केंद्रीय मंत्री अमित शहा यांची विखेनी घेतली सदिच्छा भेट!
लोणी (प्रतिनिधी) – केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकार मध्ये मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर विखे पाटील यांची पहीलीच भेट होती.शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. डॉ सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरीकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय व कार्यान्वित झालेल्या योजनांची माहिती मंत्री विखे पाटील यांनी भेटीत झालेल्या चर्चे दरम्यान दिली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहिल्यानगर मधील दहा विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शहा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली.या भेटी दरम्यान डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.
महायुती सरकार मध्ये पुन्हा मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार मानले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.
शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देवून आजच केंद्रीय सुरक्षा दलाचे मनुष्यबळ उपलब्ध करून देवून पुढील काही दिवसांत नाइट लँडिंग सुविधा सुरू करण्याची ग्वाही मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.