श्रीनिवास बेलसरे
अत्यंत मनस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या सुरेश भटांना उद्ध्वस्तता, प्रतारणा, शेवट, मृत्यू यांचे एक गूढ आकर्षण होते. त्यांच्या अनेक गझलातून ते प्रतीत होत असते. तसे पाहिले तर ‘जग जसे आहे तसे मान्य नसणे’ हेच तर मोठ्या कलाकाराचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट करत असते. सच्चा कलाकार त्याच्या मनात एक वेगळेच जग उभे करत असतो. त्याच्या कलाकृती त्याच काल्पनिक जगाची प्रतीबिंबे असतात. नाजूक, हळव्या मनाच्या कलाकाराला, विशेषत: कवीला जग आहे त्यापेक्षा अधिक सुंदर हवे असते. त्याच्या मनात एक अधिक संवेदनशील, अधिक सौम्य, अधिक उदार, अशा जगाचे कल्पनाचित्र सतत उमटत असते आणि वास्तवाच्या कठोर जाणिवेने ते सतत पुसलेही जात असते. प्रत्यक्ष जगण्यातले वास्तव, तर त्याच्या मनाला क्षणोक्षणी खुपण्याइतके टोकदार असते. सुरेश भटांनाही जग आहे तसे मान्यच नव्हते. त्यातली विषमता, स्वार्थपरायणता, प्रतारणा, मानवी मनाचा क्षुद्रपणा, संवेदनहीनता याचा त्यांनी नेहमी धिक्कार केला. त्यांना आहे तसे जगाचे रूप फारसे कधी रुचले नाही. त्यामुळे हे सगळे नाकारण्याबरोबरच इथून निघून जायचे, मृत्यूचे विचारही त्यांच्या मनात नेहमी डोकावत. या भावनेचे प्रतिबिंब त्यांच्या गझलात पडताना दिसते. त्यांची एक गझल तर जणू जगाचा निरोप घेतानाचे जीवलग व्यक्तीशी केलेले हितगुजच वाटते. स्वत:शीच बोलल्यासारखे ते विचारतात- ‘आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले? माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?’ असल्या स्वार्थी, भावनाशुन्य, रुक्ष जगात जगत राहण्यात कवीला काहीही रुची राहिलेली नाही. म्हणून तो म्हणतो, आता मी फार वेळ या जगात नाही. संपत आलाय हा प्रवास! कवी स्वत:च्या आजवरच्या अस्तित्वालाही फार काही महत्त्व देत नाही.
मृत्यूनंतरचा विचार आधीच करून तो स्वत:ला केवळ दहनानंतर स्मशानात शिल्लक राहणारी राख समजतो आणि स्वत:लाच विचारतो, ‘माझ्या धुळीचे येथे किती कण राहिले?’ तारुण्यातील स्वप्ने विरली आहेत. रोमांचक निशा संपली आहे. सौम्य, मंद, चंदेरी प्रकाशात चमचमणारे चांदणे तर पूर्णपणे विझले आहे. आयुष्यातला सगळा शृंगार संपला आहे. ‘माझ्याकडे आता शिल्लक आहे ते फक्त तुझे आपलेपण, तुझे प्रेम.’ ‘मग माझ्या प्राणाची ही निस्तेज ज्योत अजून का तेवते आहे’ असे तो प्रियेला विचारतो. शेवटी आवडलेले सगळे निघूनच जाते, संपते. सगळी सुखे, आनंदाचा सगळा आभास ही खरे तर आयुष्याने केलेली आपली एक फसवणूकच असते. आता माझा आत्मा अजून कोणत्या मायावी सुखाच्या निमंत्रणाची वाट पाहतो आहे? ‘हृदयात विझला चंद्रमा, नयनी न उरल्या तारका, नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले, अजुनी कुणास्तव तेवतो, हा मंद प्राणाचा दिवा? अजुनी मला फसवायला, हे कुठले निमंत्रण राहिले?’ कवी आज जरी खूप उदास असला, विरक्त झाला असला तरी त्याची मूळ वृत्ती जीवनासक्त होती. एकंदर आयुष्याने त्याला कितीही निराश केलेले असले तरी आजूबाजूच्या प्रियजनात त्याचे मन गुंतले होते. म्हणून एकीकडे त्याला ही हुरहूर आहे की, माझ्या जवळचे जे लोक आधीच हे जग सोडून गेले त्यांनी खूप घाई केली. पण मी मात्र कितीही दुखी असलो, तरी माझे मन अजून जिवलगात गुंतलेले आहे. शेवटचा निरोप घेतानाही मी पुन:पुन्हा मागे वळून अजून कोण मागे राहून गेले, ते पाहतोच आहे. ‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबुनी पाहतो, मागे कितीजण राहिले?’ सुरेश भटांच्या कविता वाचताना त्यांना दु:ख, वेदना, निराशा याबद्दल एक अनाकलनीय आकर्षणच होते असे म्हणावे लागते. कारण ते क्वचितच जीवनातले आनंदी क्षण नोंदवताना दिसतात. ‘मला जीवनाची सुखद बाजू दिसलीच नाही. आयुष्याने फक्त दु:खच दाखवले’ अशी त्यांची सुप्त तक्रार आहे. पण त्या वास्तवाचे वर्णनही हा कवी कसे करतो पाहा. ते म्हणतात मला हुंदक्यांनी ‘हृदयाशी घट्ट कवटाळून’ धरले. जणू हुंदके हे कवीचे कुणी प्रियजन होते आणि त्यांनी म्हणे त्याला सुख नावाच्या वेदनेपासून सुरक्षित ठेवले. किती आगळी कल्पनाशक्ती आणि किती बेफाट प्रतिमासृष्टी! हुंदक्यानीच हृदयाशी कवटाळल्यावर दु:ख हेच कवीचे जिवलग झाले. मग त्याच्यावर कसला रोष, त्याच्याशी कसला परकेपणा ठेवायचा? माझ्या दु:खाशी आता काहीच भांडण नाही. उलट त्याच्याशीच सख्य जमले आहे, असे हा कलंदर कवी सांगतो !
‘कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके, माझे आता दु:खासवे, काही न भांडण राहिले!’ जाता-जाता त्याला प्रियेला मात्र एक गोष्ट जतावून सांगायची आहे. मी तुला दिलेला शब्द आयुष्यभर पाळला, तुझ्यावर मनापासून प्रेमच करत आलो हेही तो तिला किती काव्यमयपणे सांगतो पहा- ‘होता न साधा एवढा, जो शब्द मी तुजला दिला, एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण राहिले!’ माझ्याकडे तुला द्यायला फार काही नव्हते, पण मी दिलेल्या एका वचनासाठी मी उभे आयुष्य तारण म्हणून तुझ्या स्वाधीन केले होते असे कविता प्रेयसीला जतावतो. अखेरच्या क्षणी कवीला आयुष्यभर भोगलेल्या वेदनांची आठवण व्यथित करते. त्याच्या हळव्या मनावर किती आघात झाले, हृदयात नेहमीच होणारी घालमेल, त्यातून आलेली अस्वस्थता आणि तिची असह्य झळ त्याला कशी मुकाटपणे सोसावी लागली ते त्याला आठवून काहीशा त्राग्याने तो नियतीला विचारतो, ‘मला छळण्याचे तू केलेले अजून किती पण बाकी आहेत ते तरी सांग- ‘अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले?’ एकंदर आयुष्य कसे व्यर्थ गेले. सगळे सोसूनसुद्धा सुखाचे चार क्षणही नशिबात आले नाहीत, कायम वंचनेनेच साथ दिली. माझ्या घरात नेहमी वैफल्य, वंचना, दु:खच नांदले. या अशा संपत्तीने भरलेले माझे घर काही बघण्यासारखे नव्हते. माझ्या त्या एकमेव आश्रयस्थानाच्या दारात एक तोरण बांधलेले आहे. ते मात्र अजून शाबूत राहिले आहे! त्या दाराला बांधलेले, अश्रुंचा एक-एक थेंब गुंफून तयार केलेले चमचमते तोरण तेवढे माझी ओळख देत उभे आहे. ‘ओसाड माझे घर मुळी, नाही बघायासारखे, हे आसवांचे तेवढे, अद्याप तोरण राहिले’! केवळ संवेदनशीलतेचा जन्मजात शाप मिळाल्याने हे कवी केवढे औदासिन्य, केवढी निराशा, केवढा स्वप्नभंग, आयुष्यभर भोगत असतात त्याची कल्पनाही अस्वस्थ करून टाकते.