प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
अनेक प्रकारच्या मीटिंग्ज असतात. या ना त्या कारणाने आपण अनेकदा त्या मीटिंगचा एक भाग असतो. यानिमित्ताने मला आमच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवतोय. मी आणि माझे पती, आम्ही दोघेही आपापल्या आई-वडिलांच्या कृपेमुळे कायमच सरकारी बंगल्यांमध्ये राहिलो. पहिल्यांदाच आम्ही स्वतःचे असे घर विकत घेतले. त्या घरावर माझ्या पतीचे नाव असल्यामुळे सोसायटीच्या मीटिंगमध्ये त्याला बोलवण्यात आले. अशा प्रकारची सोसायटीची मीटिंग तो पहिल्यांदाच अनुभवणार होता. मीटिंग सोसायटीच्या आवारातच होती; परंतु ते जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा आमच्याच सोसायटीतला स्वच्छता कर्मचारी तिथे झाडू मारत होता. बाजूला क्लार्क उभा होता. ‘साहेब, जरा दाराकडे जाता का?’ त्या कर्मचाऱ्यांने विणवले. हे थोडेसे दाराकडे जाऊन उभे राहिले, तितक्यात त्या स्वच्छता कर्मचारी आणि क्लार्कने मिळून व्यवस्थित खुर्च्या लावल्या. टेबल पुसून घेतला. यांना मीटिंगची उत्सुकता एवढी होती की, ते तिथून तसूभरही हलले नाहीत. खुर्च्या लावून झाल्यावर त्या स्वच्छता कर्मचाऱ्याने यांना म्हटले, “या साहेब.” एखाद्या शिस्तप्रिय विद्यार्थ्यांसारखे हे जाऊन पहिल्या रांगेतील कोपऱ्यावरच्या खुर्चीवर बसले.
हळूहळू माणसे येऊ लागली आणि साधारणतः पंधरा-सोळा माणसे जमली. समोरच्या टेबलामागे यांच्याकडे तोंड करून चार वयोवृद्ध माणसे बसली होती. मीटिंगला सुरुवात झाली. आगत-स्वागत झाले. त्या अजेंडावर पहिला नंबरवर ‘सोसायटीच्या बिलात पाच रुपयांची वाढ करावी, असे होते.’ मी ही गोष्ट १९९२ सालची सांगत आहे. त्यावेळी आमचे सोसायटी बिल १४५ रुपये होते. या पाच रुपयांच्या वाढीमुळे दोन स्वच्छता कामगारांची सोसायटीच्या स्टाफमध्ये वाढ होणार होती. एकेक माणूस बोलायला लागला. सोसायटीच्या या बिलाच्या वाढीमुळे जणू काही जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून जाणार होती, असा काहीसा सगळ्यांचा सूर होता. स्वच्छता कर्मचारी कितीही वाढवले तरी या सोसायटीतील माणसे खिडकीतून बाहेर कचरा टाकणे थोडेच बंद करणार होते?
‘सोसायटीत असलेल्या गटारांवरची चोरून नेलेली झाकणे या वाढवलेल्या पैशांमुळे लागणार आहेत का?’, ‘आता नोकरीवर ठेवलेले हे सहा स्वच्छता कर्मचारी काढून जर नवीन सहा कर्मचारी आणले, तर हे पाच रुपये वाढवावे नाही लागणार कारण आताचे हे कर्मचारी कामचोर आहेत. नवीन ठेवलेले कर्मचारी बरोबर काम करतील, तर दोन अधिक कर्मचाऱ्यांची आपल्याला गरज पडणार नाही.’
अशा तऱ्हेने एकेकाने बोलायला सुरुवात केली. सोसायटीचा अध्यक्ष स्वतःच्या घरचा नोकर समजतो, म्हणजे तो सोसायटीचे स्वच्छतेचे काम सोडून अध्यक्षांच्या घरची आणि बाहेरची कामे करत राहतो. आणि भांडणाला सुरुवात झाली. प्रत्येकजण ओरडून काहीतरी बोलत होता. त्यामुळे कोणाचेच कोणाला नीटसे ऐकू येत नव्हते. त्यातल्या एकाने कोणाला तरी त्याच्या दारात चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क करतो, याविषयी सुनावले, तर दुसऱ्याने त्याच्या गाडीवर रोज तिसरा कोणी तरी कसा चहाचा कचरा टाकतो हे सांगितले. चौथा म्हणाला की, मी ऑफिसला जाताना तिसऱ्या मजल्यावरून बरोबर लसणाची सालं माझ्या डोक्यावर पडतात. आवाज वाढत होता, विषयांतर होत होते. कोणी तरी सद्गृहस्थ मध्यस्थी करत होते आणि सांगत होते की, आपल्या अजेंड्यावरचा पहिला विषय आहे, पाच रुपये वाढवण्याचा त्यावर आपण बोलूया पण त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते.
वैतागून हे बाहेर जाण्यासाठी वळले तसे कोषाध्यक्षांनी विचारले की, तुम्ही मीटिंग सोडून कशासाठी जात आहात? माणसे काही क्षणांसाठी बोलायची थांबली हे पाहून, हे थांबले आणि त्यांनी उत्तर दिले, “मी आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा कमीत कमी पन्नास रुपये टीप वेटरला देतो. इथे सोसायटीच्या स्वच्छतेसाठी महिन्याचे पाच रुपये वाढवण्याच्या गोष्टी चालू आहेत, तर तुमच्यापैकी एकही जण त्याला परवानगी देत नाहीये पण जोरदार विरोध करत आहे, हे पाहून मी निघतोय.” त्यांच्या आयुष्यात त्यांनी सोसायटीची ही एकमेव मीटिंग अनुभवली. “होय, खरे आहे; परंतु आपण सर्व सुज्ञ माणसांनी मीटिंगमध्ये जे जे निर्णय घेतले ते मी तंतोतंत पाळलेत. त्याला कधीच विरोध केलेला नाही.”
हे शांतपणे उतरले आणि त्याच्या सहीसाठी फॉर्म पुढे केला. या लेखात मी सोसायटीतील मीटिंग्जमधील एकच मुद्दा नमूद केलाय. आज हा लेख वाचताना आपल्याला आपापल्या सोसायटीमधील अनेक मीटिंग्ज आणि तिकडच्या चर्चा म्हणजे सरळ सरळ भांडण म्हणा ना, आठवतीलच!
कोणत्याही चांगल्या कामासाठी खूप वेळ द्यावा लागतो. जबरदस्त सहनशक्ती असावी लागते. खूप माणसांना त्यांच्या पद्धतीने समजावून सांगावे लागते. तेव्हा कुठे माणसे चांगल्या कामासाठी तयार होतात. आजच्या धावपळीच्या काळात एवढा वेळ कोणाकडे आहे? त्यामुळे नोकरीत व्यग्र असणारी तरुण पिढी फारशी सोसायटीतल्या समितीचे सदस्य होण्यासाठी उत्सुक नसते.
कोणत्याही सोसायटीत असंख्य कामे असतात आणि जो कार्यकारणीवर असतो त्याला असंख्य माणसांच्या तक्रारी सहन कराव्या लागतात. सोसायटीने कोणत्याही कामासाठी कोणालाही कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर त्या समिती सदस्यांवर पैसे खाल्ल्याचा आरोप केला जातो इ. तरीही काही वयोवृद्ध माणसे अशा सोसायटीचे सदस्य होतात, आपापली कामे चोख करतात. आपण त्यांना कोणतीही मदत न करता फक्त दोषारोप करतो, हेही चुकीचे आहे. सोसायटीतील बहुतांश सभासदांना मीटिंगसाठी वेळ नसतो किंवा मीटिंगची कार्यपद्धती त्यांना सहन होत नाही त्यामुळे सोसायटीच्या मीटिंग्जमधील निर्णय हे सोसायटीतील बोटावर मोजण्याइतकी माणसेच घेतात. मग नेमके करावे काय? सोसायटीची मीटिंग टाळणे हे चुकीचेच आहे नाही का, याचा थोडासा सुज्ञपणा विचार करूया!