प्रत्येकाने भावनिक दृष्टीने सुरक्षित होणे कसे आणि का आवश्यक आहे, हे आपण या लेखातून पाहणार आहोत. खरं तर भावना म्हणजेच इमोशन्स हा मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून खूप व्यापक विषय आहे. कारण आपल्या आयुष्याचा पूर्ण खेळच या भावनांवर आधारित असतो.
मीनाक्षी जगदाळे
कोणाच्याही कोणाहीबद्दल असलेल्या चांगल्या भावना म्हणजेच प्रेम, गुंतवणूक, जिव्हाळा, आत्मीयता, माया, वात्सल्य, ओढ, काळजी, समर्पण अशा अनेक गोष्टींचं एकत्रिकरण असतं. प्रत्येक मानवी नात्यात आपल्याला यातील कोणती न कोणती भावना पाहायला मिळते. भावनांशिवाय नातं अधुरं आहे कारण आपण नातं हे एकतर मनाने, आवडीने, निवडीने जोडतो किंवा रक्ताने ते जोडलेलं असतं त्यामुळे तिथं फक्त डोक्याचा किंवा बुद्धीचा, प्रॅक्टिकल वापर केलेला नसतो. प्रत्येक नात्याचा पाया हा भावना असतातच आणि भावनांच्या या खेळामुळेच आपण खूपदा अडकतो, फसतो, रडतो, स्वतःला खूप त्रास करून घेतो.
कुटुंबातील, समाजातील कोणीही दोन व्यक्ती असोत पती-पत्नी, आई-मुलं, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक या भावना जोपर्यंत दोन्ही बाजूने सारख्या प्रमाणात आहेत, त्यातील ओढ, प्रेम, नातं टिकवण्याची निभवण्याची इच्छा शक्ती सारखी आहे. त्या दोन्ही बाजूने समांतर सुरू आहेत तोपर्यंत त्या नात्याला अर्थ असतो. अनेकदा आपण बघतो खूप नाती ही एकतर्फी सुरू असतात. म्हणजेच दोघांमधील कोणीतरी एक व्यक्ती अशी असते जिचा स्वतःच्या भावनांवर कंट्रोल नसतो, आवर नसतो, ती समोरील व्यक्तीशिवाय राहू शकत नसते, त्याच्या प्रेमात पार आंधळी झालेली असते, त्याच्यात खूप गुंतून गेलेली असते. आपल्याला वाटेल हे फक्त प्रेमप्रकरण अथवा प्रियकर-प्रेयसीच उदाहरण आहे पण तसं अजिबात नाही. अगदी पती-पत्नीच्या नात्यात, भाऊ-बहिणीमध्ये, दोन मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये पण एकजण दुसऱ्याशिवाय स्वतःला अपूर्ण समजतो, असुरक्षित समजतो. म्हणून वर्षानुवर्षे ते नातं त्याच्या बाजूने निभावतो. समोरची व्यक्ती लक्ष देवो न देवो, आपली दखल घेवो न घेवो, आपल्याशी कशीही वागो आपल्याला महत्त्व देवो अथवा न देवो. एकजण बिचारा तो आपला आहे, त्याच्याशिवाय आपल्याला कोण आहे, आपल्या सोबत तर तो आहे न्, आपल्याशी बोलत तर असतो न्, भेटत तर असतो न्, थोडाफार वेळ तर देतो न्, त्याचं नसलं तरी आपलं तर त्याच्यावर प्रेम आहे न्, आपल्या तर तो रक्ताचा आहे, नात्याचा आहे, जवळचा आहे, त्याला नसूदे जाणीव, मला आहे न् त्याची जाणीव या भाबड्या आशेवर आयुष्य काढत असतो. कधीतरी त्याला माझ्या भावना समजतील, माझी जाणीव त्याला होईल हा भाबडा समज ठेवून अनेक लोकं जगतात. अशा ठिकाणी आपली खूप मोठी फसगत होत असते. आपणच स्वतःला, स्वतःच्या मनाला फसवत असतो कारण आपण फक्त मनाने, भावनेने विचार करताना डोकं, बुद्धी, विचार अजिबात वापरत नसतो. आपण आपल्या भावनांना मर्यादा घालू न शकल्यामुळे, कुठे थांबायचं ते आपल्याला न समजल्यामुळे, कोणासाठी किती करायचं? स्वतःला किती त्रास करून घेऊन करायचं याचा विचार करण्यासाठी आपण स्वतःला वेळ देत नाही आणि समोरच्या मध्ये वाहवत जात असतो.
नातं हे दोन्ही बाजूंनी टिकवलं जाणं, बहरलं जाणं गरजेचे असते. अगदी भाऊ-बहिणीचं नातं असो वा दोन मित्रांचं नातं असो त्यात दोन्ही बाजूनी प्रेमाचं, आदराचं, त्यागाचं, समजूतदारपणाचं योगदान आवश्यक असतं. चूक नसतानाही नेहमीच एकजण माघार घेतोय कारण त्याचं प्रेम आहे तर ते योग्य नाही. कायम एकजण स्वतःहून बोलायला पुढाकार घेतोय तर ते अयोग्य आहे. अनेक लोकांना वाटतं हा इगो आहे की गर्विष्ठपणा आहे; परंतु याला आत्मसन्मान म्हणतात हे अनेकांना कळत नाही. वारंवार अपमान होऊन, वारंवार लाथाडले जाऊनपण आपण परत परत एखाद्याला शरण जात असू तर तिथे आपण स्वतःला खूप स्वस्त करून घेत आहोत, आपली किंमत अशा ठिकाणी राहत नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बॅडमिंटनच्या खेळासारखं फूल खाली न पडू देण्याची जबाबदारी दोघांची असते तसंच नात्याचं असतं. या फुलासारखंच नातं जपण्यासाठी पण दोघांना कसरत करावी लागते. दोघांचा समतोल साधण्यासाठी कधी पळावं लागेल, कधी वाकावं लागेल, कधी मागे जावं लागेल, तर कधी पुढे यावं लागेल तरंच हे नातंरूपी फूल आपण अलगद हवेत झेलत राहू शकतो. दुर्दैवाने अनेक नातेसंबंधांमध्ये ही लवचिकता नसते. केवळ नातं आहे म्हणून अनेकांची आयुष्यभर फरफट होते. कधी दोघांची, तर कधी सगळ्यांचीच. हे सर्व टाळायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे प्रत्येकाला आपल्या आवास्तव भावनांना आवर घालायला जमले पाहिजे. कुटुंबात, समाजात कुठेही वावरताना, वागताना थोडंफार का होईना पण लॉजिकने विचार करणे, प्रॅक्टिकल विचार करणे, खरं-खोटंमधील फरक समजणे, चांगलं-वाईट ओळखू येणे, माणसं ओळखू येणे, त्यांचे हेतू, उद्देश, स्वभाव समजणे खूप आवश्यक आहे. कोण काय बोलत आहे, का बोलत आहे त्याचा दहा बाजूनी अभ्यास आणि विचार करता येईल इतकं स्वतःला प्रगल्भ बनवणे आवश्यक आहे. भावनांचा पाऊस तिथेच पाडावा जिथे त्याची किंमत आहे, त्याचा मान आहे जाण आहे. दुसरं कोणी काहीच करत नसतं. आपल्या भावनाच आपल्याला आयुष्यातून उठवू शकतात.
आपलं हळवं होणं, वाहवत जाणं, भावनावश होणं, चुकीचे निर्णय घेणं, समर्पित होणं, झोकून देणं, विचाराअभावी कृती करणं, व्यावहारिक वृत्तीचा विसर पडणं यामुळे आपण आपलं नुकसान करत असतो. आपण भावनेच्या आहारी जाऊन किती चुकीचे निर्णय घेतलेत हे आपल्याला भविष्यात समजते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळेच वेळोवेळी आपल्याला स्वतःच्या भावना तपासून त्या मर्यादेत ठेवणं जमलं पाहिजे. कोणी आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं, आपल्याला आपलं नुकसान होईल, असे काही निर्णय घ्यायला लावले अथवा कृत्य करायला लावले तर वेळीच सावध होणं जमलं पाहिजे. कोणत्याही नात्यातील कोणतीही भावना असो त्यामुळे जर आपण संपणार असू, आपलं अस्तित्व संपणार असेल, आपल्याला धोका होणार असेल, आपला गैरफायदा घेतला जाणार असेल तर वेळीच आपल्या भावना आवरा. ज्यांना फक्त गरजेपुरती, जे फक्त स्वार्थासाठी आपल्याला भावनिक करत आहेत अशा लोकांपासून सावध राहा. आपल्या भावनिक स्वभावाचा जे कामापुरता वापर करून घेतात, जे सतत रंग बदलतात अशा लोकांसाठी भावनांचा बाजार मांडणे मूर्खपणा होय. अशा टॉक्सिक नात्यामधून बाहेर यायचं ठरवा त्यासाठी सेल्फ लव्ह म्हणजेच स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःची मानसिक स्तरावर काळजी घेणे आवश्यक आहे. कारण असे भावनांशी खेळणारे लोकं तुम्हाला मानसिक दृष्टीने पूर्ण उद्ध्वस्त करू शकतात.