श्री गुरुगाथा – अरविन्द दोडे
आपल्या अध्यात्मविद्येत अनेक वर्षांपासून गुरू-शिष्य परंपरा आहे. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अभ्यास करतानाही गुरूचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगातील असंख्य ज्ञानवंत हे आपापल्या क्षेत्रात पंथ, संप्रदाय शिष्यांना ‘तयार’ करतात आणि ही परंपरा सुरू राहते, त्याबाबत…
ब्रम्ह मुहूर्तावर करा या मंत्राचा जप, लक्ष्मी माता होईल प्रसन्न
आजपासून ‘श्री गुरुगाथा’ हे आध्यात्मिक सदर आरंभ करीत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी म्हटलंय, ‘आदिनाथ गुरू | सकळ सिद्धांचा ॥’ कोण आदिनाथ? गुरू म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? तो कुठं, कधी भेटतो. त्याला कसं ओळखावं? सद्गुरू भेटीची तळमळ कशी असते? सद्शिष्य कसं व्हावं? गुरूची लक्षणं कोणती? माता, पिता, शिक्षक हे पहिले गुरू. काही ‘विद्या’ गुरू काही ‘ज्ञान’ गुरू! शिवाय मंत्रगुरू, दीक्षागुरू, नियतगुरू… असेही असतात गुरू…
त्यांच्या कथा, ओव्या, अभंग हे श्रद्धावंताचं आत्मबळ वाढवतात, म्हणून या भक्तीच्या वाटेवरील प्रवास कैवल्यानंद मिळावा म्हणून!
अपराधास्तव गुरुनाथा |
जरी दंडा धरीसी यथार्था |
तरी आम्ही गाऊनी गाथा |
तव चरणी नमवू माथा ॥
गुरू! हा शब्द ऐकताच भाविक भक्त नम्रपणे होतो नतमस्तक. प्रापंचिक ज्ञान देतो तो गुरू आणि आध्यात्मिक ज्ञान देतो तो सद्गुरू. कल्याण करतो तो गुरू. मुक्तीचा मार्ग दाखवतो तो सद्गुरू. कृष्ण, हनुमान, नारद, वेदव्यास, शुकदेव ही काही नावं ठाऊक आहेतच. अशा अनेक सद्गुरूंची ही गाथा! माणूस आपल्या आवडीनुसार निवडतो गुरू. गरजेनुसार शोधतो सद्गुरू.
समजूतदारपणाची वैराग्यमाया म्हणजे सद्गुरू. तोच विवेकसूत्राचा आधार. भक्ताच्या भविष्याचं आकाश. डोळसपणाचा पक्षी. सुकृततरुचं फूल. ईश्वराचं मनोगत म्हणजे गुरुवचन. तो सांगतो स्वधर्माची जगरहाटी. तोच असतो प्रत्याहाराचं तीर्थ. तोच पटवून देतो त्रिभुवनींची दु:खं आणि सुखांची नश्वरता. माणूस संदेहाचे दागिने घालतो. चारचौघांत मिरवतो. विद्वान, बुद्धिमान म्हणवून घेतो, पण दृष्टादृष्टांचा सखा शोधत नाही. जो आनंदाचा नक्षत्रांचा सडा पाडतो आपल्या अंतरीच्या
अंगणात. अनाहत नादानं धुंद करतो. विकल्पांचे काटे काढतो!
गुरू संत असतात. साधू असतात, तसंच साधुसंत हे गुरू असतात. एक तपोनिष्ठ, सत्यवादी गृहस्थसुद्धा गुरू म्हणून पूजला जातो. ‘तपस्वी सत्यवादी च गृहस्थो गुरुरुच्यते|’असं अध्यात्मवचन आहे. भगवंतानं ‘गीते’त म्हटलंय, गुरूमध्ये दोन गुण असणं आवश्यक आहे. एक आध्यात्मिक शास्त्रांचं परिपूर्ण ज्ञान आणि दुसरा गुण अनंतस्वरूप परमार्थ, सत्याचा अनुभव, त्यात दृढ स्थिती. ‘ज्ञानेन’ आणि ‘तत्त्वदर्शिन’ या शब्दात वर्णन केलंय. अध्याय ४/३४ यावर भाष्य करताना माउली म्हणतात,
ते ज्ञान पै गा बरवे |
जरी मनी आथी आणावे |
तरी संता या भजावे |
सर्वस्वेशी ॥ ४.१६५॥
तरी तनुमनुजीवे |
चरणासी लागावे |
आणि अगर्वता करावे |
दास्य सकळ ॥ ४.१६७॥
ऐसे ज्ञानप्रकाशे पाहेल |
तै मोहांधकारु जाईल |
जै गुरुकृपा होईल |
पार्था गा ॥ ४.१७१॥
भगवंत म्हणतात, आचार्यांकडे जाऊन त्यांना प्रणिपात करणं, प्रश्न करणं, सेवा करणं अशा रीतीनं ते ज्ञान प्राप्त करून घे. अर्जुना, ज्ञानसंपन्न आणि अनुभवी आचार्य त्या ज्ञानाचा तुला उपदेश करतील. या श्लोकाचा विस्तार माउली करतात. ते उत्तम ज्ञान जर लाभावं असं मनात असेल तर या संतांना सर्वस्वेकरून तू भजावेस. कारण ते ज्ञानाचं घर आहेत. त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. तन-मन-जीवानं त्यांच्या चरणी लागावंस, अभिमान सोडून!
जनसामान्यांना भक्तीच्या मार्गावर प्रश्न पडतो, ‘गुरू शोधावा कुठं?’ अनेक वर्षं भक्ती करूनही गुरू भेटत का नाही? आपल्या साधनेत काही दोष आहेत का? तसे पुष्कळ दिसतात, पण त्यांना गुरू मानावं का? असे एक ना दोन, अनेक प्रश्न सतत सतावतात. अशा वेळी काय करावं? उपाय एकच – अभ्यास करणं. पुन्हा प्रश्न – तो कसा करावा? प्रश्नांच्या महाजालातून बाहेर पडावं. स्वत: सद्शिष्य होण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरू शोधत येतो. स्वत: भेटतो. कारण तो योग्य शिष्याच्या शोधात भ्रमंती करत असतो. सद्शिष्याला आपलं ज्ञानसर्वस्व देऊन त्याला ‘मुक्त’ व्हायचं असतं!
‘अरे पार्था! ज्या वेळी श्रीगुरुकृपा होईल, त्या वेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल, मग मोहरूपी अंधकार नाहीसा होईल.’ हा उपदेश अर्जुनाच्या निमित्तानं सामान्य जनांना केलाय. असाच मनोबोध नामदेव, तुकाराम, एकनाथ आदी संतकवींनी केलाय. शिवाय समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोधा’त सांगितलंय. कबीर, मीरा, तुलसीदास, सूरदास अशा अमराठी संतांच्या काव्यातही गुरूमहिमा वाचायला मिळतो. त्या साऱ्या महानुभावांचा परिचय आणि परामर्श आपण घेणार आहोत.
आदिनाथ शंकर हे सद्गुरू आणि पार्वती यांचा सिद्धसाधक स्वरूपातील संवाद म्हणजे आनंदाचा मूलमंत्र आहे. ‘स्कंदपुराणा’त उत्तरखंडात गुरु-शिष्य संवाद आहे. त्याचा उपयोग ‘श्रीगुरुगाथे’साठी संदर्भ म्हणून झाला तर ही गाथा अधिक साधी, सोपी आणि सुबोध होईल अशी श्रद्धा आहे. ‘काय म्या पामरे| बोलावी उत्तरे?|’ हे जे काही आहे, ‘सखा भगवंत| वाचा त्याची॥’ एवढंच!
दुसऱ्या लेखांकापासून मुळारंभ. तोपर्यंत…
जय गुरुदेव!