छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये १९ वर्षीय मुलाचा गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्षुल्लक गोष्टींवरुन ही हत्या झाली असल्याची पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. प्रदीप विश्वनाथ निपटे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे, तो बीडमधील माजलगावचा असल्याचे समजते. तो फ्लॅटमध्ये राहत होता. अज्ञात तरुणांनी त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बीसीएसच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये घडलेल्या वादाची पार्श्ववभूमी असल्याचा पोलिसांनी तपासादरम्यान सांगितले आहे. प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांची एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. त्यामुळेच त्याचा काटा काढल्याचे बोलले जाते आहे .
मंगळवारी रात्री ११.३० वाजता संक्रांतीच्या दिवशी रात्री मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी फ्लॅटवर जात प्रदीपचा गळा चिरुन त्याला मारून टाकले. प्रदीप सोबत फ्लॅटवर त्याचा भाऊ आणि ३ मित्र राहत होते. सायंकाळी त्याचा भाऊ व अन्य मित्र बाहेर गेले होते. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीप मृतावस्थेतच त्यांना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अद्यापही या खुनाचं कारण अस्पष्ट आहे.