मुंबई: डिसेंबर महिना आला की शाळेमध्ये खेळांच्या स्पर्धा सुरू व्हायच्या. शाळेतले प्रसिद्ध खेळ म्हणजे खो-खो, कबड्डी. यामध्ये सरस असलेले खेळाडू मग पुढे आंतरशालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय खेळाडू म्हणून चमकत. या सगळ्याची आठवण काढायचे कारण म्हणजे खोखो विश्वचषक २०२५..
अहो ऐकलं का, वर्ल्डकप सुरू झालाय…तुम्ही म्हणाल आता तर क्रिकेटचा वर्ल्डकप सुरू नाहीये…मग आम्ही कोणत्या वर्ल्डकपबद्दल बोलतोय…क्रिकेट नाही हो, खोखोचा वर्ल्डकप सुरू झाला. खोखोच्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपला भारतात सुरूवात झालीये.
आपल्या देशात वर्ल्डकप म्हटलं की पहिला डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचाच वर्ल्डकप. मात्र आता खोखोच्या वर्ल्डकपच्या स्पर्धा रंगत आहे. जिथे कबड्डीचा जन्म झाला त्याच देशामध्ये म्हणजेच भारतात वर्ल्डकपच्या स्पर्धेला सुरूवात झालीये. आपल्या देशात क्रिकेटला जितकं ग्लॅमर, प्रसिद्धी मिळाली तितकी इतर खेळांना नाही. मात्र हळू हळू हे चित्र बदलतंय. लोकं क्रिकेट व्यतिरिक्त इतरही खेळ तितक्याच आवडीने पाहायला लागलेत. त्यात आता खोखोही सामील झाला आहे.
प्राचीन भारतातल्या सर्वात जुन्या मैदानी खेळांपैकी एक म्हणजे खोखो. भारतातील दोन जुने खेळ म्हणजे खोखो आणि कबड्डी. मातीत खेळले जाणारे हे खेळ. खोखो या खेळाचा उगम खरंतर महाराष्ट्राच्या मातीतच झाला. गेल्या अनेक वर्षांपासून हा खेळत महाराष्ट्रात खेळला जातो. हा खेळ किती वर्षे जुना आहे याची पक्की आकडेवारी खरंतर नाही मात्र बराच जुना खेळ आहे यात शंका नाही. असं मानलं जातं की हा खेळ महाभारताच्या वेळेसही होता. दरम्यान,१९१४मध्ये पुण्याच्या डेक्कन जिमखाना क्लबने या खोखोसाठीचे नियम आणि त्याची संरचना केली होती. तर खोखोची पहिली नियम पुस्तिका बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिले होते.आधी मातीवर खेळवला जाणारा हा खेळ प्रायोगिक स्तरावर म्हणून लाकडी मैदानावरही खेळवण्यात आला. दरम्यान, आता खोखो खेळाचं रूपडं बदललं आहे. आता हा खेळ मॅटवर खेळला जातो. तसंच त्याच्या अनेक नियमांमध्येही बदल करण्यात आलेत. १९३६मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये खोखोच्या खेळाचा समावेश करण्यात आला होता.
पहिल्यावहिल्या खोखोच्या विश्वचषकाची सुरूवात भारतापासून होतेय. १३ जानेवारी ते १९ जानेवारी हा वर्ल्डकप रंगणार आहे. इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड आणि अमेरिकेसह २४ देश दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर या वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये आफ्रिकेतील घाणा, केनिया, दक्षिण आफ्रिका तसेच युगांडासारखे देशही असतील. तर आशियामधील भारत, बांग्लादेश, भूतान, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका हे संघ असतील. युरोपातून इंग्लंडं, जर्मनी, नेदरलँड आणि पोलंड तर उत्तर अमेरिकेतून कॅनडा आणि अमेरिका, दक्षिण अमेरिकेतून ब्राझील आणि पेरू, तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे देश या वर्ल्डकपमध्ये खेळणार आहेत. स्पर्धेत महिला आणि पुरुष हे दोन गट असतील. दोन्हीमध्ये १६-१६ संघ भाग घेतील.
सध्याच्या घडीला जगातील तब्बल ५५ देश हा खेळ खेळतात. खोखोच्या या वर्ल्डकपमुळे हा देश जगाच्या आणखी कानाकोपऱ्यात पोहोचला जाईल हे नक्की. या वर्ल्डकपच्या निमित्ताने खोखो खेळणाऱ्या भारतीय संघाची ओळख जगाला होईल. इतकंच नव्हे तर इतर खेळांना जे आता ग्लॅमर हळू हळू मिळतंय ते वर्ल्डकपच्या निमित्ताने खोखोलाही मिळेल ही आशा करूया आणि आपल्या भारतीय खेळाडूंना वर्ल्डकपसाठी शुभेच्छा देऊया. तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शुभेच्छा पोस्ट करून भारतीय संघाला सपोर्ट करू शकता.