जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
मी या आधीही सांगितले आहे की तुम्ही कर्म केलेत की प्रतिक्रिया ही होतेच, मग ती अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल. उदाहरणार्थ, आपण प्रवासाला निघालो. तिकीट काढले, बाकी सर्व तयारी केली. पण अचानक कोणीतरी मोर्चा काढतो. सगळे रस्ते जाम. आपण अडकलो, पुढेही जाता येत नाही व मागेही येता येत नाही आणि मग गाडी चुकते. इथे आपल्याला अनुकूल फळ मिळाले नाही. या प्रमाणेच कर्माचे फळ हे मिळतेच, मग ते अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या वचनाचा अर्थ आम्ही असा सांगतो.
निसर्गाचे नियम तुम्ही कर्म केलेत की लगेच सक्रिय होतात. हे असे निसर्गाचे नियम किती आहेत? परमेश्वर जसा अनंत आहे, तसेच निसर्गाचे नियम ही अनंत आहेत. आपल्याला त्यातले फार थोडे माहीत आहेत. जे माहीत आहेत, त्यानेच एवढी प्रगती झाली आहे. जर सगळे माहीत झाले तर किती प्रगती होईल. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण शक्ती पूर्वीही होती. अगदी रामायण, महाभारत काळापासून ते आजपर्यंत आहे, पण तिचा शोध कोणी लावला. न्यूटनने तिचा शोध लावला, म्हणून त्याला Invention म्हणत नाही, तर Discovery म्हणतात. जे होते ते शोधून काढणे म्हणजे Discovery म्हणतात. मी हे का सांगतो आहे? निसर्गाचे जे अनंत नियम आहेत ते शोधून काढून मानवजात अधिक प्रगती करू शकते.
या निसर्गाच्या नियमांप्रमाणेच जीवनमूल्ये ठरत असतात. असे हे निसर्गाचे नियम मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. तेच लक्षात न घेतल्यामुळे परमेश्वराबद्दल अनेक गैरसमज प्रचलित आहेत. त्यातूनच धर्मांतर, धर्माच्या नावाखाली छळ आणि इतर अनेक अनिष्ट गोष्टी निर्माण झाल्या. ज्या या आधीही झाल्या होत्या, आताही होत आहेत, योग्य उपाययोजना झाली नाही तर पुढेही होतच राहतील. प्रत्यक्षात परमेश्वराच्या हातात कृपा किंवा कोप करणे नाही तर निसर्ग नियमांप्रमाणेच आपल्या कर्माप्रमाणेच कृपा किंवा कोप होतो. तुमचे कर्म व निसर्ग नियम यावरच तुम्हाला अनुकूल किंवा प्रतिकूल फळ मिळणार हे अवलंबून आहे. ही महत्त्वाची गोष्ट एकदा लक्षात आली की किती तरी गोष्टींचा उलगडा होतो.