विवेकानंदानी आपली हिंदू संस्कृती जोपासत लोकांच्या काळजाला हात घातला. त्या दिवसापासून उभी अमेरिका नव्हे जगातील लोक विवेकानंदांना ओळखू लागले. एक पुस्तक स्वामींना कधीही दोनदा वाचायला लागले नाही. वाचता वाचता कळत असे आणि वाचलेले लक्षांत राहत असे. अशी त्यांची एकाग्रता आणि प्रखर बुद्धिमत्ता होती.
मृणालिनी कुलकर्णी
कागोच्या (१८९३) जागतिक धर्मपरिषदेत, ‘‘माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधुनो… ’’ असे बोलून विवेकानंदांनी आपली हिंदू संस्कृती जोपासत लोकांच्या काळजाला हात घातला. त्या दिवसापासून उभी अमेरिका नव्हे जगातील लोक विवेकानंदांना ओळखू लागले. एक हिंदू संन्यासी इंग्रजीतून बोलतो याचे प्रथमतः सर्वांना आश्चर्य वाटले. त्या दिवसापासून प्रगल्भ, प्रगत अशा अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशात साडेतीन वर्षे दिवसाला दोन किंवा तीन व्याख्यानातून भारतीय हिंदू धर्मान्तर्गत वेदांत, योगा यांचा लोकांना परिचय करून दिला. प्रत्येकवेळी गुरू रामकृष्ण परमहंस यांचे स्मरण करताना, ‘‘नोरेन, अखिल जगतात अध्यात्मिक क्रांती कारण्याची शक्ती मी तुला दिली आहे, तिचा उपयोग कर,” हे शब्द त्यांना आठवत. एकाने एकदा विचारले, “तुमच्या बौद्धिक ऐश्वर्याचे रहस्य काय?” ते म्हणाले, ‘‘व्रतस्थ जीवन’’ व्रतस्थ म्हणजे कर्मठ नव्हे. ते कमालीचे मोकळे होते. तेवढेच संयमी आणि विवेकी होते. त्यांच्या सोबतचा तुमच्याशी लग्न आणि तुमच्यासारखाच पुत्र हा प्रसंग सर्वसृत आहे. त्यांचे विवेकी उत्तर, मलाच तुमचा पुत्र माना आणि स्त्री मला प्रिय आहे आई म्हणून. गुरुदेव सांगत, “जतो दिन बांची, ततो दिन सिखी” या वचनाप्रमाणे विवेकानंद शेवटच्या श्वासापर्यंत शिकत होते. बी. ए. पर्यंत शिक्षण तरीही वाचनाचा व्यासंग अफाट. विवेकानंद म्हणत, ‘‘आम्ही वैदिक देशातून आल्याने सारे वेद, सर्व ज्ञानकोष आमच्या मस्तकात. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातही पारंगत. एक पुस्तक स्वामींना कधीही दोनदा वाचायला लागले नाही. वाचता वाचता कळत असे आणि वाचलेले लक्षांत राहत असे. अशी त्यांची एकाग्रता आणि प्रखर बुद्धिमत्ता.
रामकृष्णांनी धर्मक्रांतीचा ध्वज उभारण्यासाठी अनेक संन्यासी घडविले. भारत ही धर्मभूमी आहे. इथे धर्माकडे दुर्लक्ष न करता धर्माची व्यापक भूमिका रामकृष्ण परमहंसने आपल्या आयुष्यात सिद्ध केली. त्यात त्यांचा कोणताही आग्रह नव्हता. ते म्हणत, गंध उभे, आडवे किंवा तिरपे कसेही लावा. अशा बाह्य लक्षणांचा स्तोम माजवू नका. जे काही चराचरांत अस्तित्व आहे त्यांच्यामागे युनिटी आहे. जगातील सर्व धर्माचे मूलतत्त्व एकच आहे. त्याचे अाविष्कार अनंत असू शकतात. अंतर्यामी धर्म एकच असतो. तसेच सगळ्या वस्तू आणि प्राणिमात्रांमध्ये परमेश्वराचा वास असतो. रामकृष्णांना असे वाटत होते, मी जे पाहिले, मी जे अनुभवले ते माझ्या शिष्यांनी जगाला सांगावे. जग तपासून घेण्याचे कार्य करेल. स्वतः रामकृष्ण अत्यंत सत्यनिष्ठ होते. द्रष्टे होते. पुढे नरेंद्र (विवेकानंद) युरोप, अमेरिकेत धर्मप्रचारासाठी जाणार, काहीकाळ वास्तव्य करणार हे ते जाणत होते. खाण्यापिण्याच्या धर्माशी सुतराम संबंध नाही.
विवेकानंद म्हणतात, “धर्म हा माणसाचा आणि माणसांसाठी असला पाहिजे. समाजसेवा हेही एक धर्मतत्त्व मानले आहे. धर्म हा क्रियाप्रवण हवा. अमेरिकन मिशनरी लोकांची सेवा करतात. बसून नुसता जप करीत नाहीत. समाजप्रवणता हाही धर्माचा स्थायी भाव असावा. या विचाराची उभ्या जगाला गरज आहे. निधर्मी म्हणजे धर्मावरून त्याच्याकडील गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. याहीपुढे विवेकानंद म्हणतात, “धर्मांतर न करता कुठल्याही पंथाचा, संप्रदायाचा माणूस वेदांती होऊ शकतो.
प्रथम देशातील लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवू. “उपाशी पोटी धर्म होत नसतो. पूर्वीचे देव आता जुने झाले. आपल्याला हिंदुस्थान हा एक नवा देश, नवा वेद, नवा धर्म बनवायचा आहे. माझ्या देशातल्या अन्नवस्त्रहिन बांधवांच्या मदतीसाठी मी अमेरिकेत गेलो. तेही माझ्या गुरुदेवांच्या प्रेरणेमुळे. भारतातल्या दरिद्री लोकांसाठी आम्ही संन्याशाने काय केले पाहिजे हा प्रश्न त्यांच्या मनात सतत पाठलाग करत होता. भारताला, भारतातील लोकांना जाणून घेण्यासाठी, गुरुदेवांचे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंदांनी भारतभर भ्रमंती केली होती. त्या भ्रमंतीत, १. विवेकानंदांचे संस्कृत भाषेतील ज्ञान आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व ऐकता, नरेंद्रला तुम्ही पश्चिमेकडील देशात जावे, तेथे तुमचा गौरव होईल असे एका महाराष्ट्रीय माणसाने प्रथम सांगितले होते. २. अल्वारचे महाराज विवेकानंदांना म्हणाले, “माझा तुमच्या मूर्ती पूजेवर विश्वास नाही. लाकूड, माती, दगड यांत कधी तरी देवत्व असू शकते का? विवेकानंदांनी तेथे असलेल्या महाराजांच्या तसबिरीवर त्यांच्या सरदारांना थुंकायला सांगितले. कोणीही तयार होईना. विवेकानंद म्हणाले, “जसे तुमचे सरदार तुम्हाला तसबिरीत पाहताच कोणीही थुंकले नाही तसे श्रद्धाळू माणसं मूर्तीत ईश्वर पाहतात. ३. विवेकानंदांची हुशारी पाहता ते भगवी वस्त्रे का घालतात? विवेकानंद म्हणाले, मी स्वतः भिक्षेवर जगतो. कुणी काही मागितले तर देणं माझं कर्तव्य आहे. भगव्या कपड्यामुळे माझ्याकडे भिकारीसुद्धा काही मागत नाही.
विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी कलकत्याला, वाडवडिलांपासून चालत आलेल्या कायदेपंडितांच्या दत्त घराण्यात झाला. आई धार्मिक, वडील समाजभिमुख. घरातील साऱ्यांनी इंग्रजी, संस्कृत, बंगाली, पर्शियन या चारी भाषांचे तसेच संगीताचे शिक्षण घेतल्या घरांत वाढत होता. मनाप्रमाणे सगळीकडे हुंदडत, शरीरसंवर्धनाचे महत्त्व जाणत असल्याने लहानपणापासून व्यायाम करीत, फुटबॉल खेळत. त्यांचे प्रसिद्ध कोट, ”फुटबॉलला अशी किक मारा, तो आकाशात परमेश्वराजवळ पोहोचेल. व्यायामापुढे भगवतगीतेचे पठणही क्षुद्र आहे असे ते म्हणत. दुबळ्या शरीराने परमेश्वराची साधना होऊ शकत नाही. रामकृष्ण परमहंसानेही आपल्या शिष्यांना दीक्षा देण्यापूर्वी त्यांची देहयष्टी तपासली होती. छातीवर ठोके मारून पहिले होते. लहानपणापासून नरेंद्र स्पष्ट वक्ते होते. अनुभवाशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.
१. वडिलांच्या वकिली पेशामुळे त्यांच्याकडे अनेकजण येत. एकदा प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे ठेवलेले हुक्के नरेंद्रने ओढून बघितले. सगळ्या हुक्क्यातून बाहेर पडणारा दर्प तोच. वडिलांनी ओरडताच नरेंद्र म्हणाला, प्रत्येक जातीचा हुक्का वेगळा का? याचे उत्तर मी शोधत होतो.
२. शेजारी राहणारी लोहारीण छोट्या नरेंद्रला म्हणाली, मुंजीतील पहिली भिक्षा मी देईन. नरेंद्र हो म्हणाला. मुंजीचे संस्कार होताच छोटा नरेंद्र झोळी घेऊन लोहारणीकडे निघाला. वाटेत थोरल्या बंधूने आपण ब्राह्मण तिच्याकडून भिक्षा घेत नाही असे सांगितले. छोटा नरेंद्र म्हणाला, मी दिलेला शब्द पाळला नाही तर मला जानवं घालायचा अधिकार नाही.
लहानपणापासून “हे असंच का?” या प्रश्नाभोवती त्याचे मन घुटमळत असे. जगात ईश्वर आहे का? ईश्वराला तुम्ही पाहिलेत का? याचे कोणाकडूनही उत्तर न मिळाल्याने नरेंद्र नास्तिक बनला. ऐन तारुण्यात गुरू रामकृष्ण परमहंस यांचा सहवास लाभला. तोच प्रश्न त्यांना विचारताच ते म्हणाले, होय! जसा मी तुला आता पाहतो. तुझ्याशी बोलतो, तसेच मी ईश्वराला अगदी जवळून पाहतो, बोलतोसुद्धा. ईश्वराला पाहण्यासाठी फक्त अंतःकरणापासून तितकी ओढ, व्याकुळता हवी. उत्सुकतेने नरेंद्रने विचारले, ”ईश्वर सर्वत्र आहे तर तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन उपासना कशासाठी करता? ओसरीवर कालीमातेची पूजा का करीत नाही? सद्गुरू म्हणाले, “ईश्वराची व्याप्ती सर्वत्र आहे हे खरे आहे, तरी उपासनेच्या वेळी परमेश्वर मर्यादित ठिकाणी पाहावा लागतो. त्यावेळी तो गाभाऱ्यात शोधावा लागतो.
नरेंद्र बी. ए. ला असताना त्यांचे वडील वारले. नोकरीचा शोध घेताना आपली आई, भावंडे सदोदित उपाशी आहेत आणि मी काही करू शकत नाही या उद्विग्न अवस्थेत असताना परमहंस म्हणाले, ”तू तुझा प्रश्न कालीमातेला सांग” नरेंद्राचा विश्वास नसताना एके रात्री तीन वेळा ते कालीमातेच्या मंदिरात गेले. गाभाऱ्यात देवी प्रत्यक्ष दिसल्यावर नतमस्तक होत स्वतःसाठी, कुटुंबासाठीही काहीही न मागता नरेंद्र म्हणाले, ‘माते! मला ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे ‘… त्या दिवसापासून नरेंद्राच्या कुटुंबाच्या गरजा पूर्णं होत गेल्या हे खरं! विवेकानंद म्हणतात “मी माझ्या गुरुदेवाचं प्रतिबिंब आहे” “ही माणसे मुलांना दिसली पाहिजेत, दाखवली पाहिजेत.” यासाठी विवेकानंदांची जयंती साजरी करायला हवी. स्वामी विवेकानंदांना माझा नमस्कार !