नवी दिल्ली: खोखो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. भारतीय संघाने विश्वचषकमधील आजच्या सामन्याला पेरू संघाला अक्षऱश लोळवले. त्यांनी पेरूला दोन्ही टर्न मिळून ७०-३८ असे हरवले.
पहिल्या टर्नमध्ये भारताने पहिल्यांदा आक्रमण करताना ३६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तराला पेरूच्या संघाने त्यानंतर १६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही भारताने आपले आक्रमण जबरदस्त ठेवले. भारतीय संघाने दुसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करताना निर्धारित वेळात ७० गुणांपर्यंत मजल मारली. त्यानंतर चौथ्या टर्नमध्ये पेरूच्या संघाला आक्रमणाला केवळ ३८ गुणांपर्यंत मजल मारता आली.
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताने नेपाळला ४२-३७ असे हरवले होते. खरंतर नेपाळने पहिल्या सामन्यात भारताला चांगली टक्कर दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ब्राझीलला ६४-३४ असे हरवत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर आता भारतीय संघाने विजयी हॅटट्रिक लावली आहे. तिसऱ्या सामन्यात त्यांनी पेरूला हरवले. यासोबत भारतीय संघाने ३ सामन्यांतून ६ गुण मिळवले आहेत. भारत ग्रुप ए मध्ये खेळत आहे. यासोबतच भारताने ग्रुप एमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.