मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा (जे. पी. नड्डा) यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली पण रविंद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश टाळण्यात आला. हा निर्णय झाला त्याचवेळी रविंद्र चव्हाण भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. रविंद्र चव्हाणांना संयमी भूमिका राजकीयदृष्ट्या लाभदायी ठरल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आ. श्री. @RaviDadaChavan जी यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. श्री. रवींद्र चव्हाणजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मला विश्वास आपले संघटन कौशल्य व संघटनेतील… pic.twitter.com/1BRjnLe5bq
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 11, 2025
रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. आता ते पक्षाच्या संघटानात्मक कामांचे नेतृत्व करतील. लवकरच राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करणे, निवडणूक जिंकण्यासाठी धोरण आखणे आणि ते अमलात आणणे अशी कामं रविंद्र चव्हाणांना आता प्राधान्याने करावी लागतील. तर बावनकुळे पुढील काही दिवसांत पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.