शिर्डी : विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार व आजपर्यंतच्या वाटचालीत साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान व दीड कोटी सदस्यांची नोंदणी आणि मजबूत संघटन पर्व याकरिता रविवार, दि. १२ रोजी शिर्डी येथे भाजपाचे ऐतिहासिक महाअधिवेशन संपन्न होत आहे. या अधिवेशनास राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे मंत्री गण राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून १५ हजार सदस्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
दरम्यान शिर्डी येथील हॉटेल सेंट लॉरेन्स येथे महा अधिवेशना संदर्भात माहिती देण्याकरिता महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे केशव उपाध्ये, माजी खा. डॉ सुजय विखे पाटील, भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी, विक्रांत पाटील, राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, राजेंद्र गोंदकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की, १५ हजार सदस्यांची उपस्थिती लाभणाऱ्या या अधिवेशनाची अत्यंत चांगली व्यवस्था व अप्रतिम नियोजन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खा. डॉ सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली असल्यामुळे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल.
रविवार रोजी सकाळी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पहिल्या सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण होईल. तदनंतर दुपारच्या सत्रात अधिवेशनाच्या समापन प्रसंगी पूर्व सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थितांना संबोधित करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होईल. संघटन पर्वच्या माध्यमातून व महायुती अभेद्य ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुद्धा महायुती भरभक्कम यश संपादन करेल असा विश्वास यावेळी मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त केला.