बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणाचा आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. वाल्मिक विरोधात मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू आहे. याआधी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सात आरोपींविरोधात मकोकाची (MAHARASHTRA CONTROL OF ORGANISED CRIME ACT / MCOCA) कलमे लावण्याचा निर्णय झाला होता. आता यात वाल्मीकचाही समावेश झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या, मकोका अंतर्गत या आठ जणांवर होणार कारवाई : सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले, सिद्धार्थ सोनवणे, वाल्मिक कराड
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात वाल्मिक कराड विरोधातील कारवाईचा निषेध म्हणून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी परळी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात वाल्मिक कराडची पत्नी आणि आई पण सहभागी आहेत. वाल्मिक कराडला बळीचा बकरा बनवले जात आहे. त्याने कोणाचीही हत्या केलेली नाही; असे वाल्मिक कराडच्या कुटुंबातील सदस्य आणि समर्थकांचे म्हणणे आहे. तर पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगितले.
एसआयटीकडून युक्तिवाद करत असलेल्या सरकारी वकिलाने मांडलेले मुद्दे
संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराडने आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याशी दहा मिनिटे फोनवर चर्चा केली.
संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते ३.१५ दरम्यान अपहरण झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद. वाल्मिक कराडने त्याच दिवशी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याशी दुपारी ३.२० ते ३.४० दरम्यान वारंवार फोनवर चर्चा केली.
आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि मग हत्या केली. आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले
आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार. फरार असलेल्या आरोपीला कोण मदत करत आहे याचा तपास सुरू आहे.
वाल्मिक कराडच्या विदेशातील मालमत्तेची चौकशी सुरू आहे.
आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंधांची चौकशी सुरू आहे. घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते, त्यांना फरार असतानाच्या काळात कोणी मदत केली याचा तपास सुरू आहे.
सरकारी वकिलांनी यावेळी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल का केला, याची माहिती दिली. वाल्मिक कराडवर याआधी दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांची माहिती दिली.