कोकणी बाणा – सतीश पाटणकर
समुद्रसपाटीपासून साडेसहाशे मीटर उंचीवर, घनदाट अरण्याने वेढलेला आणि जैववैविध्यतेचा शालू पांघरलेल्या हिरव्यागार टेकड्यांनी कवेत घेतलेला आंबोलीचा चैतन्यमयी परिसर म्हणजे विधात्याने वेळात-वेळ काढून घडवलेलं एक वेगळंच नंदनवन आहे. महाराष्ट्रातील आंबोली या शांत गावात वसलेले हिरण्यकेशी मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक पूज्य हिंदू मंदिर आहे. अगदी नावापासूनच वेगळेपण जपणारे, आंबोली बस स्थानकापासून साधारण ४ किलोमीटर अंतरावर वसलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र. गर्द वनराईने वेढलेल्या या परिसरात वाहनतळापासून समोर येणाऱ्या हिरण्यकेशीच्या प्रवाहावरील एक सुंदर सेतू ओलांडत व मग पुढे नदी डाव्या हाताला ठेवत ५ मिनिटांची बांधून काढलेली पायवाट आपल्याला हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाकडे घेऊन जाते. हिरण्यकेशी म्हणजे हरणाच्या त्वचेसम सोनेरी केस असणारी, माता पार्वतीचेचं हे एक नाव आहे, माता पार्वतीचे, हिरण्यकेशी स्वरूपात मंदिर या ठिकाणी आहे. जोडीला, अर्थातचं शंकर भगवानही हिरण्यकेश्वर रूपात विराजमान आहेत.
पिवळ्या आणि लाल रंगसंगतीमध्ये रंगवलेल्या छोट्याशा मंदिरासमोर एक छान असं बांधून काढलेलं टाकं आहे. त्यात गोमुखातून पाणी पडण्याची व्यवस्था करून इतर भागात फरशी टाकलेली आहे. पावसाळ्यात संपूर्ण मंदिर परिसर कमीत-कमी एक-दीड फूट व पाऊस भरात असताना अगदी त्यापेक्षाही जास्त, सततच्या वाहत्या पाण्यात असतो, एक बांधीव यज्ञकुंडही इथे दिसते. दत्तगुरूंची संगमरवरी मूर्ती व गाईचे एक शिल्पही लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या छतावर शिवलिंगाची प्रतिमा आहे. वाहत्या पाण्यात सतत निथळत असलेले हे मंदिर अतिशय सुंदर दिसते. आजऱ्यातून आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे जाताना अलीकडे डाव्या अंगानं जाणारा डांबरी रस्ता तुम्हाला हळूहळू दाट जंगलाच्या दिशेने जातो.
साधारणतः तीन किलोमीटरचा रस्ता संपला की, हिरण्यकेशी मंदिरासह याच नावाने प्रचलित असलेल्या नदीच्या उगमाची भेट होते. सावंतवाडीपासून ३५ किलोमीटरवर असलेली आंबोली म्हणजे सदाहरित जंगलाने वेढलेला परिसर. कोणत्याही ऋतूत एक-दोन दिवस निसर्ग सान्निध्यात घालवण्यासाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. हंगामात दणदणीत पाऊस तुमचे मन मोहून घेतो. जून ते ऑक्टोबरदरम्यान ७५० सेमी.च्या आसपास पाऊस पडतो. एखाद्या सफरीत धुक्याची दुलई पसरलेली दिसेल. आंबोलीतील अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणिक ठिकाणांपैकी हिरण्यकेशी हे एक. हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला. सात गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका सांगितली जाते.
पावसाळ्यात थोडं जपून चालायचं. खेकड्यांची पिल्लं हमखास आपल्या पायाखाली ये-जा करताना दिसतात. मंदिर गुहेतच आहे. येथूनच नदीचा उगम झालेला दिसतो. गुहा साधारणतः अडीचशे ते तीनशे मीटर लांब आहे. मंदिरात अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो. मंदिरासमोरील मुख्य कुंड पाण्याने सदोदित भरलेले असते. शेजारीच अस्थी विसर्जनाची जागा आहे. महाशिवरात्री दिवशी मंदिरात मोठा उत्सव होतो. हा स्रोत पूर्वाभिमुख आहे. पुढे ही नदी आंबोलीतून आजरा तालुक्यात प्रवेश करते. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे घटप्रभा नदीला मिळते. हिरण्यकेशी नदीवर आजरा येथे रामतीर्थ धबधबा आहे. तेथे एक प्राचीन राममंदिर आहे. रामतीर्थाजवळून गावं-गावं ओलांडून गडहिंग्लज शहर ओलांडून कर्नाटक राज्याकडे मार्गस्थ होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली हिरण्यकेशी येथील २.११ हेआर क्षेत्रामध्ये ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ अर्थात देवाचा मासा ही दुर्मीळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविकविविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदुर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टिका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविकविविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मीळ असून ती मौजे आंबोली गावातील हिरण्यकेशी या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)