लाख चुका असतील केल्या...

राजश्री वटे


जरा चुकीचे... जरा बरोबर चला दोस्त हो चुकण्यावरती बोलू काही! बरोबर वाचा, न चुकता... नाहीतर चुकण्यावरती ऐवजी चकणावरती वाचाल आणि चुकीच्या वाटेवर जाल... लाख चुका असतील केल्या... आयुष्य सरता सरता कित्येकदा ही ओळ सहज गुणगुणली जाते पण फार मोठा अर्थ दडला आहे या ओळीत! खरंच, झालेल्या चुकांचा आढावा घेतला तर खूप काही कळत जातं... आणि नकळत चुकचुकायला होतं. कां बरं अशा चुका झाल्या असतील... कसं असतं बघा... खूप चांगलं करत असता... पण! पण... एखादी चूक जरी झाली तरी ती मात्र लक्षात राहते कायम, चांगलं केलेलं विसरून!! कितीही म्हणाल ‘‘चूक भूल माफ असावी...’’ तरी नाही... चूक ही कोणाचीही कोणासाठीही झालेली असो... विसरल्या जात नाही. अहो, मनुष्य स्वभावच तो... धरून ठेवायचं... सोडून देण्याइतकं मोठं मन असतं का हो कोणाकडे? ज्याच्याकडे असं मन असेल तो संतच म्हणावा की!! माणूसच आहे चुका होणारच की... चुकलं माकलं पोटात घालावं... अन् पुढे जावं... असं जो वागेल तो सुखी!


प्रत्येकाला माहीत असतं... आपलं कुठे चुकलं पण दुसऱ्याच्या चुका शोधण्यात अन् दाखवण्यात वेळ व्यर्थ घालवला जातो. लहानपणापासून म्हातारे होईपर्यंत चुका होतच राहतात... त्यावर सतत... ‘अरेरे, चूक चूक’ करण्यात अर्थ नसतो. कोणाचं इथे काय चुकलं अन् कोणाचं तिथे काय चुकलं... अशी मनात सारखी पाल चूकचुकत राहते एखाद्याच्या! ‘इथे चुकांना माफी नाही’ असे तत्त्व बाळगणारे खूप भेटतात महाभाग!! अरे... माफ करून सुखाने जगायला शिकायचं अन् जगू द्यायचं चुकणाऱ्याला सुद्धा! यातूनच पुन्हा चुकणाऱ्याच्या हातून चुका होणार नाहीत. तुझं चुकलं... तुझं चुकलं असं जर सारखं टोचत राहिलं तर तो सुधारण्याऐवजी चुकतच राहील आणि चुकेच्या वाटेवर जाणार! अरे... आयुष्यात कितीतरी घटनांची चुकामूक होते... काही गवसतं, काही हरवतं! चुका करत करतच माणूस शहाणा होत जातो. एक म्हण ही आहे... ‘‘चुकला फकीर मशिदित...’’ ‘‘चुका’’ हा शब्द फक्त मानवी स्वभावाला अनुसरून वापरला जातो असे नाही... चुका पोटात घालाव्या म्हणतात पण त्याऐवजी ‘‘आंबटचुका’’ पोटात जातो! खरं की नाही? चालताना चुकून पाय वाकडा पडला की नेमकी चप्पल तुटते, तेव्हा चांभार ‘चुका’ (बारीक खिळा) ठोकून दुरुस्त करतो. घरात भिंतीवर सुद्धा फोटो अडकवायला अशाच चुका ठोकतात व भिंत खराब करण्याची चूक करतात... असो. चुकांना अंत नाही... वेळ चुकली की सगळं चुकतच जातं... पण वेळेवर चूक सुधारली की, आयुष्य सुधारायला वेळ लागत नाही. “ चुकभूल माफ असावी’’! आणि चुका शोधू नका!!

Comments
Add Comment

दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्ती

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे दोन विषयांनी माणसाची शक्ती जागृत होते. दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्तीने माणूस

सुगंध कर्तृत्वाचा

स्नेहधारा : पूनम राणे इयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात स्काऊट गाईडचा तास चालू होता. अनघा बाई परिसर स्वच्छता आणि

स्त्रीधन

क्राइम : अॅड. रिया करंजकर समाजामध्ये नजर टाकली, तर लग्न टिकवण्यापेक्षा घटस्फोटाचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत

देवराई

देवराई ही संकल्पना आता लोकांना नवीन नाही. पण ही संकल्पना फक्त देवाचे राखीव जंगल किंवा देवाचे वन एवढ्यापुरती न

अच्छा लगता हैं!...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे आपण नेहमी आपल्याला आवडलेल्या गाण्यांना ‘जगजीत सिंगची गझल’, ‘चित्रा सिंगची

क्षमा आणि शिक्षा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर संत एकनाथांच्या बाबतीत असं सांगतात की एकदा एकनाथ महाराज नदीवरून स्नान करून येत असताना