अॅड. रिया करंजकर
शहरांमध्ये घर असेल, तर अनेक लोकं आपली राहती घरं भाड्याने देऊन पैसा कमवतात. काही लोकं तर अशी आहेत की, राहतं घर जास्त किमतीने भाड्याने देऊन स्वतःही लांब कुठेतरी कमी पैशांमध्ये भाड्याने राहायला जातात. ज्यावेळी घर भाड्याने दिलं जातं त्यावेळी भाडोत्री शोधण्याचं काम हे दलाल लोक करतात. कारण घर मालकाला कोणाला घर भाड्याने पाहिजे हे माहीत नसतं. त्याच्यामुळे दलालांची एक टोळीच शहरांमध्ये कार्यरत असते. ही दलाल लोकं रूम मालकाकडून एक भाडं आणि भाडोत्रीकडून एक भाडं असं घेतात. जर ते घर परत ११ महिन्याने वाढवून घ्यायचं असेल तर परत त्याच पद्धतीने दोघांकडून भाडे घेतली जातात. काही दलाल तर भाड्याने देणारं घर हे आपल्याच ताब्यामध्ये कसं राहील याकडे त्यांचा कल असतो. यात काही दलाल लोकांकडे लायसन असतं व काही लोक ओळख म्हणून हे काम करत असतात.
सदाला आपलं घर भाड्याने द्यायचं होतं म्हणून तो भाडोत्री शोधत होता. त्याच्याच परिसरामध्ये रमेश त्याला बोलला की, माझा एक ओळखीचा भाडोत्री आहे त्याला मी विचारतो. तोही घर शोधत आहे. सदा त्याला बोलला बघ विचारून. रमेश त्या भाडोत्रीला घर बघायला घेऊन आला. त्या भाडोत्रीला ते घर पसंत पडलं आणि ३०००० डिपॉझिट व महिन्याला दहा हजार भाडे ठरविण्यात आले. सदाला घराला रंग मारायचा होता पण सदाला काही रंग मारायला वेळ मिळाला नाही. भाडोत्रीलाही गरज होती कारण त्याला पहिला रूम खाली करायचा होता म्हणून त्याने तीस हजार रुपये दलालाकडे दिले म्हणजेच रमेशकडे दिले. रमेशनेही सदाला मला डिपॉझिटचे पैसे आलेले आहेत. लिव्ह अँड लायसन्स एग्रीमेंट बनवूया असं सांगितलं. त्यासाठी वकील बघतोय असे त्यांनी सांगितलं. सदाला वाटले की रमेशकडे डिपॉझिट आलेलं आहे ज्यावेळी आपलं एग्रीमेंट होईल त्यावेळी ते पैसे मिळतील असा विश्वास निर्माण झाला. भाडोत्रीही म्हणाला की, मी तुमच्या दलालाकडे डिपॉझिट दिलेला आहे. मला घर झाडण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी चावी द्या. म्हणजे ज्यावेळी आपल्यामध्ये करार होईल त्यावेळी मला राहायला यायला बरं पडेल. दलालाकडे डिपॉझिट आल्यामुळे सदाने घर साफ करायला भाडोत्रीला चावी दिली. भाडोत्रीने घराची साफसफाई केली. चार दिवस झाले तरी करार होत नसल्यामुळे भाडोत्रीने आपले सामान घरात आणून ठेवले.
सदाला ही गोष्ट समजताच सदाने भाडोत्रीला विचारलं मी तुला साफसफाई करायला चावी दिलेली तुम्ही राहायला कसे काय आलात, तर भाडोत्री म्हणाला की, आम्ही डिपॉझिटचे पैसे रमेशकडे दिलेले आहेत. किती दिवस आम्ही दुसऱ्या घरात राहून तिथले भाडं भरणार. तुम्हाला लिव्ह अँड लायसन्स एग्रीमेंट लवकर करा म्हणून सांगितलं होतं. आम्हाला दोन्ही भाडे जमणार नाही. त्यावेळी सदा त्यांना म्हणाला की, तुम्ही मला न विचारता रमेशला डिपॉझिट दिलं पण रमेशने अजूनपर्यंत मला दिलेलं नाही. जर पैसेच मला मिळाले नाही तर मी एग्रीमेंट तरी कसं बनवणार? रमेशला सदा आणि भाडोत्री फोन करू लागले. त्यावेळी त्याचा फोन बंद येत होता. भाडोत्री घरातून बाहेर पडायला तयार नव्हता. शेवटी एक महिना वाट बघून सदा पोलीस स्टेशनला गेला आणि घडलेला सर्व प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी भाडोत्रीला बोलवून घेतलं. पोलिसांनी विचारल्यावर भाडोत्री म्हणाला की, आम्ही रमेशला पैसे दिले आहेत. त्यामुळे आम्हाला या घरात राहण्याचा अधिकार आहे. एवढेच नाही तर त्या दलालाने आमच्याकडून एक महिन्याचे भाडंसुद्धा घेतलं. त्यावेळेस सदा म्हणाला तुम्ही त्याला भाडं दिलात, त्याला डिपॉझिट दिलात हे मला सांगून केलेलं का? नाही. त्याने फोन केल्यावर मला डिपॉझिट मिळाले आता आपण एग्रीमेंट करू असं सांगितलं पण तो काय आला नाही. तुम्ही घर साफसफाई करण्यासाठी चावी घेतली आणि घरातच घुसला कुठलाही एग्रीमेंट न करता. माझं घर आहे त्याच्यामुळे तुम्ही घरातून बाहेर निघा एक महिना मी तुम्हाला राहायला दिलं आता राहायला देणार नाही.
पोलीस स्टेशनमध्ये भाडोत्री म्हणायला लागले की, आम्हाला हे घर भाड्याने मिळालं म्हणून आम्ही पहिलं घर सोडलं आणि आता आमचे पैसे अडकलेले आहेत आम्ही दुसरे घर बघणार कुठे. म्हणून पोलिसांनी रमेशची शोधाशोध केली आणि त्याच्या घरचा शोध घेऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणले, तर तो हे पैसे घेऊन गावी गेला होता. कारण तो मुळातच दारुड्या माणूस होता. पोलीस स्टेशनला रमेश खोटं बोलला की मी पैसे घेतले नाहीत. त्यावेळी भाडोत्रीने गुगल पे ने पेमेंट केलेले दाखवल्यावर तो तयार झाला की, मला पैसे आलेले आहेत पण आता माझ्याकडे पैसे नाहीत कारण ते पैसे माझ्याकडून खर्च झाले. मी सदाला थोडे थोडे पैसे देतो. त्यावेळेस सदा पोलीस स्टेशनला बोलला की रमेशला सांगा की त्याने पैसे घेतलेले आहेत त्याने भाडोत्रींना थोडं थोडं द्यावे आणि माझ्या घरातून भाडोत्री काढावेत. घर कोणाचं, डिपॉझिट घेतले कोणी, खर्च करतोय कोण आणि घरामध्ये राहायला गेलं कोण.