अखिल भारतीय कोळी समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने घेतली मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची भेट
मुंबई : विक्रोळी आणि ट्रॉम्बे भागातील कोळी बांधवांनी आज मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ट्रॉम्बे विस्तारित पर्यटन जेट्टी म्हणून विकसित करण्याची मागणी केली. त्याचबरोबर वाशी प्रकल्पामुळे होणारे कोळी बांधवांचे नुकसान आणि डम्पिंग ग्राउंड मुळे खाडीत होणारे प्रदूषण याबाबतही एकविरा आई कोळी समाज विक्रोळी या संस्थेने मत्स्य व्यवसाय मंत्र्यांना यावेळी त्यांच्या समस्यांचे निवेदन सादर केले.
अखिल भारतीय कोळी समाज संस्थेच्या शिष्टमंडळाने आज मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची भेट घेतली. ट्रॉम्बे येथे एक जेटटी असून मच्छीमार बांधव मासेमारी करता जाण्या येण्यासाठी त्याचबरोबर पकडून आणलेले मासे उतरवण्यासाठी आणि नका नांगरण्यासाठी या जेट्टीचा वापर पूर्वीपासून करत आहेत. तथापि याकडे यापूर्वी पुरेशी लक्ष न दिले गेल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल गाळ साचला असून ओहोटीच्या वेळी मच्छीमार बांधवांना त्यांच्या होड्या दूरवर नांगरून, पकडून आणलेली मासळी छोट्या होडी मधून चिखलातून लोटत जेट्टीवर आणावी लागते आणि त्याचा कोळी बांधवांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. तसेच यामुळे त्यांना विविध शारीरिक आजारांनाही सामोरे जावे लागते. या कारणांमुळे कोळी बांधवांची तरुण पिढी इच्छा असूनही आपला परंपरागत व्यवसाय करत नाहीत. जर ट्रॉम्बे जेट्टीचा विस्तार केला तर २४ तास खाडीचे पाणी जवळ उपलब्ध आहे. त्याचा वापर होऊन कोळी समाजाची तरुण पिढी देखील मासेमारीच्या व्यवसायात उतरेल की ज्यामुळे मासेमारी व्यवसाय वाढवून कोळी बांधवांच्या उत्पन्नातही वाढ होईल असे यावेळी शिष्टमंडळाने मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना सांगितले.
सध्या नवी मुंबईतून मुंबईला वॉटर टॅक्सीने ट्रॉम्बे वरून जावे लागते. जर ट्रॉम्बे जेटीचा विस्तार केला तरी या वॉटर टॅक्सीला ट्रॉम्बे जेट्टि येथे थांबा देऊन या विभागातील नागरिक सुद्धा वॉटर टॅक्सीचा लाभ घेऊ शकतील. ज्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ तसेच इंधनाची देखील मोठ्या प्रमाणावर बचत होईल असेही शिष्टमंडळाने मत्स्य व्यवसाय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले . त्याचबरोबर एक तासाच्या अंतरावर प्रसिद्ध घारापुरी लेणी आहेत. परंतु योग्य सुविधा अभावी नवी मुंबई तसेच या विभागातील पर्यटकांना गेटवे ऑफ इंडिया येथून तेथे जावे लागते त्यामुळे त्यांचे जवळपास दोन तास जाण्या-येण्यात वाया जातात. जर ट्रॉम्बे जेट्टिचा विस्तार केला तर येथील पर्यटकांना घारापुरी मांडवा अलिबाग येथे सहजरित्या जाता येईल. तसेच या ठिकाणी स्पोर्ट्स बोटिंग, बोट रेस्टॉरंट चालू करता येईल की ज्यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि त्याचप्रमाणे पोळी बांधवांच्या उत्पन्नाचा नवीन स्त्रोत देखील निर्माण होईल असे शिष्टमंडळाने मत्स्य व्यवसाय मंत्र्यांसमोर मांडले. यावेळी शिष्टमंडळात अखिल भारतीय कोळी समाज संस्थेचे मुंबई सचिव रघुनाथ कोळी, भाजपा ओबीसी मोर्चाचे तुकाराम कोळी त्याचबरोबर एकविरा आई कोळी समाज विक्रोळी संस्थेचे सचिव दीपक महाकाळ, खजिनदार राजेश्वरी मनोज कोळी, सदस्य दत्ता कोळी आदी कोळी समाज बांधव या शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
ट्रॉम्बे जेट्टीला भेट देणार – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबईतील विक्रोळी आणि ट्रॉम्बे येथील कोळी समाज बांधवांच्या समस्या तसेच मागण्या समजून घेतल्या. मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री म्हणून लवकरच ट्रॉम्बे जेट्टीला भेट देणार असून तेथील प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलणार आहे असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यावेळी कोळी समाज बांधवांच्या शिष्टमंडळांना दिले.