Friday, February 14, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखदेवेंद्र ते देवा भाऊ...!

देवेंद्र ते देवा भाऊ…!

सुनील जावडेकर

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असे जर कोणा भविष्यवत्त्याने अथवा राजकीय पंडिताने सांगितले असते तर त्याला सर्वांनी वेड्यात काढले असते. कारण त्यावेळी एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि त्याहीपेक्षा म्हणजे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी अशी दिग्गज नावे ही भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख शर्यतीत असताना भाजपा पक्षश्रेष्ठींनी थेट यापूर्वी कोणतेही मंत्रीपद न भूषवणाऱ्या व संघटनेचे प्रदेशाध्यक्षपद हे एकमेव पद पाठीशी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली आणि प्रस्थापित राजकीय नेत्यांबरोबरच राजकीय पंडितांनाही आश्चर्याचा मोठा धक्का दिला. तत्पूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी भाजपाचे विधानसभेतील एक आमदार होते. १९९९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे सरकार गेल्यानंतर २०१४ पर्यंत म्हणजे तब्बल

१५ वर्षे शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांना, आमदारांना महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणूनच प्रमुख्याने काम करावे लागले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षाचे आमदार म्हणून सरकारवर अधिकाधिक हल्लाबोल करत प्रकाशझोतात राहण्याचा त्या काळात प्रयत्न करत असत. मात्र २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी संपादन केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची राजकीय समीकरणे ही झपाट्याने बदलू लागली. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर सर्वोच्च सत्ता स्थानी अर्थात मुख्यमंत्रीपदी नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि महाराष्ट्र भाजपाच्या बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्यालाही मोठी कलाटणी मिळाली. २०१४ ते २०१९ अशी सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वात बलवान आणि शक्तिशाली मुख्यमंत्री होते. याचे कारण म्हणजे केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत शक्तिशाली सरकार होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो किंवा अगदी संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ असो, या सर्वांची एकमुखी आणि एक हाती ताकद ही सर्वार्थाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती. अर्थात मुख्यमंत्रीपदाचा अथवा कोणत्याही मंत्रीपदाचा कोणताही अनुभव पाठीशी नसतानाही अभ्यासूवृत्ती, मुसद्दीपणा, राजकीय चातुर्य, कमालीची जिद्द आणि चिकाटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेची नशा डोक्यात जाऊ न देण्याची विनयशीलता या स्वभाव वैशिष्ट्यांच्या जोरावर देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ हा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ सहजरित्या यशस्वी पार केला.

अर्थात २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता २०२४ या काळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जमीन-आस्मानाचा झालेला फरक हा लक्षात घेण्याजोगा आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळातील मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असलेला काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोधक हा अत्यंत आक्रमकपणे सभागृहात तसेच सभागृह बाहेर देखील सातत्याने व्यक्त होत राहिला. काँग्रेस राष्ट्रवादी या भाजपाच्या परंपरागत राजकीय शत्रूंवर अक्षरशा तुटून पडणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राने या काळात अनुभवले. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात जे काही राजकीय नाट्य घडले हा काळ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल असा काळ होता, मात्र राजकीय स्थिती अनुकूल असो व प्रतिकूल त्या-त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे कमालीचा संयम बाळगत राजकीय शस्त्र परजण्यात देवेंद्र फडणीस हे पारंगत झाले होते. अर्थात तरी देखील हातातोंडाशी आलेले दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद केवळ तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे घेण्याचा एक सात्विक संताप हा सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यातून तसेच त्यांच्या देहबोलीतून या काळात व्यक्त होत राहिला. या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला संताप हा तर त्यांच्या समोरील माईकची मोडतोड करण्यापर्यंत गेला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती असलेली अपार श्रद्धा हा जरी देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य घटक असला तरी देखील तत्कालीन परिस्थितीसमोर हतबल, हताश आणि काहीसे विमनस्क स्थितीतील देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राने प्रथमच त्यावेळी पाहिले होते. अर्थात त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पडली आणि सत्तांतर झाले आणि जे एकनाथ शिंदे हे २०१४ ते २०१९ या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कामाची संधी मागत होते त्याच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली होती. त्यावेळी जरी ही बाब त्यांच्या मनाला पटली नसली तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची समजूत घातल्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देखील सव्वादोन ते अडीच वर्षे उपमुख्यमंत्री राहिले आणि केवळ उपमुख्यमंत्री म्हणून राहिले नाही, तर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे सर्वार्थाने संरक्षक बनले. उत्तम समन्वयक म्हणून त्यांनी या सरकारमध्ये काम केले. अर्थात राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीदेखील मुसद्दीपणा, चतुर राजकीय नेता हा या प्रतिकूल परिस्थितीमधूनही कशाप्रकारे यशाच्या शिखरावर जातो हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या अनुभवातून महाराष्ट्रातील प्रस्थापित आणि नवोदित राजकीय नेतृत्वाला दाखवून दिले. २०२४ मध्ये तब्बल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे आता कमालीचे बदलले आहे. त्यांच्यातील सर्वात मोठा आणि ठळकपणे दिसून येणारा बदल म्हणजे ते कमालीचे शांत आणि संयमी झाले आहेत. यापूर्वीच्या काळात त्यांच्यात दिसणारा आक्रस्ताळेपणा आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे. प्रसार माध्यमांसमोर व्यक्त होताना मोजक्या आणि कमीत कमी शब्दांमध्ये व्यक्त होण्याची कला ही त्यांनी आत्मसात केली आहे आणि सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नाव जसे भारदस्त, वजनदार आणि प्रभावी म्हणून या आधीच्या काळात परिणामकारक ठरले. त्याहीपेक्षा देवा भाऊ हे सर्वसामान्य जनतेच्या आपुलकीचे, प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे अधिक प्रतीक ठरले आहेत. त्यांच्यातील हे बदल त्यांना अधिकाधिक परिपक्वतेकडे घेऊन जाणारे तर आहेतच मात्र त्याचबरोबर राज्यातील सर्वसामान्य जनतेशी थेट जोडणारे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -