Wednesday, January 22, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलहिवाळा कसा होतो?

हिवाळा कसा होतो?

कथा – प्रा. देवबा पाटील

भारतीय विज्ञान संस्थेमधील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक होते. ते त्यांचा नातू स्वरूपसोबत दररोज सकाळी फिरायला जायचे. फिरताना स्वरूपची प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची.

“मग हिवाळा कसा होतो आजोबा?” स्वरूपने आपलीशंका विचारली.
आनंदराव पुढे म्हणाले, “तसेच ज्या सूर्याच्या विरुद्ध दूरच्या भागावर सूर्यकिरण हे तिरपे व कमी पडतात त्या भागाचे तापमान हळूहळू कमी कमी होत जाते व त्या भागात हळूहळू थंडी वाढू लागते. तेथे हिवाळा ऋतू सुरू होतो. म्हणजेच जो गोलार्ध सूर्यापासून अतिशय दूर असतो त्याला सूर्याची उष्णता खूप कमी मिळाल्याने त्या भागाचे तापमान कमी होते व तेथे वातावरणात थंडावा येऊन हिवाळा ऋतू सुरू होतो. सहा महिन्यांचा उन्हाळा असतो व सहा महिन्यांचा हिवाळा असतो.”
“हो, आजोबा; परंतु उन्हाळा असो व हिवाळा असो, ते तर आपणास सहसा तीन तीन महिनेच तर जास्त त्रास देतात.” स्वरूपने परत फिरल्यावर आपली शंका विचारली.

“प्रखर उन्हाळा व कडक हिवाळा हे तीन तीन महिन्यांचेच असतात कारण की कोणताही गोलार्ध हा सूर्याकडे वर्षातील तीन महिनेच पूर्णपणे कललेला असतो. मग हळूहळू तो गोलार्ध सूर्याच्या विरुद्ध दिशेला कलतो आणि सूर्याच्या विरुद्ध दिशेला असलेला आधीचा गोलार्ध हळूहळू सूर्याच्या दिशेला कलतो. ही कलण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागतो. या कलण्याच्या कालावधीच्या तीन महिन्यांमध्ये दोन्ही गोलार्धांत सौम्य हवामान असते. असले तरी सहा सहा महिन्यांचे उन्हाळा व हिवाळा हे मुख्य ऋतू दोनच आहेत.” आनंदरावांनी सांगितले.

“आजोबा, तुम्ही म्हणता मुख्य ऋतू दोनच आहेत; परंतु आपल्या देशात तर पावसाळा हाही मुख्य ऋतूच गणला जातो. असे मुख्य ऋतू तर तीन होतात.” स्वरूपने पुन्हा एक शंका काढली.

“ते असे असते स्वरूप,” आजोबा सांगू लागले, “ मुख्य ऋतू जरी दोनच आहेत; परंतु हिवाळ्याच्या व उन्हाळ्याच्या जोडावर आपल्या देशात बहुधा चार महिने नियमितपणे पाऊस पडतो; परंतु आपणाकडे सहसा जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. त्यामुळे या चार महिन्यांना आपण पावसाळा म्हणतो. हा पाऊस शक्यतो नैऋत्य मोसमी वा­ऱ्यांचा असतो. त्यामुळे आपल्या देशात तर पावसाळा हाही मुख्य ऋतूच गणला जातो. म्हणून तो झाला तिसरा पावसाळा ऋतू. तो सहसा चार महिन्यांचा असल्याने त्यानंतर हिवाळा व उन्हाळा हे ऋतूही प्रत्येकी चार चार महिन्यांचे राहतात. असे आपल्या देशात मुख्य ऋतू एकूण तीन होतात. पृथ्वी जर किंचितशी एका दिशेस झुकलेली नसती तर पृथ्वीवर उन्हाळा व हिवाळा असे ऋतू झालेच नसते.”

“आजोबा, उन्हाळ्यात उष्णता खूप वाढते व हिवाळ्यात तापमान खूप कमी होते. मग आपल्या शरीराचे तापमान कायम कसे राखले जाते?” स्वरूपने विचारले.

“तू फारच योग्य प्रश्न विचारला बाळा.” आजोबा सांगू लागले, “आपल्या शरीरामध्ये तापमान कायम व नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्वयंचलित यंत्रणा असते. ही यंत्रणा आपल्या शरीराचे तापमान कायम राखते. आपल्या शरीराचे तापमान सरासरी ३७ अंश सेल्सिअस असते. आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने ते तेवढेच कायम राहणे जरुरीचे असते. जेव्हा आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे तापमान खूप कमी होते तेव्हा आपल्या शरीराला कंप सुटतो म्हणजे शरीराच्या स्नायूंचे वेगाने आकुंचन व प्रसरण होते. आपले शरीर थरथर कापते म्हणजेच शरीरात हुडहुडी भरते. शरीराच्या थरथरण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे त्या थंड हवेत आपल्या शरीराचे तापमान योग्य तेवढे राखले जाते. याउलट ज्यावेळी वातावरणात उष्णता वाढते त्यावेळी आपल्याला खूप घाम येतो. बाहेरच्या हवेच्या झुळकीने या घामाची वाफ होते. घामाच्या बाष्पीभवनाच्या क्रियेत आपल्या शरीरातील उष्णता वापरली जाते. त्यामुळे आपले तापलेले शरीर थंड होते. अशा त­ऱ्हेने आपले शरीर सभोवतीच्या कमी-जास्त तापमानाला सामोरे जाते.” अशा गप्पा करत ते घरी परत आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -