Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीठाणे

पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा वापरू नये; ठाणे महापालिकेचे आवाहन

पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा वापरू नये; ठाणे महापालिकेचे आवाहन

ठाणे: पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा किंवा चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजाच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण ४५० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र, या तपासणीत एकल वापराचे सुमारे २९० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, १३ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.


पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे.


चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारिक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मल प्रणाली, जलनि:सारण बाधित होते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते. तसेच, हा धागा विद्युत वाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.



*दक्षता पथकांमार्फत तपासणी सुरू*


महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, चिनी मांजा तथा सिंथेटिक-नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. त्यासाठी, प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण ४५० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही.



*२९० किलो प्लास्टिक जप्त*


या तपासणी दरम्यान, एकल वापराचे सुमारे २९० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, १३ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.



*तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक व इमेल*


प्रतिबंधित सिंथेटिक, नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल.

Comments
Add Comment