लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचा चौखूर उधळणारा वारू रोखण्यासाठी भाजपा विरोधकांनी एकत्र येत, गाजावाजा करत इंडिया आघाडीची स्थापना केली. अर्थात राजकीय स्वार्थांसाठी ही मंडळी एकत्र आली होती. या लोकांकडे कोणतेही वैचारिक अधिष्ठान नव्हते, समान कार्यक्रम नव्हते, विचारांमध्ये एकवाक्यता नव्हती, ध्येयधोरणे नव्हती. केवळ भाजपाविरोध या एकमेव धाग्यामध्ये लोकसभा निवडणुकीपुरती एकत्र आलेली ही मंडळी स्वार्थ संपताच निघून जाणार होती, हे निश्चित होते. कारण लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी ही मंडळी एकत्र आली होती. यामध्ये कोणी मित्र नव्हते अथवा कोणाची कोणाशी वैचारिक जवळीकही नव्हती. प्रत्येकजण एकेकाळी आपापल्या राज्यात मातब्बर होता. २०१४ नंतर केंद्रामध्ये तसेच विविध राज्यांमध्ये भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुसंडी मारल्यावर त्या त्या राज्यातील प्रस्थापितांना जनाधार गमवावा लागला. राज्यातील सत्ता गेली, विरोधी पक्षांमध्ये बसण्याची वेळ आली.
२०१४ पाठोपाठ २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाला स्वबळावर सरकार स्थापन करता येईल, इतके स्पष्ट बहुमत मिळाले. काँग्रेसला तर विरोधी पक्षनेता मिळविण्याइतकेही संख्याबळ प्राप्त झाले नाही. २०१४ व त्यानंतर झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील इतिहास पाहता २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही आपला पालापाचोळा उडणार असल्याची खात्री पटल्याने लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधातील मंडळी एकत्र आली व त्यातूनच इंडिया आघाडी देशाच्या राजकारणात जन्माला आली.
लोकसभा निवडणूक एकत्र लढणे व भाजपाला सत्ता मिळवू न देणे हा एककलमी कार्यक्रम राबविण्यासाठी इंडिया आघाडी कार्यरत झाली. मुळातच इंडिया आघाडीच्या वाटचालीला स्थापनेपूर्वीपासूनच ग्रहण लागले होते. ज्यांच्या संकल्पनेतून इंडिया आघाडी जन्माला आली, ते नितीशकुमारच लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच काही महिने भाजपामध्ये सामील झाले. कर्णधारच मालिका सुरू होण्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघाचा स्टार फलंदाज अथवा गोलंदाज बनावा, तशीच काही परिस्थिती नितीशकुमारांच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीअगोदर झाली. इंडिया आघाडीमध्ये भाजपाविरोधक एकत्र आले तरी पश्चिम बंगालची तृणमूल काँग्रेस, उत्तर प्रदेशातील सपा, दिल्ली-पंजाबमधील आम आदमी पार्टी, बिहारमधील लालू प्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल यांचे काँग्रेसशी फारसे सख्य नव्हते. इंडिया आघाडीत हे सर्व घटक काँग्रेससोबत असले तरी काँग्रेसशी ते चार हात अंतर राखूनच होते, हे लोकसभा निवडणुकीदरम्यानच पाहावयास मिळाले होते.
लोकसभा निवडणुकीतील जागावाटपामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सपापुढे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसपुढे, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षापुढे, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलापुढे, पंजाब आणि दिल्लीमध्ये आप पक्षापुढे काँग्रेसला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला सत्ता मिळविता आली नसली तरी भाजपाला स्वबळावर सत्ता मिळणार नाही, इतपत यश इंडिया आघाडीला मिळाले होते. भाजपाला सत्ता मिळविण्यासाठी नितीशकुमारांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमच्या आधाराची गरज घ्यावी लागली. २०१९ ला विरोधी पक्षनेतेपदही मिळविण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसला लोकसभेत शतकी मजल मारता आली. लोकसभा सभागृहात विरोधी पक्षाला अस्तित्व दाखविण्याइतपत सन्मानजनक संख्याबळ गाठता आले, हे इंडिया आघाडीचे यश होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजण्यास सुरुवात झाली होती. त्या त्या राज्यांमध्ये मातब्बर असणाऱ्या इंडिया आघाडीला घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसशी युती करण्यासाठी कोणतेही स्वारस्य नव्हते. किंबहुना त्यांना काँग्रेससोबत विधानसभा निवडणुका लढवायच्याच नव्हत्या. मुळात महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे फारसे अस्तित्व नव्हतेच. इंडिया आघाडीतील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस,उद्धव ठाकरेंची शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी प्रभावी होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा व मित्रपक्षांच्या महायुतीला महाराष्ट्रात रोखून धरले होते; परंतु लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव झाला. महायुतीने २८८ विधानसभा मतदारसंघांमधील २३० हून अधिक जागांवर विजयी मुसंडी मारली होती.
महाविकास आघाडीला अवघ्या ४५ विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळाला होता. झारखंड व अन्य राज्यातही काँग्रेसच्या पदरी पराभवाची नामुष्की आली. काँग्रेसची त्या त्या राज्यांमध्ये होत असलेली पिछेहाट पाहिल्यावर इंडिया आघाडीमधील अन्य पक्षांनी काँग्रेसविरोधी सूर उघडपणे आळविण्यास सुरुवात केली. दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आप पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करत काँग्रेसविरोधी बिगुल वाजविले. त्यापूर्वी काही दिवस अगोदरच इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची भाषा करत काँग्रेसविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली होती. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे पुत्र व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही काँग्रेसविरोधी वक्तव्य करत केजरीवाल यांच्या भूमिकेचे समर्थंन केले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केजरीवाल यांच्या भूमिकेचे समर्थंन करताना दिल्लीच्या निवडणुकांमध्ये केजरीवाल यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. महाराष्ट्रातही शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या गाठीभेटीमुळे भाजपा व त्यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाले. इंडिया आघाडीचे खऱ्या अर्थाने तीनतेरा वाजण्यास आता मागील काही महिन्यांपासून सुरुवात झाली. इंडिया आघाडीतील अनेक पक्ष काँग्रेसविरोधी सूर आळवत इंडिया आघाडीतील काँग्रेसचे नेतृत्व अमान्य करू लागलेत. इंडिया आघाडीत काँग्रेस एकाकी पडू लागली. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसविरहित इंडिया आघाडी अस्तित्वात राहिली तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही.