मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा २८ डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवले होते. यात एका मजुराचा मृत्यू तर, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला होता. तसेच या अपघातात उर्मिला आणि तिच्या ड्रायव्हरलाही गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर उर्मिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता उर्मिला रुग्णालयातून घरी परतली असून तिने सोशल मिडियावर एक फोटोसह पोस्ट शेअर करत माहिती दिली. तसेच त्या दिवशी काय घडलं याबाबतची माहिती देखील तिने या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
२८ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. कांदिवली पोईसर मेट्रो स्टेशन परिसरामध्ये हा अपघात झाला. येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोचं काम सुरू होते. तिथे मोठी यंत्र, सामान आणि जेसीबी लोडर/एक्सकॅव्हेटर वाहने उभी केलेली होती. माझा ड्रायव्हर कार चालवत होता. त्यावेळी अचानक वळण आलं आणि हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो होतो. त्यानंतर आम्हाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती पोस्टच्या माध्यमातून तिने दिली.
View this post on Instagram
मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे आभार मानते, त्यांनी तात्काळ आम्हाला मदत केली. मी आता ठणठणीत होऊन रुग्णालयातून घरी परतली आहे. पण माझ्या पाठीला आणि बरगड्यांना अद्याप त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला किमान 4 आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. माझ्या प्रकृतीसाठी आणि मी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली त्याचे मी आभार मानते. तसेच मी देवाचेही आणि पोलिसांचे देखील आभार मानते, असेही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
या अपघातानंतर पोलिसांनी माझ्या ड्रायव्हर विरोधात एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.