खासगी कंपनीसाठी केबल टाकण्याचे काम सुरू
वाडा : कंचाड-खानिवली-कुडूस रा. प. म. ४३ मार्गालगतच खोदकाम करून केबल टाकण्याच्या नावाखाली मार्ग जागोजागी खोदून टाकल्याने रस्त्यावर अनेक अपघात होत असून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. कंचाड-खानिवली-कुडूस या मार्गावरील भावेघर येथे असलेल्या वीज वितरणच्या फिटरवरून ते कुडूस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोका कोला कंपनीच्या फिटरपर्यंत ही केबलची लाईन टाकली जात आहे.
एका खासगी कंपनीसाठी ही केबल टाकण्याचे काम सुरू आहे. एका ठेकेदाराला या कामाचा ठेका देण्यात आला असून त्यांने बांधकाम रस्त्यालगतच शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही लाईन टाकली जात असल्याने यामुळे डांबरी रस्त्याचा दीड मीटरचा संपूर्ण पट्टा उखडून टाकला गेला आहे. या ठिकाणी खाेदल्यामुळे येथे अपघात घडत आहेत.
याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची असून त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील नागरिक सुभाष हरड यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व परवानग्या घेऊनच ही लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात कोणाची काही तक्रार असेल ती त्यांनी लेखी स्वरूपात द्यावी. – अविनाश कटकवार, उप अभियंता वीज वितरण वाडा
उपअभियंतामार्फत या रस्त्याची पाहणी करून या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ. – नितीन भोये, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार