बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. देशमुखांच्या हत्येप्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. या हत्येचा मास्टर माईंड वाल्मिक कराड हा १ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आला होता. मात्र आता त्याला न्याय मिळावा यासाठी त्याच्या मातोश्रींनी आंदोलन केले आहे.
वाल्मिक कराडला याआधी १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज वाल्मिक कराडला केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशातच वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी राजकीय सूडबुद्धीने आणि जातीय द्वेषातून कारवाई होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. वाल्मिक कराडच्या आईसोबतच वाल्मिक कराडचे समर्थक सुद्धा आता आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी सुद्धा टॉवर चढून आंदोलनाला सुरवात केली आहे.
एकीकडे संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा भाऊ धनंजय देशमुखने काल (दि. १३) पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. आधीची एसआयटी टीम आरोपींच्या संपर्कात असल्याने ती बदलावी या त्यांच्या मागणीची आज पूर्तता होऊन १ जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय.
दरम्यान आता वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.