जाहिरात हे सर्जनशील क्षेत्र आहे. आधुनिक जगात आपला उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी लाखो सर्वसामान्य लोकांपर्यंत त्वरित पोहोचण्याचं एक साधन आहे. आपल्याकडे १४ विद्या, ६४ कला मानल्या जातात. त्यातच ६५ व्या कलेचा हा उगम म्हणावा लागेल. ज्या वस्तू किंवा गोष्टीची जाहिरात करायची ती वस्तू कितीही चांगली, दर्जेदार, उत्कृष्ट असली तरीही ती किती गरजेची आहे आणि तुम्हाला ती किती उपयोगी ठरेल हे अगदी कमी कालावधीमध्ये आकर्षकरीत्या जाहिरातीत मांडावे लागते. हे जाहिरातीचं मूळ सूत्र आहे. त्यामुळे एक उत्कृष्ट सृजनशील विचार करणारा किंवा चित्रकार, कवी माणूस चांगल्या जाहिराती करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज कांबळे.
शिबानी जोशी
ॲडव्हर्टायझिंगसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात आणि आपला मराठी माणूस ॲडव्हर्टायझिंग कंपनी चालवतो? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण होय, ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये अमेरिकेत १२ वर्षे काम करून राज कांबळे मुंबईत येऊन स्वतःची फेमस इनोव्हेशन्स ही जाहिरात कंपनी उभारून आज ११ वर्षे ते मोठमोठ्या कंपन्यांच्या जाहिराती करत आहेत. राज कांबळे हे मुंबईचे. त्यांच्या घरात आजोबा, वडील हे कोल्हापुरी चपला तयार करायचे. त्यांचं चपलांचे दुकान होतं. त्यामुळे निर्मितीचं काम ते घरातच पाहत होते; परंतु त्यांना चपला बनवायच्या नव्हत्या म्हणून त्यांनी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतली; परंतु पहिल्या काही दिवसांतच त्यांच्या लक्षात आलं की, लेक्चरमध्ये सर काय शिकवतात ते आपल्या डोक्यावरून जात आहे.
त्यामुळे त्यांनी वडिलांना सांगितलं, ” मला आर्टिस्ट व्हायचं आहे.” वडिलांना ही भानगड माहिती नव्हती. ते म्हणाले आर्टिस्ट म्हणजे तुला काय व्हायचंय? तू पेंटर होणार आहेस का? ते म्हणाले की काही माहिती नाही पण मला जे जे ला जायचंय आणि जे जे स्कूल ऑफ आर्टला राज यांनी अॅडमिशन घेतली आणि त्यांचा आयुष्य बदलून गेल.
राज कांबळे गमतीत सांगतात की, जे जे मध्ये प्रसिद्ध लेखक रुडयार्ड क्लिपलिंग यांचा जन्म झाला होता. ज्यानी जंगल बुक लिहिलं तर कदाचित त्यांचा आत्माच तिथे फिरत असावा. प्रत्येकाच्या कुंचल्याला ते एक रंग देऊन जातात असं तिथलं वातावरण आहे. सुरुवातीलाच त्यांना देशातल्या अतिशय नावाजलेल्या लिंटास कंपनीमध्ये काम करायला मिळालं. लिंटासची एक शाखा लंडन येथे होती त्यामुळे त्यांना लंडनला जाणार का? असं विचारण्यात आलं. त्यांनी लंडनला जायचं ठरवलं आणि ते लंडनला गेले. इंग्रजी चांगलं नसल्यामुळे भाषेकडे लक्ष न देता व्हिजुअली काय क्रिएटिव्ह करता येईल असा विचार करून काम केलं. अगदी युनिलिव्हरसारख्या मोठ्या कंपनीसाठी जाहिराती केल्या. पाच वर्षे लंडनला काम केल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये राज गेले. तिथे खूप शिकायला मिळालं कारण अमेरिकेत तुम्ही कुठून आलात ते बघत नाही, तुमचं काम बघतात. अमेरिकेत ११ वर्षे काम केल्यानंतर अमेरिकेतील एका व्यक्तीने तुम्ही माझ्या कंपनीत जॉईन व्हा, मी तुम्हाला कंपनीतील इक्विटी देतो म्हणजे तुम्ही या कंपनीची मुंबईत शाखा सुरू करून तुम्ही तिथे काम करा असे सांगितले. राज कांबळे यांना ही कल्पना आवडली. ती व्यक्ती अॅडव्हर्टायझिंग एजन्सीचे मालक असून एका मोठ्या वाईन यार्डचे मालक होते. राजने त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावलं त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही काय म्हणून माझ्या नवऱ्यावर विश्वास टाकत आहात? त्यावेळी ते अतिशय सुंदर वाक्य बोलले. ते वाक्य ऐकून राजने त्यांची कंपनी जॉईन करायचा ठरवलं. ते वाक्य असं होतं की मी माझ्या वाईनयार्डला एक पार्टनर घेतला आहे. त्याच्यावर विश्वास टाकून संपूर्ण बिझनेस करतो. तो पार्टनर म्हणजे गॉड. मी न पाहिलेल्या पार्टनरवर विश्वास टाकून मी संपूर्ण पैसा लावला आहे तर या बघितलेल्या माणसाला मी का पार्टनर करू नये. हे वाक्य ऐकून राज कांबळे इम्प्रेस झाले आणि न्यूयॉर्कमध्ये सेटल असलेलं आयुष्य सोडून मुंबईत आले. त्याच दरम्यान आनंद महेंद्र यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी ११ वर्षांपूर्वी स्वतःची कंपनी सुरू केली. प्रत्येक क्लायंटला फेमस करायचं आहे म्हणून कंपनीला फेमस इनोव्हेशन्स असं नाव दिलं. फेमस इनोव्हेशनतर्फे त्यांनी खूप मोठमोठ्या कंपन्यांच्या जाहिराती आतापर्यंत केल्या आहेत.
हल्ली इन्फ्लुएन्सर हा एक प्रकार सोशल मीडियावर दिसतो. अॅडव्हर्टाईस ही सुद्धा एक प्रकारचे इन्फ्लुएझरच आहे. जाहिरात ही त्या प्रॉडक्टमधला चांगला गुण शोधून तो हॅमर करते आणि ग्राहकाला ती वस्तू विकत घ्यायला उद्युक्त करते. स्टार बॉक्स गुगल अशा खूप क्रिएटिव्ह जाहिराती राज कांबळे यांनी फेमस इनोवेशन्सतर्फे केल्या आहेत. त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील १५० पुरस्कार मिळाले. त्यांच्याकडे २०० जणांची क्रिएटिव्ह टीम काम करत आहे. युनिलिव्हरच्या व्हॅसलीनची एक जाहिरात करतानाचा राज अनुभव सांगतात, ब्रिटिश क्रिकेट कॅप्टन मायकल वॉन यांनी एकदा अशी कमेंट केली की, इंडियन क्रिकेट प्लेयर बॅटला व्हॅसलीन लावतात कारण टच झाला तर आवाज होत नाही. त्याने सरळ सरळ ब्रांडच नाव घेतलं होतं त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी सकाळच्या वृत्तपत्रासाठी राज कांबळे यांनी जाहिरात केली की व्हॅसलीन या वीस गोष्टींसाठी वापरली जाते, बॅटसाठी नाही आणि त्या २० गोष्टी जाहिरातीत लिहिल्या. ज्यांना हे पटत आहे त्यांनी लाईक करावं आणि त्या जाहिरातीला दोन, अडीच मिलियन लाईक्स मिळाले होते. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी जाहिरात होते व ती प्रसिद्ध होते असं टाइमिंग जाहिरात क्षेत्रात साधायला लागतं. हळूहळू सर्वच क्षेत्रांत एआय म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स शिरकाव करत आहे. त्याबद्दल जे स्वतः क्रिएटिव्ह आहेत, त्यांना कसलीच भीती असण्याचं कारण नाही आणि एआयला स्पर्धक न मानता साथीदार मानलं पाहिजे असे ते म्हणाले. नवीन विद्यार्थ्यांना ते सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी आपोआप आपल्याकडे येईल असे सांगतात. कलाकारांना असा मंत्र देणारे राज कांबळे हे मराठी उद्योजक जाहिरातीसारख्या क्षेत्रात स्वतःची कंपनी चालवत आहेत.
joshishibani@yahoo. com