कथा – रमेश तांबे
एकदा एक कावळा गेला पोपटाकडे आणि म्हणाला, “चल आपण पिझ्झा खाऊ, मग खूप मज्जा येईल!” पोपट म्हणाला, “चल, चल, चल, पिझ्झ्यासोबत बर्गरदेखील खाऊ, नंतर छान कॉफी पिऊ!” पिझ्झा-बर्गर-कॉफीवर दोघांचंही एकमत झालं. पण या दोघांत पोपट मोठा चतुर होता. स्वार्थी आणि लोभी होता. साध्याभोळ्या कावळ्याच्या हे लक्षातच आले नाही.
मग दोघेही निघाले गावाकडे. थोड्याच वेळात ते बाजारपेठेत पोहोचले. कावळा पुढे झाला आणि दुकानदाराला म्हणाला, “शेठजी, शेठजी जरा ऐका ना; मला एक पिझ्झा द्या ना!” कावळ्याला बघताच शेठजीने हातातली वस्तू कावळ्याला फेकून मारली! कावळ्याने कशीबशी ती चुकवली. कावळ्याची फजिती बघून पोपट पोट धरून हसू लागला. मग कावळा म्हणाला, “हसू नको रे थांब; मी परत प्रयत्न करतो आणि तुझ्यासाठी पिझ्झा घेऊन येतो.” मग पुढच्या दुकानात जाऊन कावळा म्हणाला, “काका, काका मला एक पिझ्झा द्या ना!” कावळ्याला बघताच काकांनी हातातले पाण्याचे ग्लास फेकून मारले. कावळ्याने ते शिताफीने चुकवले आणि खाली मान घालून तो पोपटाकडे आला. पोपट कावळ्याला हसू लागला. किती बिचारा आहे हा कावळा!” मग पोपटाने कावळ्याची खूप टिंगलटवाळी केली. त्यावेळी कावळा गुपचूप आपली मान खाली घालून बसून राहिला.
पोपट म्हणाला, “आता बघ माझी कमाल” असं म्हणून पोपट दुकानात शिरला आणि शेठजीला म्हणाला, “मला एक पिझ्झा द्या ना!” आपल्या दुकानात पोपट दिसताच शेठजीला पोपट पकडण्याचा मोह झाला. त्याने पिझ्झ्याचा एक तुकडा पोपटाकडे फेकला. पोपटाने तो अलगद पकडला आणि भुर्रकन उडून कावळ्याच्या शेजारी येऊन बसला आणि एकट्यानेच संपवला. तो कावळ्याला म्हणाला, “बघ पिझ्झा असा मिळवायचा असतो. तुला काय जमणार! तू काळा तो काळाच!” कावळा मात्र हिरमुसला. तो पोपटाला म्हणाला, “अरे आपण दोघेसुद्धा खाणार होतो ना पिझ्झा!” आपण दोघे मित्र आहोत ना!” तसा पोपट म्हणाला, “चल हट कावळ्या, तुला का देऊ पिझ्झा? मी माझ्या हिमतीवर मिळवलाय. मित्र-बित्र मी काही मानत नाही आणि मैत्री अशी कुणाशी होत नसते; समजलं.”
मग पोपट पुढच्या दुकानात गेला. जिथं कावळ्याची दुसऱ्यांदा फजिती उडाली होती. कावळ्याकडे बघत बघत, हसत हसत पोपट रुबाबात दुकानात शिरला आणि शेठजीला म्हणाला, “काका काका मला एक पिझ्झा द्या ना! मग काका हळूच उठले. पिझ्झा द्यायच्या बहाण्याने त्याने पोपटालाच पकडले आणि ठेवले डांबून एका पिंजऱ्यात. आता मात्र पोपट घाबरला. आपण पिंजऱ्यातच अडकून पडणार या विचाराने तो रडायला लागला. त्याने कावळ्याला हाका मारल्या. कावळ्याने पोपटाला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण यश आले नाही.
पोपट आता दुःखी, निराश होऊन पिंजऱ्यात बसला. आपण कावळ्याला हसलो. त्याची रंगावरून, आवाजावरून टिंगलटवाळी केली. त्याला काळा म्हणून हिणवले. म्हणूनच हा पिंजरा आपल्या वाट्याला आला आहे. त्याने कावळ्याची मनोमन माफी मागितली. म्हणाला, “असं रंगावरून, आवाजावरून कोणाची टवाळी करणं योग्य नाही. हे आता मला कळलंय. खरंच मी चुकलोच!”