Monday, September 15, 2025

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे १९ जानेवारीला जिल्हा अधिवेशन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे १९ जानेवारीला जिल्हा अधिवेशन

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची होणार निवड

मसूरे | झुंजार पेडणेकर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखेचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन १९ जानेवारीला ओरोस येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उदघाट्न मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती ही संघटना अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी, शिक्षकांचा विविध प्रश्नांवर नेहमी संघर्ष करणारी राज्यव्यापी संघटना आहे. शिक्षकांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडत नेहमीच रस्त्यावर उतरणारी संघटना म्हणून संघटनेची ओळख आहे.अशा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा अधिवेशन १९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते २.०० या वेळेत संपन्न होणार आहे.

या अधिवेशनाला मंत्री नितेश राणे हे प्रमुख उदघाटक असणार आहेत. तर विशेष अतिथी आम. दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार कपिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दया नाईक, राज्य संघटक किसन दुखंडे, शिक्षक नेते संजय वेतुरेकर, माध्यमिक शिक्षक भारती अध्यक्ष प्रशांत आडेलकर, भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा उदयोजक भाई सावंत, संतोष वालावलकर तर संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अधिवेशनात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा व आदर्श शाळाचा सत्कार होणार असून विविध शैक्षणिक ठराव मांडले जाणार आहेत. तर नवी जिल्हा कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. १९ जानेवारीला इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे होणाऱ्या या अधिवेशनाला सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी केले आहे.

Comments
Add Comment