वेध – मधुरा कुलकर्णी
प्राचीन परंपरा आणि आधुनिकता यांचा उत्तम संगम यंदाच्या महाकुंभात दिसणार आहे. त्यामुळेच २०२५ च्या महाकुंभ सोहळ्याकडे केवळ संत-महंत आणि ऋषीमुनींचेच लक्ष लागले नसून भारतासारखा विविधतेत एकता जपणारा देश या पवित्र संगामावर पार पडणारे आध्यात्मिक संघटन, संमेलन कसे हाताळतो याकडे जगाचे लक्ष आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पार पडणारा हा पहिला कुंभमेळा उन्नतीचे नवे प्रवाह आणेल.
नदीच्या काठाने जन्म घेतलेल्या मानवाने पुढे आपली संस्कृती आणि सभ्यताही प्रवाहाच्या साक्षीनेच वाहती ठेवली. काळागणती तिच्यात अनेक गोष्टींची भर पडत गेली. समाज बदलला. जगण्यात नवनवीन प्रवाह मिसळत गेले, तरीदेखील आजही पूर्वापार असणाऱ्या परंपरा जपल्या जातात. किंबहुना, नव्या झळाळीने, श्रद्धा आणि भक्तीपूर्वक त्यांचे पालन होताना दिसते. महाकुंभमेळा त्यातीलच एक. या पार्श्वभूमीवर १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या महाकुंभ मेळ्याकडे भारतवासियांचेच नव्हे, तर समस्त जगाचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने प्रचंड मोठ्या संख्येने एकत्र येणारे साधू-महंत, आखाड्यांमधील पूजक आणि भाविकांना पाहणे, शाही स्नानाचा आनंद घेणे, त्यांच्या वेगळ्या आणि आध्यात्मिक जगाचा परिचय करून घेत अभ्यास करणे हा जगासाठी औत्सुक्याचा विषय ठरतो. त्यामुळेच महाकुंभाचे पर्व अनुभवण्यासाठी येणाऱ्या देशी-परदेशी लोकांची संख्या दरवर्षी वाढते. आताही भाविकांना, अभ्यासकांना सामावून घेण्यासाठी तीर्थराज प्रयाग सज्ज असून परंपरेचे पाईक असणारा इथला समाज उच्च तंत्रज्ञानाचा हात धरून कसा पुढे जातो, खऱ्या अर्थाने नव्या-जुन्याचा संगम कसा साधतो याचे चित्र यानिमित्ताने जगापुढे साकारणार आहे.
महाकुंभ हे अमृतपुरुष भारताचे अनोखे स्वरूप आहे. या उत्सवाची पार्श्वभूमी पाहता इतिहास-पुराणांची अनेक प्राचीन पाने आपल्यासमोर उलगडतात. देवासूर, कद्रू-विनता यांच्यातील युद्ध आणि भगवान धन्वंतरीने दिलेल्या अमृत-कुंभाची प्राप्ती यासंबंधी अनेक रंजक कथांचे अध्याय कुंभाच्या कथांमध्ये आहेत. खरे तर महाकुंभ ही व्यक्तीच्या एकुणच एकात्मतेच्या विलक्षण अनुभवाची प्रयोगशाळा आहे. गंगा-यमुना-सरस्वतीचा संगम असणाऱ्या तीर्थक्षेत्र प्रयागराजमध्ये दर बारा वर्षांनी हा महान उत्सव होतो. आपल्या धार्मिक-पौराणिक भूगोलाची पवित्र भूमी असण्याबरोबरच तो आपल्या आध्यात्मिक सांस्कृतिक काळ-चेतनेचा चिरंतन पुरावाही आहे. यामध्ये आपल्याला ऋषी परंपरेने प्रेरित असणारा भारत पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळते. कुंभमेळ्यामध्ये आपण अखंड परंपरा पाहतो. प्रख्यात आचार्य, जगदगुरू, महामंडलेश्वर आणि सर्व परंपरांचे संत-महंत येथे जमतात. त्यामुळेच पौराणिक महानता, अध्यात्मिक अनुभव, ऐतिहासिक वैभव, सांस्कृतिक दिव्यता आणि भौगोलिक भव्यता या सगळ्याची जोड २०२५च्या महाकुंभाला मिळत आहे. हा योग भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतकाळात येत असल्याने अधिक महत्त्वपूर्ण आहे. अमृताचा लाभ घेण्याच्या संकल्पाशी समन्वित असणारा हा महाकुंभ उत्सव म्हणजे आपल्या राष्ट्रीय चेतनेला संपूर्णपणे भारत-पुरुष म्हणून ओळखण्याचा एक रत्नासारखा मेळ आहे. आपल्या महान राष्ट्राची अखंडता, सार्वभौमत्व, शौर्य आणि समृद्धी अधोरेखित करण्याची ही एक संधी आहे.
अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतरचा पहिला महाकुंभ असल्यामुळेही याला विशेष महत्त्व आहे. थोडक्यात, महाकुंभ हे आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे जिवंत स्मारक आहे, असेही म्हणता येईल. त्रिवेणी नदीच्या काठावर महाकुंभ आयोजित केला जातो. त्याच ठिकाणी त्रेतामध्ये रामाने लोककल्याणासाठी वनयात्रेची सुरुवात केली होती. तिच्या काठावर, प्रेममूर्ती भरत यांनी पुरुषार्थ चतुष्ट्याचा त्याग केला आणि भक्तीची विनंती केली. त्यामुळेच प्रयाग हे आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे चिरंतन स्थान आहे. या महाकुंभाकडे पाहताना आणखी काही परिमाणही लक्षात येतात. त्याचाच एक भाग म्हणून भारताच्या केंद्रीय नेतृत्वाचे स्पष्ट प्राधान्यक्रम आणि त्यातून निर्माण होणारे जागतिक परिमाण सेवा, सुरक्षा, शिक्षण, औषधोपचार आणि सुसंवादाने परिपूर्ण भारताचे दर्शन घडवत आहेत. अयोध्या, मथुरा, काशी, हरिद्वार, केदारनाथ, विंध्याचल यासह भारतातील दिव्य तीर्थक्षेत्रे त्यांच्या आध्यात्मिक वैभवात पुनर्संचयित केली जात आहेत. त्यामुळे महाकुंभ एकात्मिक दृष्टी, समन्वित प्रयत्न आणि पूर्ण सहकार्याचा पुरावा ठरेल.
यंदाचा महाकुंभ धार्मिक दृष्टीनेच नाही, तर आर्थिक उलाढालीचेही मोठे केंद्र आहे. त्यामुळेच तब्बल ५६ दिवस चालणारा हा कार्यक्रम केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातूनही एक अद्वितीय उदाहरण असल्याचे जाणून घ्यावे लागेल. महाकुंभच्या आयोजनासाठी राज्य सरकारने पाच हजार ४३५ कोटी ६८ लाख रुपयांचे मोठे बजेट ठेवले आहे. २०१९ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या ४,२०० कोटी रुपयांच्या बजेटपेक्षा हे खूप जास्त आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे ७,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रकमेत केंद्र सरकारच्या योगदानाचाही समावेश आहे. या वेळी केंद्राने २,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाकुंभ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ४२१ प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यापैकी ३,४६१.९९ कोटी रुपयांच्या योजनांना आधीच मान्यता देण्यात आली. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेपासून भाविकांसाठी सुविधांच्या व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक बाबींचा समावेश आहे. एकूणच महाकुंभाचे बजेट वाढले आहे. १८८२ मध्ये महाकुंभावर केवळ २० हजार २८८ रुपये खर्च झाले होते. त्या वेळी मौनी अमावस्येला सुमारे आठ लाख लोकांनी महाकुंभात स्नान केले होते. तेव्हा भारताची एकूण लोकसंख्या २२.५ कोटी होती. १८९४च्या कुंभमेळ्यावेळी भारताची लोकसंख्या २३ कोटी झाली आणि सुमारे दहा लाख भाविकांनी कुंभात स्नान केले. या कार्यक्रमासाठी ६९,४२७ रुपये खर्च करण्यात आले होते. १९१८ च्या महाकुंभात संगमावर स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ३० लाखांवर गेली. त्याचे बजेट १.३७ लाख रुपये होते.
काळानुरूप केवळ भाविकांचीच संख्या वाढली नाही, तर कार्यक्रमाचे बजेट आणि व्यवस्थेची पातळीही वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अर्थातच हा सरकारी खर्च झाला. त्यापेक्षा सुमारे वीसपट जास्त उलाढाल होत असते, हेदेखील विचारात घ्यायला हवे. आता या धार्मिक-आध्यात्मिक सोहळ्याला प्रगत तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. भाविकांसाठी उत्तम स्वच्छता, सुरक्षित स्नान घाट, राहण्याची तात्पुरती व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था या सगळ्यामध्ये त्याचे दर्शन घडते. महाकुंभाला येणाऱ्या कोट्यवधी भाविकांसाठी संगमाजवळ आधुनिक सुविधांनी सुसज्ज टेंट सिटी उभारण्यात आली आहे. वीज, पाणी आणि स्वच्छता या सगळ्यासाठीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. शिवाय ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून मेळ्यावर लक्ष ठेवले जात आहे. महाकुंभ हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून प्रादेशिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना देतो. या कार्यक्रमामुळे पर्यटन, वाहतूक, खाद्य आणि पेय व्यवसाय, हॉटेल्स, लॉजिंग आणि स्थानिक हस्तकला उद्योगांना प्रचंड फायदा होतो. महाकुंभ २०२५ दरम्यान छोटे-मोठे दुकानदार, टॅक्सी आणि रिक्षाचालक, मार्गदर्शक, स्थानिक कारागीर यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. अर्थात एवढा प्रचंड समुदाय एकत्र येत असल्यामुळे काही आव्हानेही उभी ठाकली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दीचे व्यवस्थापन करणे, संसर्गजन्य आजाराची भीती वाढत असताना सार्वजनिक स्वच्छता राखणे, वीज आणि पाणी पुरवठा सुनिश्चित करणे, भाविकांची सुरक्षा हे विषय प्राधान्याने समोर येणारे आहेत.
नियोजनासाठी प्रशासनाने शेकडो पथके तयार केली आहेत. कुंभकाळात आरोग्यसेवाही मोठ्या प्रमाणात बळकट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करता येईल. महाकुंभमध्ये उपचारांसाठी सहा हजार खाटा, १२५ रुग्णवाहिका आणि अशाच हाय-टेक आरोग्य सुविधा तयार आहेत. शेवटी महाकुंभ केवळ आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर त्यात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांचेही प्रतिबिंब आहे. हा भारताची प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असणारा उत्सव आहे. भारत आपला सांस्कृतिक वारसा कसा जिवंत ठेवतो आणि आधुनिकतेची जोड देऊन नव्या रूपात कशी सादर करतो, याचे जगाला औत्सुक्य आहे. महाकुंभ केवळ भाविकांनाच नाही, तर जगाला संदेश देणारा आहे. त्यामुळे तो उत्तम प्रकारे पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाने ओळखायला हवी.