लॉक उखडले; दुचाकीस्वारांना करावी लागते कसरत
माणगाव : ऐन गणेशोत्सवात कोकणात जाणार्या (Mumbai Goa Highway) गणेशभक्तांसाठी वडपाले ते लोणेरे या पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकून घाईघाईने रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. या रस्त्याची तीन ते चार महिन्यातच पूर्णपणे दूरवस्था झाली असून वाहन चालकांना खास करून दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरुन प्रवास करताना नाहक त्रास तर होतच आहे, पण त्यात वाहतूक कोंडीचाही मनस्ताप वाहन चालकांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. लोणेरे ते वडपाले या रस्त्याचे काम आजही रखडले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे लोणेरे ते वडपाले येथे पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सवापूर्वी या पट्टयाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी अनेक आश्वासने दिली गेली. मात्र, ती फोल ठरली. अनेक आंदोलने, उपोषणे झाली, पण महामार्ग काही झाला नाही.
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी GoodNews, आठव्या वेतन आयोगाला मंजुरी!
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्या गणेशभक्तांसाठी गणपती सणापूर्वी या महामार्गाची पाहणी करण्यात येते. मात्र, तरीही याची अवस्था ‘जैसे थे’च आहे. यावर्षी गणेशोत्सवापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी गणेशभक्तांना वाहतूक कोंडी आणि रस्त्याचा त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. आणि महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. त्याचवेळी कामचुकार करणार्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले होते.
खराब झालेल्या या पर्यायी मार्गावर एखादे वाहन बंद पडले, तर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यातच शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी तर वडपाले ते लोणेर हे तीन ते चार किलोमीटरचे अंतर कापताना तास दोन तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.