भालचंद्र ठोंबरे
एके दिवशी भगवान श्रीकृष्णाचे पुत्र प्रद्युम्न, सांब, चारुभानू, गद आणि यदु हे सर्व वनविहारासाठी उपवनात गेले. खूप खेळणे, बागडणे झाल्यावर त्यांना तहान लागली. त्यामुळे ते पाण्याच्या शोधात एका विहिरीजवळ आले. विहीर कोरडी होती मात्र त्यांना विहिरीत पाण्याऐवजी एक मोठ्या आकाराचा सरडा दिसला. सरड्याचा आकार मोठा असल्याने त्याला विहिरीतून वर येता येईना. त्यामुळे त्याची दया येऊन त्या सर्वांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
सर्वांनी घरी येऊन भगवान श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगितली. श्रीकृष्ण त्यांच्या सोबत विहिरीजवळ आले व त्यांनी आपल्या डाव्या हाताने त्या सरड्याला सहज बाहेर काढले. श्रीकृष्णाच्या स्पर्शानेच त्या सरड्याचे रूपांतर एका सुवर्णकांती व मुकुटधारी अशा पुरुषाच्या रूपात झाले. उंची, वस्त्रे, अलंकार असलेला तो पुरुष भगवान श्रीकृष्णांना हात जोडून नम्रपणे वंदन करून उभा राहिला.
भगवान श्रीकृष्ण त्रिकालज्ञानी असूनही केवळ इतरांना त्याची कथा कळावी म्हणून भगवंतांनी त्याला आपण कोण व कोणत्या कारणामुळे त्याला सरड्याचा जन्म प्राप्त झाला ते विचारले. तेव्हा आपला मुकुट श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवून तो महापुरुष म्हणाला, “हे प्रभो, मी इक्ष्वाकूचा पुत्र नृग राजा आहे. आपण सर्वज्ञानी आहात आपण सर्वच जाणता, तरी केवळ आपण विचारत आहात म्हणून मी सांगतो. त्याने सांगीतल्या कथेचा सारांश येणेप्रमाणे नृग राजा हा अत्यंत दानी व सद्गुणी म्हणून ख्याती प्राप्त होता. त्याने अगणित गाई दान केल्या होत्या व त्या सर्व त्याने न्यायोचित धनाने व सन्मार्गाने मिळविल्या होत्या. तसेच तो ज्ञानी, तपी, ऋषी, सद्गुणी, सुशील व विद्यार्जन करणाऱ्यांचा अलंकार देऊन सत्कार व गाई देऊन दानधर्म करीत असे. एके दिवशी एका तपस्वी ब्राह्मणाला दानात दिलेली गाय त्या ब्राह्मणाची नजर चुकवून पून्हा नृग राजाच्या गाईच्या कळपात मिसळली. राजाला याची कल्पना नव्हती. नित्याप्रमाणे राजाने गाई ब्राह्मणाला दान केल्या तेव्हा तीही गाय एका ब्राह्मणाला दान केली. ती गाय तो ब्राह्मण घेऊन जात असताना त्या गाईच्या मूळ मालकाला ती दिसली व त्याने ती ओळखली. ही गाय माझी आहे असे तो त्या ब्राह्मणाला म्हणाला. तेव्हा ही गाय आपणाला राजाने दान दिली असे दुसऱ्या ब्राह्मणाने उत्तर दिले.
दोघेही भांडणाचा निकाल करवून घेण्यासाठी राजाकडे आले. ज्याला गाय दिली होती तो ब्राह्मण म्हणाला “राजन, आपण ही गाय मला दिली आहे ना! व त्या दोघांची पूर्ण कहाणी ऐकून राजा गोंधळात पडला व ज्याला गाय दान केली होती त्याला म्हणाला “ मी या गाईच्या बदल्यात आपणास एक लक्ष गाई देतो ही गाय परत द्या” अशी विनंती केली. मात्र ब्राह्मणाने यास नकार दिला व आपणास तिच्या बदल्यात काहीही नको असे म्हणून तो निघून गेला, तर मूळ मालकानेही गाईच्या बदल्यात काहीही घेण्यास नकार देऊन तोही निघून गेला. कालांतराने मृत्यूनंतर यमदूतांनी राजाला यम राजाकडे नेले. यमराजाने नृगराजाला त्याने दानधर्म भरपूर केलेला असल्याने तुला तेजस्वी लोक प्राप्त होणार असे सांगून, आधी पापाचे फळ भोगणार की पुण्याचे असा पर्याय विचारला. तेव्हा राजाने पापाचे फळ प्रथम भोगण्याचा निर्णय घेतला. तेव्हा यम राजाने “जा पड’’ असे म्हणताच नृग राजा भूतलावर सरड्याच्या रूपात पडला. राजा ब्राह्मण सेवक व श्रीभगवान श्रीकृष्णांचा निस्सीम भक्त असल्याने भगवंताच्या कृपेने त्याला पूर्व जन्माचे स्मरण होते व त्यांच्या दर्शनाचा एकच ध्यास त्याचे मनी वसत असे सांगून भगवान श्रीकृष्ण व श्रीकृष्णांना वंदन करून राजा नृग त्याच्यासाठी आलेल्या विमानात बसून निजधामास गेला.
श्रीमद्भागवत पूराणातील दशम स्कंधातील ६४ व्या अध्यायात ही कथा असून भगवान श्रीकृष्ण क्षत्रियांना उपदेश करताना सांगतात की, कोणाच्याही पूर्व संमतीशिवाय त्याचे धन उपभोगिले तर ते तीन पिढ्या नष्ट करते आणि बळजबरीने उपभोग घेतला तर भोगणाऱ्याच्या दहा पिढ्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतात. तेव्हा जाणते अजाणतेपणे ही कुणाला दुखावले, तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात हे लक्षात ठेऊन आपले वर्तन असावे.