उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हाच एकमेव उद्देश्य या आघाडीचा होता. आणि सारे भाजपा द्वेष्टे त्यात सामील झाले होते. त्यात काँग्रेस होती तसेच शरद पवारांची राष्ट्रवादीही होती. पण २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना भेटायचेही नाही आणि शिवसैनिकांना तासंतास मातोश्रीवर रखडत ठेवायचे आणि स्वतःचे सारे लाड पुरवून घ्यायचे हे वर्तन सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आणि त्यानंतर काही दिवसांतच ठाकरे सरकार कोसळले. यानंतर आज विधानसभा निवडणुका होऊन रीतसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले.
या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीला आता मात्र घरघर लागली आहे असे दिसू लागले आहे. याचे कारण आहे महाविकास आघाडीच्या तिनही पक्षांत एकजूट राहिली नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपापासून या आघाडीतील खेळाला सुरुवात झाली आणि जागावाटपाचा घोळ जाणूनबुजून लांबवला गेला असे अनेक आरोप काँग्रेस तसेच संजय राऊत यांनीही केले आहेत. आता महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जागावाटपाचे खापर फोडत आहेत. पण ते मनाने एकत्र आले होते की, त्यांनी केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा पर्याय स्वीकारला होता याचा विचार केला पाहिजे. काँग्रेस आणि शिवसेना हे कधीही एकमेकांचे नैसर्गिक मित्र नव्हते. त्यामुळे ते राजकीय मजबुरीतून एकत्र आले तरी ते कितपत राहतील हा प्रश्नच होता. तसेच झाले. निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात काम केले आणि एकमेकांवर आरोपही केले. परिणामी काँग्रेसचा आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत पूर्ण सफाया झाला. आता सारेच नेते एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत आणि त्यामुळे ही आघाडी राहते की टिकते अशी स्थिती आज उद्भवली आहे. कोणतीही वैचारिक जवळीक नसलेली आघाडी कधीच राहू शकत नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
उद्धव ठाकरे जरी या आघाडीचे समन्वयक असले तरीही त्यांच्यात आता पूर्वीसारखी ताकद नाही. त्यामुळे त्यांना काँग्रेसचे नेते डोळे वटारू लागले आहेत. त्यामुळे ठाकरे यांचे वजन राहिलेले नाही आणि या आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपाशी जवळीक वाढू लागली आहे, त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. पवार हे कोणत्याही क्षणी आपल्याला डिच्चू देऊन भाजपाकडे जाऊ शकतात या भावनेने आघाडीतील इतर पक्षांना ग्रासले आहे. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. शरद पवारांनी आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. ती लक्षणीय आहे. विजय वडेट्टीवार यांनी, तर विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवाला जागावाटपास जबाबदार ठरवले आहे. यावरून महाविकास आघाडीत आता सुरळीत काहीही नाही आणि आता राजकारण कोणत्या दिशेने वळण घेईल हे सांगता येत नाही असे वाटू लागले आहे. महाविकास आघाडीत समन्वय नाही हे सर्वच नेते वरवर मान्य करत असले तरीही यावर ठोस उपाय कुणीही शोधत नाहीत. आता कोणत्याही महत्त्वाच्या निवडणुका नाहीत. राज्यातील अगदी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत आणि त्यात राजकीय पक्षांचा कस लागत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला आता साऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी भरपूर वेळ आहे. पण नेत्यांचे अहंकार आडवे येत आहेत. वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील वाद हा राज्याच्या राजकारणातील प्रमुख मुद्दा ठरला. त्यामुळे विदर्भातील काँग्रेसच्या अनेक जागा गेल्या असा दावा आता राजकीय निरीक्षकांकडून वर्तवला जात आहे. यात तथ्यही आहेच. संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे, तर काँग्रेसने संजय राऊत यांच्यावर टीकेचा रोख ठेवला आहे. यातून काय दिसले तर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात आता काहीही सुरळीत नाही. उलट दोन्ही पक्ष एकमेकांवर दुगाण्या झाडत आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही हाही आरोप आता होत आहे. हाही एक गंभीर आरोप आहे. याउलट भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी निवडणुकीत एकसंध काम केले. त्यांनी आपले मतभेद चव्हाट्यावर येऊ दिले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे आमदार एवढ्या प्रचंड संख्येने निवडून आले.
महाविकास आघाडीला भवितव्य आहे की नाही हा प्रश्न आता कळीचा ठरणार आहे. कारण या आघाडीचे भवितव्य सध्या तरी अंधकारमय दिसत आहे. आघाडीला तारेल असा नेता दूरदूर दृष्टीपथात नाही. यात लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही आघाडी आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांना कशी सामोरी जाणार हा प्रश्नच आहे. संजय राऊत, विजय वडेट्टीवार, अमोल कोल्हे हे नेते प्रतिपक्षांच्या नेत्यांवर आरोप करत आहेत आणि त्यात आघाडीचे हसे होत आहे. यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी आता जनतेसमोर आली आहे. ही फुटलेली आघाडी घेऊन हे लोक जनतेसमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत समोर जाणार आहेत. त्यामुळे त्यांचे काय होणार हे अगोदरच लक्षात आले आहे. महाविकास आघाडीतील हा पेच सोडवणे सध्या तरी अशक्य दिसतो आहे आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी यात हस्तक्षेप करूनही हा पेच सुटेल असे वाटत नाही.