मकरसंक्रांतीनिमित्त खरेदीसाठी महिला वर्गाची झुंबड
मानसी खांबे
मुंबई : मकरसंक्रांतीचा सण दोन दिवसांवर आला असताना मुंबईतील बाजारपेठा तिळगुळ, हळदी-कुंकवाच्या वस्तू, वाणाचे साहित्य यांसह संक्रांत विशेष कपड्यांनी सजल्या आहेत. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी महिला वर्गाची खरेदीसाठी बाजारांत गर्दी उसळली होती. आठवड्यापासूनच परेल, दादर, लालबाग येथील बाजारांत वाणाचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. सुट्टीचा दिवस किंवा संध्याकाळी कामावरुन परतताना महिला वर्ग या वस्तूंची खरेदी करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या तिळाचे लाडू, तिळगुळ यांची विक्री करणाऱ्या हातगाड्या, वाणाचे साहित्य, छोट्या-छोट्या भेटवस्तू बाजारांत ठिकठिकाणी नजरेत पडत आहेत. हळदी-कुंकवाच्या वस्तूंसह छोटी-मोठी भेटवस्तू खरेदीकडे महिला वर्गाचा ओढा आहे.
भक्तीच्या महाकुंभचा आजपासून भव्य शुभारंभ, पहिले शाही स्नान आज
संक्रातीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे, पतंग, काळ्या रंगाच्या पैठणी साडीपासून विणलेली वस्त्र ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. फेस्टीव्हल विथ फॅशनच्या दुनियेत काळ्या रंगातील संक्रांत विशेष कपड्यांच्या खरेदीला मागणी आहे. विशेषतः काळ्या रंगाच्या पैठणी साडीपासून विणलेली वस्त्र ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. लहान मुलांसाठी हातमाग पैठणीचा कुर्ता-धोती, मुलींसाठी फ्रॉक, परकर, पोलके तसेच काळी नऊवारी उपलब्ध आहे. मोठ्यांसाठीचा पैठणी कुर्ता, लेहेंगा ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. विविध डिझाईनचे कुर्ते, धोती, फ्रॉक, पोलके, लेहेंगा यांना मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. कार्टून्स पतंगांना पसंती मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याची प्रथा आहे. सध्या बाजारात अनेक दुकाने रंगीबेरंगी पतंगांनी सजली आहेत. लाल, पिवळे, पांढरे अशा नानाविध रंगांतील पतंग लक्ष वेधून घेत आहेत. डोरोमॉन, नोबिता अशी चित्र असणारे कार्टून्सचे पतंग लहानग्यांच्या पसंतीला उतरत आहेत.
नव्या डिझाईनचे हलव्याचे दागिने
मकरसंक्रांतीनिमित्त लहान बाळ आणि नवदाम्पत्यांचे बोरन्हाण केले जाते. त्यावेळी ओवलेल्या हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे यंदाही बाजारपेठेत हलव्याच्या दागिन्यांमध्ये बोरमाळ, ठुशी, तन्मणी, मंगळसूत्र, बिंदी, बांगडी, शाही हर, तर लहान मुलांसाठी मुकुट, बाजूबंद, छोटे हार असे दागिने उपलब्ध आहेत. त्यात काही डिझाईन नव्याकोऱ्या असून भाव खात आहेत.