नायलॉन मांजाचे आणखी किती बळी?

Share

आनंदाचे प्रतीक असलेल्या मकरसंक्रातीच्या सणाला नायलॉन मांजामुळे यंदाही गालबोट लागले आहे. संक्रातीच्या सणानिमित्ताने पतंगबाजीचा खेळ खेळला जातो. यासाठी पारंपरिक मांजाचा उपयोग करायला हवा. मात्र, अलीकडे नायलॉन मांजाचाच वापर करत पतंग उडवण्याची भारी हौस अनेकांसाठी जीवघेणी ठरत आहे. इतरांपेक्षा आपलाच पतंग उंच उडावा आणि आपणच पतंगाचे किंग ठरावे या इर्षेतून चक्क प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरून सर्रास पतंग उडवले जातात. दुसऱ्या बाजूला घातक मांजामुळे निष्पाप जीवांचे नाहक बळी जातात, याकडे दुर्लक्ष होते. अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला इजा झाल्याच्या घटना तर अनेक बालकांचे हात चिरले जाण्याचे सर्रास प्रकार या दिवसांत कानावर येतात. एवढंच नव्हे तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचे जीवही धोक्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये मनाला चटका लावणारी घटना मंगळवारी घडली. संक्रांतीच्या सणासाठी सोनू धोत्रे नावाचा तरुण गुजरातहून नाशिकला येत होता. पाच महिन्यांनंतर त्याचे लग्न होणार होते. सोनू धोत्रेच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तो सख्या भावाला भेटण्यासाठी आला होता. देवळाली कॅम्पकडे मोटर सायकलवरून जात असताना सोनूला नायलॉन मांजामुळे फास लागला अन् त्याचा गळा चिरला गेला. त्यात त्याला मृत्यूने कवटाळले. दुसऱ्या घटनेत नंदूरबारमधील कार्तिक गोरवे आजोबांसह मोटारसायकलवरून जात असताना, त्याच्या गळ्यात मांजा अडकला आणि कार्तिकचा गळा चिरला. कार्तिकला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारादरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला. या घटनेने गोरवे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अकोला जिल्ह्यातील पालिका कर्मचारी मंगशे बोपटे हे दुचाकीवरून जात असताना गळ्यात मांजा अडकल्याने त्याचाही गळा चिरला गेला. त्याच्या गळ्यावर १५ टाके पडले. सुदैवाने त्याची प्रकृती स्थिर आहे. भंडारा जिल्ह्यात मोटार सायकलवरून जाणाऱ्या शुभम चौधरीचा गळा मांजामुळे चिरला गेला. सुदैवाने त्याचा जीव वाचला. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश काढलेला असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चून नायलॉन मांजा विक्री आणि त्याचा वापर झाल्याचे चित्र संक्रांतीच्या दिवशी, यवतमाळ शहरात दिसले. या मांजाचा झटकाही एका ज्येष्ठ नागरिकाला बसला. पोलिसांकडूनही कडक कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, वरवरची कारवाई झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला. अशा अनेक घटना महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यांतून ऐकायला येत आहेत; परंतु प्रशासन म्हणावे तसे अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी कारवाईचा बडगा पाहायला मिळाला.

मांजाने बळी घेतल्याच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या येवला पोलिसांच्या भरारी पथकाने कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. या चौघांकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. भिवंडीत महानगरपालिकेने केलेल्या धडक कारवाईत नायलॉन मांजा जप्त केला, अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशा कारवायांनी मांजा बंदी झाली असे म्हणायचे का? तसे पाहायला गेले तर पोलिसांना उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. राज्यात प्लास्टिक बंदीचा कसा बट्याबोळ झाला हे जनतेने पाहिले आहे. कारवाई कोणावर होते तर ज्यांच्या हातात प्लास्टिकची पिशवी सापडते त्यांच्यावर? परंतु प्लास्टिकच्या पिशव्या उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर मोठी कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे मुळावर घाव घालावा तसा प्लॉस्टिक बंदीसाठी ज्या ठिकाणी उत्पादन होते, त्याच ठिकाणी कडक कारवाई केली तर माल बाजारात आला नसता. तसाच काहीसा प्रकार नॉयलॉनच्या मांजांबाबत म्हणता येईल. हा मांजा ज्या ठिकाणी तयार होतो, तेथेच कारवाई केली तर बाजारात त्याचा साठा उपलब्ध होण्यावर अडचणी येतील; परंतु आपल्याकडे अनेक कायदे तयार होतात. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यावर उदासीनता दिसून येते.

नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर बंदी असतानाही प्रशासनाच्या सुस्त कारवाईमुळे दोघांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण गळा चिरल्याने गंभीर जखमी झाले. या सणाला लागलेल्या गालबोटामुळे नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन अनेक संस्थांनी केले आहे, तर नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात भरारी पथके नेमली असतानाही ही विक्री कशी सुरू आहे, हा प्रश्न कोड्यात टाकणारा आहे. त्याचे कारण जीवघेण्या नायलॉन मांजावर कायद्याने बंदी असली तरी ती फक्त कागदोपत्रीच मर्यादेत असल्याचे चित्र सध्या तरी सर्वत्र पाहायला मिळत आहे.

राज्यात आज संक्रात सणाच्या निमित्ताने पतंगबाजीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक मकरसंक्रातीला नायलॉन मांजावरील बंदीची चर्चा होते. पण, नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून जुजबी कारवाया केल्या जातात असे दिसते, त्यामुळे प्रशासनाकडून चिरीमिरी घेऊन नायलॉन मांजा विक्रीला छुपा पाठिंबा आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. सध्या गल्लोगल्ली अनेक मुलांच्या हातात नायलॉन मांजा आणि गुंता झालेल्या नायलॉन मांजा रस्त्यावर पडलेला आढळून येत आहे. अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडत असतानाही, नायलॉन मांजा राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन गंभीर दखल घेणार आहे की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

26 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

27 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

34 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

38 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

47 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

50 minutes ago