
पाच जिल्ह्यांंतील सेवा बंद
भाईंदर : रस्ता तेथे एसटी (ST Bus) या ब्रीद वाक्यानुसार ग्रामीण भागात लालपरी अशी ओळख असलेली राज्यातील गावोगावी सेवा देणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बससेवा भाईंदरमधून राज्यातील पाच जिल्ह्यांत जात होती. महामंडळाने हे मार्ग काही कालावधीत टप्याटप्प्याने बंद केले त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याने ती पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

मुंबई : ग्लॅमरस अभिनेत्री अनुषा दांडेकरचा (Anusha Dandekar) आज वाढदिवस असून आजच्या दिवशीच नृत्यदिग्दर्शक-दिग्दर्शिका फराह खानसह (Farah Khan) चित्रपट ...
ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर हे शहर झपाट्याने वाढत असल्याने तसेच राज्यातील अनेक भागातून नागरिक शहरात स्थलांतरित झाल्याने महामंडळाने भाईंदर पश्चिम येथील डेपोतून महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, कणकवली, श्रीवर्धन, पुणे येथील स्वारगेट, कवठेमहाकाळ, चोपडा, चंदगड, तुळजापूर अशा अनेक विविध गावात बससेवा सुरू केली होती. कालांतराने एक-एक करत या सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवासी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील नागरिकांना महाराष्ट्राच्या विविध शहरामध्ये जाण्यासाठी नाईलाजाने बोरिवली, ठाणे किंवा मुंबई सेंट्रल येथे जावे लागत आहे. या डेपोपर्यंत पोहचणे खूप गैरसोयीचे तसेच त्रासाचे आहे. शहरातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या बंद केलेल्या एस.टी. सेवा पूर्ववत चालू कराव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेने वेळोवेळी केली आहे. मीरा-भाईंदर शहरातील या ज्वलंत समस्याचे लवकरात लवकर निराकरण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित करून नागरिकांची गैरसोय दूर करावी असे निवेदन माजी नगरसेवक अजित पाटील यांनी सरनाईक यांना दिले आहे.