Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

राज्यातील कामगारांसाठी ईएसआयसी १८ नवी रुग्णालये उभारणार

राज्यातील कामगारांसाठी ईएसआयसी १८ नवी रुग्णालये उभारणार

रायगडमध्ये सर्वाधिक चार रुग्णालये, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

मुंबई : राज्यातील कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या राज्य कामगार विमा सोसायटीने राज्यात १८ नवी रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी सर्वाधिक चार रुग्णालये रायगडमध्ये, तर छत्रपती संभाजी नगर व पुण्यामध्य प्रत्येकी दोन रुग्णालये मंजूर झाली आहेत. या रुग्णालयासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

राज्य कामगार विमा सोसायटी राज्यातील कामगारांसाठी १२ रुग्णालये व संलग्न २५३ रुग्णालयातून आरोग्य सेवा पुरवते. राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार ४६० कुटुंब आहेत. तर लाभार्थी संख्या जवळपास दोन कोटीपर्यंत आहे. या कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी राज्यात विविध ठिकाणी १८ नवी रुग्णालये उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार रायगडमध्ये सर्वाधिक चार रुग्णालये उभारण्यात येणार असून, पेण, पनवेल, कर्जत व खोपोली येथे ही रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजी नगरमध्ये वाळूंज आणि शेंद्रा येथे, तर पुण्यामध्ये बारामती व चाकण येथे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालघर, सातारा, अमहदनगर, नाशिक, जळगाव, वर्धा, अमरावती, सांगली, रत्नागिरी व चंद्रपूर येथे प्रत्येकी एक रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

ही रुग्णालये उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, या जागा एमआयडीसी, जिल्हाधिकारी, डीपीआयआयटी, एसटीआयसीई, सिडको यांच्याकडून संपादित करण्यात येणार आहेत. यापैकी आठ रुग्णालयांसाठी स्थळ निवड समितीने जागांची शिफारस केली आहे, तर पाच रुग्णालयांसाठीच्या जागेचे प्रस्ताव ईएसआयसीच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच पाच रुग्णालये उभारण्यासाठी अद्यापपर्यंत राज्य सरकार किंवा एमआयडीसीने जागा निश्चित करून दिले नसल्याचे राज्य कामगार विमा सोसाटीकडून सांगण्यात आले. दरम्यान, या रुग्णालयांसाठी जागा संपादन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. त्यामुळे या १८ नव्या रुग्णालयांच्या उभारणीचा मार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ईएसआयसी रुग्णालयांचा कायापालट करा

सद्यस्थितीत असलेल्या कामगार रुग्णालयांची डागडुजी करून त्यांचा कायापालट करावा. सोसायटीच्या रुग्णालयांची जागा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यास कामगारांना महागड्या खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार नाही. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कामगारांसाठी ही रुग्णालये संजीवनी ठरत आहेत. त्यामुळे सोसायटीच्या नव्याने मंजूर १८ रुग्णालयांसाठी भूसंपादन पूर्ण करावे, असे निर्देश प्रकाश आबिटकर यांनी दिले.

Comments
Add Comment