मेघना साने
वैद्य आणि गोखले ही दोन मराठी माणसे भारतातून जाऊन अमेरिकेत स्थायिक झाली होती. भारतात असताना आकाशवाणी आणि विविध भारती हा आपल्या जीवनाचा एक भाग होता आणि आता तशी हिंदी, मराठी गाणी कानावर पडत नाहीत ही रुखरुख दोघांनीही एकमेकांना बोलून दाखवली. गाणी ही आयुष्यात भावनांचे आदानप्रदान करत असतात. तसेच संगीत उत्साह वाढवते. ते आपल्या संस्कृतीचे असले, तर आपण त्याच्याशी जास्तच जोडले जातो. अतुल वैद्य १९९७ पासून अमेरिकेत होते. आता जशी एका क्लिकवर यूट्युब किंवा गुगलवर गाणी ऐकता येतात तशी प्रगती त्यावेळी झाली नव्हती. मोबाईल फोन देखील नव्हते. आपली हिंदी, मराठी गाणी ऐकवणारे एखादे रेडिओ स्टेशन असावे असे अनेकांना वाटत होते. पण ते तयार करणे फार खर्चिक होते.
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असलेले अतुल वैद्य आणि सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेले मिलिंद गोखले यांना इंटरनेट रेडिओची कल्पना सुचली आणि त्यांनी ती साकार केली. अतुल यांची पत्नी विद्या आणि मिलिंद यांची पत्नी मधुरा यांनी कार्यक्रमांच्या निर्मितीची जबाबदारी घेतली. अर्धांगिनींनी अक्षरशः अर्धी जबाबदारी घेतल्यामुळे निर्मात्यांचे काम सोपे झाले. मधुराने ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाची निर्मिती केली. हा कार्यक्रम गाण्यांचा असून एक विषय (संगीतकार, गायक, कवी, सण, ऋतू. इत्यादी) घेऊन केला जातो. सध्या मधुरा गोखले, नेत्रा जोशी आणि प्राजक्ता पटवर्धन हा कार्यक्रम करतात. तर विद्याने ‘आपली आवड’ हा श्रोत्यांनी सुचविलेल्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम तयार केला. डेट्रॉइटमधील सुभाष केळकर यांना विनंती करून मिलिंद यांनी आणखीन एक कार्यक्रम मिळवला. तो म्हणजे ‘गीतांजली’. कॅलिफोर्नियात राहणारे वैद्य आणि गोखल्यांचे मित्र आनंद घाणेकर यांनी रेडिओसाठी ‘ईप्रसारण’ हे नाव सुचवले आणि विश्वास गोडबोले यांनी रेडिओसाठी मोठ्या हौशीने “Signature Tune” करून दिली. तीन कार्यक्रम घेऊन हा रेडिओ सुरू झाला. ते साल होते २००६. तो आजतागायत सुरूच आहे. १ मे २०२४ ला या इंटरनेट रेडिओला १७ वर्षे पूर्ण झाली. मुख्य म्हणजे हा रेडियो उत्पन्न मिळविण्यासाठी चालविला जात नाही. यावर जाहिराती नसतात.
सर्वांच्या कष्टाचे फळ म्हणजे ईप्रसारण इंटरनेट रेडियो लोकप्रिय होऊ लागला. मधुरा आणि विद्या यांच्या उत्तम निवेदनामुळे अनेक लोक त्यांचे फॅन बनले. मधुराला देशादेशातून फोन येऊ लागले. ‘आपला रेडिओ अनेक देशात ऐकला जातोय आणि आपल्याला फर्माईशचे मेल येत आहेत’ हा विचार त्यांना प्रगतीकडे नेणारा होता. मराठी माणसांच्या विविध प्रकारच्या सादरीकरणासाठी एक वेगळा विभाग असावा असा विचार करून ‘मामबो कट्टा’ या विभागाची निर्मिती झाली. ई प्रसारणवरील मामबो विभागात म्हणजेच ‘माझा मराठीचा बोल’ यात मराठी माणसांना कथा, कविता असे साहित्य सादर करण्यासाठी खास वेळ दिली जाते. विविध प्रकारचे कार्यक्रम ऑडिओ स्वरूपात येथे अपलोड होतात. लवकरच ते व्हीडिओ स्वरूपातही होणार आहेत. मामबो कट्टा चालविण्याची जबाबदारी घेणारी सायली मोकाटे जोग ही निवेदिकासुद्धा खूप लोकप्रिय झालेली आहे. हल्ली मुलांसाठी ‘गंमत जंमत’ हा करमणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम अमेरिकेत जन्मलेली आणि वाढलेली मराठी मुले सादर करतात. याच्या संयोजक मोनिका मुटाटकर आहेत. अतुल वैद्य निवेदक देखील आहेत आणि ‘आपकी पसंद’ हा हिंदी गीतांचा कार्यक्रम ते स्वतः सादर करतात. या रेडिओवरील ‘गप्पागोष्टी’ या कार्यक्रमात आजवर मी अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत व मुलाखतीचे व्हीडिओ आजही या रेडिओवर पाहता येतात. कार्यक्रमाचे मेनुकार्ड वाचल्यावर प्रत्येकाच्या आवडीचे काही न काही मिळणारच हे कळले.
नुसती गाणी नव्हे तर भाषेशी संबंधित व्यावसायिकांच्या मुलाखतीचा ‘लँग्वेज टॉक्स’ हा कार्यक्रम आहे. तसेच मराठी वाचकांसाठी ‘बुक रिडर्स टॉक’ हा कार्यक्रम आहे. यात वाचक आपण वाचलेल्या पुस्तकांवर बोलतात. हे दोन्ही कार्यक्रम ललिता मराठे सादर करतात. अनेक देशांतील लोकांना मराठी कार्यक्रम ऐकण्याची तहान भागवता येते. ‘संगीत सुधा’ हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम कॅलिफोर्नियाचे विवेक दातार सादर करतात. कॅलिफोर्नियाचे मंदार कुलकर्णी यांचा ‘विश्वसंवाद’ नावाचा आणखी एक कार्यक्रम ईप्रसारणने सुरू केला आहे. या कार्यक्रमात काही आगळेवेगळे करणाऱ्या जगातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती प्रसारित होतात. वेगवेगळ्या देशातील मराठी लोकांना त्यांच्या स्थानिक वेळेनुसार आपला रेडिओ ऐकता यावा म्हणून वैद्य यांनी एक तोडगा काढला. या तोडग्यानुसार सर्वच्या सर्व कार्यक्रम सोमवारी ईप्रसारण.कॉम (www.eprasaran.com) या वेबसाईटवर अपलोड करून ठेवले जातात. ते आठवडाभर तेथेच राहतात. त्यामुळे लिंकवर जाऊन कोणीही केव्हाही कार्यक्रम ऐकू शकतात. ही सोय झाल्याने १३० देशांतील हिंदी, मराठी माणसे जोडली गेली. उत्तम निवेदनामुळे कार्यक्रम श्रवणीय होत गेले. ईप्रसारणच्या माध्यमातून अनेक देशांत मराठी व हिंदी भाषा प्रवाहित राहत आहे. आता या रेडिओवरील व्हीडिओ कार्यक्रम मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यावरसुद्धा पाहता येतात.
अमेरिकेतील अतुल वैद्य व विद्या वैद्य हे दाम्पत्य जगभरातील मराठी लोकांसाठी कार्यक्रम प्रसारित करतात ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे नाही का?
[email protected]