Thursday, January 16, 2025
Homeसाप्ताहिककोलाजइच्छा तिथे मार्ग...

इच्छा तिथे मार्ग…

पूनम राणे

लहानपणी आपण अनेक स्वप्न पाहत असतो. जसे व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर येते, तसे आपले विचार बदलतात. मग कुणाला वाटतं इंजिनीयर व्हावं, डॉक्टर व्हावं, पोस्टमन व्हावं, शिक्षक व्हावं, वैमानिक व्हावं, शास्त्रज्ञ व्हावं असं अनेकदा वाटत असलं तरी, आपले विचार सतत बदलत असतात; परंतु एकदा ध्येय निश्चित झाले आणि ध्येयासाठी प्राणपणाला लावून ध्येय साध्य करण्यासाठी झटणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच असतात. स्वतःही ध्येयपूर्तीचा आनंद घेतातच, पण इतरांनाही देतात. अशाच बेताच्या परिस्थितीत जन्माला आलेल्या, लंडनला जाऊन मास्टर डिग्री प्राप्त करून दाताची डॉ. झालेल्या डॉ. स्नेहा कुबल या व्यक्तिमत्त्वाची ओळख आज करून देणार आहे. फोनची रिंग वाजली. वेळ पहाटे ४ ची, गडबडीत डोळे चोळत तिने फोन उचलला. हॅलो, “बेटा उठलीस का?” हो, उठली पप्पा.”

हे असं नित्याचं चाललेलं होतं. पप्पा मुंबईहून लेकीला रोज ४ वाजता उठवत होते. तिच्यासोबत यांचंही जागरण चाललं होतं. आपल्या लेकीची जिद्द आणि ध्येय पूर्ण करण्याकरिता. त्याचं असं झालं, ‘‘छान मार्क मिळवून स्नेहा बारावी पास झाली. डॉ. होण्याची उत्कट इच्छा तिला होती. यासाठी लागणाऱ्या परीक्षा देण्याचं ही तिने ठरवलं; परंतु नेमकी माहिती मिळत नव्हती. मेडिकल कॉलेज प्रवेशसाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षाही तिने दिल्या. मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी मुलांना मोठ्या अग्नी दिव्यातून जावे लागते. पहाटे लवकर उठून १८ तास परिश्रम, मेहनत करणारे पालक मुलांवर स्वप्रेरणेतून परिश्रमाचे मूल्य न सांगताच घडवत असतात. अशा वातावरणात राहणारी मुले साहजिकच पालकांचे अनुकरण करतात. आई-वडील आपल्या वर्तनातून मुलांवर संस्कार घडवत असतात. पप्पा, “मला डॉक्टर व्हायचं आहे.” मुलीचे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. डॉक्टर होणे म्हणजे सेवावृत्तीचे काम, दुसऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालणे. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे. रोग निवारण्याकरिता सर्वस्व पणाला लावणे आणि डॉक्टरी पेशा एक उत्तम पेशा आहे. त्याची किंमत पैशात मोजताच येत नाही. हा सन्मानाचा पेशा आहे, असे आपल्या मुलीचे विचार सतत त्यांच्या कानावर आदळत होते. त्यांना अस्वस्थ करत होते. त्यांनी ठरवलं काही झालं तरी मुलीला डॉक्टर बनवायचे. कॉलेजमध्ये डोनेशनचे आकडे हृदयाची धडपड वाढवणारे होते. घरभर निराशा पसरली. काय करावे? अशावेळी आशेचा तेजस्वी किरण घरात डोकावला.

स्नेहाला पी. डी. पाटील यांच्या संस्थेतील वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या मुलीची जिद्द, इच्छा, महत्त्वाकांक्षा जाणून स्नेहाच्या वडिलांच्या विनम्र आग्रहास मान देऊन पी. डी. पाटील यांना विनंती केली की, हिला शिकायचे आहे, तिच्या शिक्षणात डोनेशनअभावी अडथळा निर्माण होऊ नये. चमत्कार घडला, प्रवेश पक्का झाला. एक मराठी मुलगी बेताच्या परिस्थितीतही डॉक्टर होऊ पाहतेय. हे राणेसाहेबांना विशेष भावले. त्यांनी शब्द टाकला तो पी. डी. पाटील साहेबांनी मानला. काम झाले, आता स्नेहाने आपले तन मन अभ्यासावर केंद्रित केले. ‘इच्छा तिथे मार्ग,’ कर्म करिता यश दिसे’ हे सत्य ठरले. स्नेहा आणि तिचे पिता यांचे आदर्श होते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर स्नेहा बीडीएस तर झालीच, पुढे पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी लंडनला गेली. क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे शिकू लागली. दंत शैल्य चिकित्ससेतील एका महत्त्वाच्या विषयातील पहिली आली. स्पेशल प्रास्थोडाटिक्समध्ये सर्जन झाली. प्रसंगी आई-वडिलांनी दागिनेही घाण ठेवले, कर्ज काढले पण लेकीला शिकवलेच. नोकरी करून शिकण्याची इच्छा तिने वडिलांकडे व्यक्त केली; परंतु तू तुझ्या ध्येयावर फोकस कर असे वडिलांनी नम्रपणे सांगितले आणि स्वतः मेहनत केली. याकरिता वाटेल ते कष्ट करायचे. मग प्रसंगी रस्त्यावर चप्पल विकणे, फळांची गाडी लावणे इत्यादी श्रम ते करू लागले. प्रयत्नांती परमेश्वर या वाक्याची प्रचिती आली. अखेर प्रयत्नांना यश आले.

मुलांनो, कुटुंबातील प्रत्येक सदस्य जेव्हा मुलांचा धीर वाढवतो, आईचा मायेचा पदर, ऊब देतो आणि बापाची दमदार छाती मुलांना पहाडासारखा आधार देते तेव्हा आकांक्षाचे एवरेस्ट मुले सर करण्यात यशस्वी होतात. आज स्नेहा लंडन येथे उत्तम नोकरी करीत आहे. आपल्या मातापित्यांची इच्छा पूर्ण करत आहे. जिद्द आणि चिकाटी अंगी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि त्याकरिता आपल्या पाल्याची स्वयंभू क्षमता ओळखून त्याला त्याच्या स्वानंदाचं आकाश मोकळं करून देणाऱ्या अशा पालकांना अर्थात सन्मा. माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब, तसेच पूनम सुभाष कुबल या तिच्या माता-पित्यांना सलाम करायलाच हवा आणि आपण प्रेरणा घ्यायला हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -