हिवाळ्यात थंड वारे आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे त्वचा सारखी कोरडी पडते. हात-पाय, चेहरा यांच्यासोबतच डोळ्यांच्या पापण्यासुद्धा काही वेळा कोरड्या होतात. यामागे इतरही अनेक कारणे आहेत. संपूर्ण चेहऱ्यामधील डोळे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपल्या चेहऱ्यावरील सर्वात महत्वाचा व नाजूक अवयव म्हणजे डोळा. डोळ्यांच्या सौंदर्यात भर घालायची असल्यांस आपल्या भुवया आणि पापण्यांच्या केसांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. आपल्या डोळ्यांचे सौंदर्य जपण्यासाठी नेहमीच महिलांचे प्रयत्न सुरु असतात. हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा सर्व ओलावा शोषून घेते. त्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते. याचाच परिणाम म्हणून पापण्या देखील कोरड्या होऊ लागतात आणि त्यावर एक कवच तयार होतो. अशा परिस्थितीत कधी कधी डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ होणे, पाणी येणे असे प्रकार सुरू होतात. घनदाट, जाड पापण्या करण्यासाठी महिला बरेच प्रयत्न करतात. आपल्या पापण्या घनदाट, जाड नसतील तर आपण त्यावर महागड्या ट्रीटमेंट किंवा खोट्या आर्टिफिशल पापण्या लावतो. परंतु या खोट्या आर्टिफिशल पापण्या आणि महागडी ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर करुन आपण आपल्या पापण्या घनदाट, जाड करु शकतो. जर तुमच्या त्वचेसोबत तुमच्या पापण्याही कोरड्या पडत असतील तर तुम्ही त्यांना लवकरात लवकर बरे करण्याचे मार्ग शोधायला हवेत. आज आपण जाणून घेऊयात की जर डोळ्यांच्या पापण्या कोरड्या पडत असतील तर नेमके काय उपाय करायला हवेत याबद्दल.
एरंडेल तेल
एरंडेल तेल लावल्यास डोळ्याच्या खालील कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल. एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑईल. एरंडेल तेल हे केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. या तेलात असलेले मॉइश्चरायझिंग गुणधर्म आपल्या शरीराला आर्द्रता पुरवतात. हे तेल डोळ्यांना लावल्याने डोळ्यातील अश्रूंमध्ये असलेले नैसर्गिक तेल वाढण्यास मदत होते. अशा स्थितीत तुमच्या पापण्या कोरड्या होत नाहीत. डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि खाज किंवा जळजळ येण्याची समस्याही दूर होण्यास मदत होते.
गुलाबजल लावा
कधीकधी हिवाळ्यात, हीटरसमोर जास्त वेळ बसल्याने देखील पापण्या कोरड्या किंवा चिकट होऊ शकतात. यासाठी कापूस घ्या, तो हलकेच गुलाबजलामध्ये बुडवा आणि पापण्यांवर लावा. असे केल्याने तुमच्या डोळ्यांना त्वरित थंडावा आणि आराम मिळेल. पापण्या चिकट सुद्धा राहणार नाहीत व कोरडेही दिसणार नाहीत.
योग्य आहार
कधी कधी आपण नको ते प्रयोग करतो पण ते कामी येत नाही, काही तरी अपूर्ण राहूनचं जातं. पापण्या कोरड्या होण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे अपूर्ण आहार. तुमचा आहार अगदी नीट असावा तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा. संत्री, मोसंबी यासारखी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याला प्राधान्य द्या.
ग्रीन टी
थंड झालेल्या ग्रीन टी चे काही थेंब बोटांवर घेऊन त्याने पापण्यांना हलकेच मसाज करावा.
बदामाचे तेल
बदामाचे तेल त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी देखील वापरले जाते. पापण्या जाड करण्यासाठी, बदामाच्या तेलात मस्कराचा स्वच्छ ब्रश बुडवा आणि पापण्यांना लावा. असे सतत केल्याने तुमच्या पापण्यांची लवकर वाढ होईल आणि तुमची केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधनांपासून सुटका होईल.
एलोवेरा जेल
एलोवेरा जेल आपल्या त्वचेसाठी जितके चांगले असते तितकेच पापण्यांची जाडी आणि घनदाट करण्यासाठी ते अधिक प्रभावी आहे. काजळ लावण्याची स्टिक पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्याचा वापर करून पापण्यांवर कोरफड जेल लावा. या उपायाचा अवलंब करत राहिल्यास पापण्यांची वाढ झपाट्याने होते.
खोबरेल तेल
खोबरेल तेल लावल्याने पापण्यांचे केस जाड आणि घनदाट होण्यास मदत होते. पापण्यांसाठी खोबरेल तेलाचा वापर केल्यास पापण्या जाड आणि लांब होतात. रोज रात्री झोपताना पापण्यांना खोबरेल तेलाने हलक्या बोटांनी मसाज केल्यास पापण्या लांब आणि घनदाट होतात.
व्हिटॅमिन ‘ई’
व्हिटॅमिन ‘ई’ ची कॅप्सूल पापण्यांच्या वाढीसाठी अतिशय लाभदायक ठरते. व्हिटॅमिन ‘ई’ युक्त कॅप्सूलमध्ये असणारे फ्ल्युड काढून त्याचा वापर आपण पापण्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी करू शकतो. व्हिटॅमिन ‘ई’ युक्त कॅप्सूलमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे पापण्या जाड आणि घनदाट होण्यास मदत होईल.