कोकण मोहरतेय...!

  169

माझे कोकण - संतोष वायंगणकर


साधारणत: नोव्हेंबर अखेरपासून कोकणात थंडीची चाहूल लागते. डिसेंबर, जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा किंवा पंधरवडा हा थंडीचा हंगाम असतो. कोकणातील कडाक्याची पडणारी थंडी ज्यांनी अनुभवलेली असेल ते काश्मीरच्या, नागपूरच्या थंडीलाही न घाबरता सामोरे जातील. थंडीच्या काळात फार छान आल्हाददायक वातावरण असतं. कडाक्याची पडलेली थंडी आणि चुलींवरची ‘फुटी’ चहा (दूध न वापरता बनवलेला) एकदम भारी. आजकाल अमेरिकन संशोधनानंतर डॉक्टर चहात दूध न टाकता चहा घ्या म्हणून सांगतात. त्यामुळे पूर्वीच्या या ‘फुटी’ चहाला आज ब्लॅक टीच्या नावाने जगभरात बारसं करून पंचतारांकित हॉटेल संस्कृतीतही त्याला मानाचा पान प्राप्त झालं आहे. अशा चहाचा आस्वाद घेत कोकणातील सामान्य माणूस जगातील सामाजिक, राजकीय घडामोडींवर कमालीच भाष्य केल्याशिवाय त्याला जमणारही नाही.


चालू हंगामात आंबा, काजू, कोकम, जांभूळ, सुपारी या पिकांचं काय होईल कशी स्थिती असेल या संबंधीही कोकणातील शेतकरी गजालींमध्ये रमताना दिसेल आणि भरपूर थंडी पडली तर तोच सामान्य शेतकरी, आंबा, काजू बागायतदार या जोरदार पडणाऱ्या थंडीने आंबा, काजूचा मोहर पाहून कमालीचा आनंदी झालेला दिसतो. यावर्षी पावसाळाही बाराही महिने आहे की काय? असं वाटण्याजोगी स्थिती होती. अधून-मधून केव्हाही पाऊस पडत होता. यामुळे कोकणात फक्त पाऊसच पडणार की काय? कोकणात थंडीच पडणार नाही असा चिंतातुर झालेला शेतकरी, बागायतदार होता; परंतु मागील पंधरवड्यात थंडी आली आणि आंबा, काजूच्या बागांमध्ये मोहोर दिसू लागला. आंबा, काजू बागायतीतील मोहोर पाहून निश्चितच बागायतदार शेतकरी सुखावला. याचे कारण वर्षभराची आर्थिक बेगमी होईल याचा आजच्या घडीला विश्वास बागायतदार शेतकऱ्यांना या आंबा, काजू मोहरामध्ये दिसू लागला आहे. आंबा, काजू, कोकम अशी कोकणात तयार होणारी फळ मागील काही वर्षात अनियमित होत आहेत. बागायतदार शेतकरी आर्थिक तोटा सहन करत आहे. मात्र, कोकणातील शेतकरी आंबा, काजू, कोकमचे नुकसान झाले तरीही शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची वाट न पाहता किंवा आपल्याच बागायतीत बुलडोझर न फिरवता कष्टाची नव्याने मशागत करत प्रयत्न करीत राहातो. यावर्षी नाहीतर पुढच्या वर्षी तरी चांगल फळपीक येईल या अपेक्षेने असतो.


कोकणवासीय ज्या श्रद्धेने, भक्तिभावाने आपल्या लाडक्या गणरायाची वाट पाहतो त्याच अपेक्षेने यावर्षी फळपीक चांगलं येईल अशी अपेक्षा ठेऊन कोकणवासीय आहे. कोकणातील हापूस आंब्यावर ज्या पद्धतीने कर्नाटक आदी राज्यातील आंब्याच संकट आलेलं आहे. कोकणातीलही बाजारातून कर्नाटकचा आंबा विक्रीला बाजारात दिसतो. यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर केवढे मोठं संकट उभं आहे ते सहज लक्षात येऊ शकेल. याबाबतही कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी फारच जागृकतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. एकिकडे निसर्गाच बदलत्या हवामानाच संकट आहे. त्याचबरोबर फळ बाजारातही डुपलीकेट आंबा, काजू विक्रीला आणून त्यातूनही कोकणातील आंबा, काजूला बदनाम करण्याच काम फार मोठ्या प्रमाणात होत आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी यासाठी एकसंध असलं पाहिजे. संघटनात्मकतेने याविरोधात उभं राहण्याची गरज आहे; परंतु कोकणातील बागायतदार शेतकरीही पक्षीय राजकारणामध्ये अधिक स्वारस्य घेऊन आहे. आंबा, काजू, कोकम, सुपारी आदी फळपिकांचं उत्पादन घेणारा शेतकरी जर संघटितपणे या सर्वांचा विचार करू लागला तर ते अधिक याग्य होईल.बागायतदार शेतकऱ्यांमध्येही सतत संवाद असणे आवश्यक आहे. फळपिकांवरची चर्चा होत राहायला हवी. त्यात कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा, समस्यांवर उपाय कसे करायचे यासाठीचा सकारात्मक संवाद होत राहिला तर विक्री व्यवस्थेच्या बाजारातही कोकणचा दबाव आणि दबदबा तयार होईल. आज आंबा बागायतदार विखुरलेला आहे. तो संघटित होणार नाही याची खात्री एपीएमसी मार्केटमध्ये बसलेल्या आंबा दलालाना आहे. त्यामुळेच कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना वाट्टेल त्या पद्धतीने आंब्याला दर दिला जातो. हातरूमालाखाली आजही आंब्याचा दर ठरतो हे दुर्दैवच म्हणावं लागेल.


महाराष्ट्रातील ऊस, कापूस, द्राक्ष, डाळिंब, संत्री, मोसंबी अशा असंख्य फळपीक घेणारा शेतकरी संघटित आहे म्हणूनच वर्षानुवर्षे ऊस पिकवणारा शेतकरी शासकीय अनुदानाचे, नुकसानभरपाईचे टॉनिक दिलं जातं. वर्षानुवर्षे शासकीय अनुदानावर पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पिकवणारा शेतकरी आणि साखर कारखाने उभे आहेत. यातला कुठलाच फारसा वाटा कोकणातील शेतकऱ्याला मिळाला नाही आणि यातही कोकणातील शेतकऱ्याला काय मिळत असेल तर कोकणातील शेतकरी तहसीलकडे अर्ज करून शेजारच्या शेतकऱ्याच नुकसान कसं झालं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तिथेही आपण आपल्याच शेतकऱ्याला आडवं जातो. उर्वरित महाराष्ट्रात सर्वांनीच मिळून खाऊ याचा मोठा उद्योग होतो. कोकणातील शेतकरी, बागायतदार सरकारी अनुदानाच्या मेहरबानीवर नसतो हे अनेकवेळा कोकणाने दाखवून दिले आहे. कोकणातील आंबा, काजू बागायतीत झाडांवरचा मोहर पाहून कोकणवासीय सुखावला आहे. आता सर्वकाही निसर्गाच्याच हातात आहे.

Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने