रवींद्र तांबे
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना जानेवारी महिन्याचे दोन आठवडे कधी गेले हे समजले सुद्धा नाही आणि दोन आठवड्याने फेब्रुवारी महिना सुरू होईल, तेव्हा फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरू होतील. म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार असून दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तेव्हा बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्नपत्रिका सोडविल्या असतील. मात्र अंतिम परीक्षेचा पेपर सोडविताना विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण त्यांची ओळख या परीक्षेच्या गुणांमुळे होत असते. तेव्हा कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांनी पेपर सोडवताना घाई न करता दिलेली वेळ व विचारलेले प्रश्न यांची सांगड घालून त्यांची उत्तरे बिनचूक लिहिणे आवश्यक आहे. यासाठी आपण वर्षभर अभ्यास करत असतो. तेव्हा आता अंतिम परीक्षेत किरकोळ चुका करून चालणार नाही.
विद्यालयामध्ये प्रत्येक विषयाचे अध्यापक प्रश्नपत्रिका कशी सोडवावी या विषयी मार्गदर्शन करीत असले तरी काही विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेविषयी चिंता वाटत असते. जर संबंधित विषयाचा अभ्यास झाला असेल तर विद्यार्थ्यांना चिंतेचे मुळीच कारण नाही. जसजशी परीक्षेची तारीख जवळ येते तसतसे दडपण वाढते याची सुद्धा कल्पना सर्वांना असते. मात्र मनावर दडपण न घेता बिनधास्तपणे परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा विचार करता विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. तेव्हा पेपर सोडवताना विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे.
या दोन परीक्षांवर विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरत असते. ज्या दिवशी पेपर असेल त्या वेळच्या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल. पेपरची वेळ असेल त्या अगोदर किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर गेले पाहिजे. आपली आसन व्यवस्था पाहावी तसेच काही सूचना दिल्या असतील तर त्या वाचाव्यात. जर परीक्षा केंद्रावर उशिरा गेलात तर विद्यार्थी चलबिचल होतो. त्याला आयत्या वेळी काहीच सुचत नाही. त्यामुळे तो टेन्शनमध्ये येऊ शकतो. हे टाळण्यासाठी परीक्षेच्या वेळेच्या अगोदर परीक्षा केंद्रावर यावे. अंतिम परीक्षेची प्रत्येकाला चिंता वाटत असली तरी या कालावधीत आपला विश्वास स्वत:च वाढवला पाहिजे. बऱ्याचवेळा आपला अभ्यास झालेला असून सुद्धा प्रश्न कसे विचारले जातील? मला उत्तर लिहिता येईल का? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होऊ शकतात. तेव्हा असे प्रश्न निर्माण न करता आपलं डोकं शांत ठेवून मनमोकळेपणानं राहावं. परीक्षा केंद्रावरील ज्या रूममध्ये बैठक व्यवस्था केलेली असेल त्याठिकाणी शांत जाऊन बसणे. वेळेनुसार उत्तर पत्रिका पर्यवेक्षकांनी आपल्या हातात दिल्यावर आवश्यक माहिती खाडाखोड न करता अचूक भरावी. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षा क्रमांक अचूक लिहावा. तसेच पेन्सिलने प्रत्येक पानावर समास आखून घ्यावा. यामुळे उत्तरपत्रिका आकर्षित दिसते.
प्रश्नपत्रिका आपल्या हातात आल्यावर आपली वेळ सुरू होते. काही विद्यार्थी प्रश्नपत्रिका वाचनात वेळ घालवितात. नंतर वेळ अपुरी पडली अशी बोंबाबोंब करतात. त्यामुळे प्रथम पूर्ण प्रश्नपत्रिकेवर नजर फिरवावी. नंतर जे प्रश्न आपल्याला सोपे वाटतात ते अगोदर सोडवावे, मात्र ते सोडवीत असताना उजवीकडील गुणांकडे लक्ष द्यावा. प्रत्येक प्रश्न स्वतंत्र पानावर सोडवावा. उपप्रश्नांची उत्तरे एकाखाली एक लिहावीत. दोन प्रश्नांच्या उत्तरांमध्ये एक ओळ सोडावी. नंतर उत्तरे क्रमशः लिहिण्यात यावीत. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर त्यात वेळ घालवू नये. जो प्रश्न कठीण वाटेल तो प्रश्न शेवटी सोडविण्यात यावा. किंवा अशा प्रश्नाला पर्यायी प्रश्न आहेत का हे पाहावे. नंतर आपल्या मनाने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आधी प्रश्न समजून घ्यावा लागेल. पेपर लिहिताना मुख्य प्रश्न व उपप्रश्न यांच्या क्रमानुसार क्रमांक असतील ते लिहावेत. उत्तर एक क्रमांक वेगळा असेल तर पूर्ण गुण दिले जात नाहीत. तेव्हा क्रमांक लिहून क्रमांकाचे उत्तर लिहावे. त्यामध्ये किती शब्दांत विचारले असेल किंवा किती ओळीमध्ये विचारले असेल तर त्या पद्धतीने उत्तर सुटसुटीत व मुद्देसूद लिहावीत. उत्तर लिहिताना घाई करू नये. प्रत्येक प्रश्नाला वेळ ठरवावा त्यानुसार त्या प्रश्नाला वेळ द्यावा. म्हणजे पूर्ण पेपर सोडवून होईल. त्यासाठी परीक्षा होईपर्यंत अधूनमधून अभ्यासाबरोबर घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी. त्यामुळे अंदाज येऊन वार्षिक परीक्षेला अधिक जोमाने प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. त्यासाठी अक्षर वळणदार व मोठे तसेच दोन शब्दामध्ये योग्य अंतर असावे. जास्त खाडाखोड, शाईचे डाग, अक्षरे डबल गिरवणे अक्षरावर आडवी रेघ मारणे अशा गोष्टी टाळाव्यात. असे असल्यास शिक्षकही उत्साहाने पेपर तपासण्यास टाळाटाळ करतात. याचा परिणाम विद्यार्थ्याला कमी गुण मिळू शकतात. तेव्हा अशा चुका विद्यार्थ्यांनी करू नयेत. अक्षर कसे आहे यापेक्षा अचूक उत्तर लिहिले आहे का हे महत्त्वाचे आहे. तेव्हा केवळ सुंदर अक्षराकडे जाऊ नका प्रश्नाला अनुसरून उत्तर अपेक्षित असते. अशा गोष्टी टाळून विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेचा पेपर सोडवावा.