डाॅ. पल्लवी परुळेकर-बनसोडे
पहिल्या संस्कृतीचा पहिला शिशुसंस्कार “बोरन्हाण”… तर नववर्षाच्या पावलांनी येणारा पहिला-वहिला सण म्हणजे “मकरसंक्रांत”… उत्तरायण, माघी, संक्रांती अशा अनेक नावाने ओळखला जाणारा हा सण. ‘संक्रांती’ म्हणजे हस्तांतरण. संक्रांत ही देवता प्रतिवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते अशी प्रचलित समजूत आहे. तिचे वाहन हत्ती, गाढव तर कधी डुक्कर असते. या दिवसापासून तिळातिळाने मोठा होत जाणारा दिवस आणि सकाळ प्रहरी प्रवेश करणारा सूर्य म्हणजे उत्तरायणाला प्रारंभ!
मकर संक्रांतीला अध्यात्मिक महत्त्व तर आहेच; परंतु शास्त्रीय महत्त्व देखील आहे. या दिवसाआधी रात्र मोठी व दिवस लहान असतो. मकरसंक्रांती दिवशी रात्र-दिवस समान असतो. यानंतर रात्र लहान, दिवस मोठा होत जातो. तसेच ॠतू बदलही होतो. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते आणि तिळाचा गोडवा घेऊन मकरसंक्रांत येते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी उपभोगाचा किंवा आनंदाचा क्षण म्हणून ‘भोगी’ सण साजरा करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी माहेरी येतात. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, वांग्याचे सरबरीत भरीत, सोबत भेसळ भाजी म्हणजे वांग्या-बटाट्यासोबत हिरवागार घेवडा, पापडी, हरभऱ्याचे चुटपुटीत दाणे, कोनफळ, लालचुटूक गाजर, आंबटगोड बोरे, भुईमुगाच्या आणि इतर प्रकारच्या शेंगा अशी ही भेसळ भाजी ‘भोगीची भाजी’ म्हणून ओळखली जाते. सोबत गुळाची पोळी आणि तीळगुळ याची गोडी असतेच. दक्षिण भारतात हा दिवस ‘भोगी पोंगल’ म्हणून साजरा करतात.
“तीळगुळ घ्या गोड गोड बोला, माझ्याशी कधी भांडू नका” किंवा ‘एक तीळ सातजणांनी वाटून खाल्ला’ ही आजीने सांगितलेली गोष्ट पुढच्या पिढीकडे सरकत जाते…
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मानि जन्मनि॥
देवपुराणातील हा श्लोक. मकर संक्रांतीला जी माणसे दान पुण्यकर्म करतात. किंवा जे काही दान करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रतिदानाच्या रूपात प्रत्येक जन्मात देत असतो असे म्हणतात. घरातील आणि मंदिरातील देवतांना तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, बोरे, शेंगदाणे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून दान देण्याची प्रथा आहे. बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून ‘तीळुवा’ नावाचा पदार्थ तयार करून स्नेहिजनांमध्ये वाटतात. तसेच तांदुळाच्या पिठात तूप-साखर मिसळून ‘पिष्टक’ नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटला जातो, तर हिमालयाच्या सर्व भागांत या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळले जातात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्यांना खाऊ घालतात.
दक्षिण भारतात सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगळ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी अंगणात दुधात तांदळाची खीर शिजवतात व खिरीला उकळी आली की “पोंगल ओ पोंगल” म्हणून ओरडतात. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसुर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे, तर संक्रांतीचा दुसरा दिवस ‘किंक्रांत’ म्हणून साजरा केला जातो. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले व त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस पाळला जातो. याला करी दिन म्हणूनही ओळखतात. असो.
पण अगदी आनंदाचा सोहळा म्हणजे “बोरन्हाण”.
कुरमुरेचुरमुरे, चिकटचिवट दाण्यांचे, काटेरी हलव्याचे गोड गोड झगे, गोड रसाळ ऊस, आबंटचिकट बोरं, इटुकला पिटुकला हरभरा, शेंगदाणा त्यात तीळगुळाचा डौल न्यारा… चाॅकलेटचा नुसताच तोरा… आणि या सर्वांचा बाळाच्या डोक्यावर झरा, सांडलेल्या राशीवर बाळगोपाळांचा मेळा… खेळाच्या माध्यमातून पौष्टिक पदार्थ मुलांच्या मुखी लागतील किंवा नाचत, बागडत वेचून खायचा हा गमतीशीर खेळ म्हणजे शारीरिक व्यायामाची शक्कल, शिवाय एकत्रित आनंद लुटताना मुलात मूल होऊन मोठ्यांच्या चेहऱ्यावर खुललेला तीळ… लोभस नाही का?
एक गमतीशीर तितकीच सात्त्विक परंपरा. त्या त्या ॠतूतल्या पिकपाण्याचा पहिला घास, काट्याचा हलवा म्हणजे किचकट, चिवट काम… हवेत आद्रता असताना या हलव्याला काटा फुटत नाही त्यामुळे खूप लकबीचं हे काम. शिवाय काटा नसेल तर दागिने बनविता येत नाहीत. एरव्ही निशिद्ध मानलेल्या काळ्या कपड्यावर हलव्याचे दागिने चिकटवण्याची किंवा दागिने घालण्याची प्रथा होती. अलीकडे खडी किंवा भरतकाम, पेंटिंग्ज याकडे अधिक कल दिसतो. मुकुटमणी, बाजूबंद, हार, लाॅकेट, कमरपट्टा, पैंजण म्हणजे आनंद पर्वणीच!
श्रीकृष्ण, श्रीरंग, कन्हैया, राधेय, राधाकृष्ण या अनेक नावाने प्रसिद्ध असे हलव्याच्या दागिन्यांचे सेट बाजारात उपलब्ध असतात. वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत बाळाला ‘बोरन्हाण’ घालताना, त्याच्यातल्या कणभर बदलाचे तीळ तीळ साठवताना तिळाइतकाचं गोड सस्नेह दृढ होत जातो…