Saturday, January 18, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखप्रकल्पांना विरोध नको, रोजगारावर बोला...!

प्रकल्पांना विरोध नको, रोजगारावर बोला…!

कोकणात उद्योग, प्रकल्प आले की सोबतच लक्ष्मीही येईल एवढं निश्चित! मात्र ते यायला हवे. कोकणात कोणताही प्रकल्प केवळ विरोधामुळे उभा राहू शकला नाही. कोकणातील तरुण रोजगारासाठी सिंधुदुर्ग जवळच्या गोवा राज्यात जातो आणि रायगड, रत्नागिरीमधला तरुण मुंबईत पोटा-पाण्यासाठी धडपडतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यातील तरुण गोवा राज्यात नोकरी करत आहे. गोवा राज्यातील खासगी बड्या बँकांमधून कोकणातील तरुणांचा मोठा भरणा आहे. कोकणातील ग्रामीण भागातील अनेक घरं बंद आहेत. त्याचं कारणही हेच आहे. दुसरं काहीही नाही. अशी ही विचित्र स्थिती आहे.

माझे कोकण – संतोष वायंगणकर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. सत्ता स्थापनही झाली. राज्य कारभाराचा गाढाही सुरू झाला. सत्ताधारी काय करणार याकडेच जनतेचे अपेक्षेने डोळे लागून राहिले आहेत. विरोधक काय बोलतात, टीका कोणती करतात याकडे फारसे लक्ष देण्याची आता आवश्यकताही नाही. याचे कारण आतापर्यंत फक्त विरोध होत राहिला. यामुळे कोकणात रोजगाराच्या कोणत्याही संधी निर्माणच होऊ शकल्या नाहीत. परिणामी कोकणात कोणताही प्रकल्प आणला नाही, नव्हे तर प्रकल्पच येऊ दिला नाही. यामुळे साहजिकच कोकणात पदवी, इंजिनीअरिंग आदी क्षेत्रात पदवी घेतलेल्या तरुणांच्या बेकारीची संख्या कमालीची वाढली. कोकणात कोणताही प्रकल्प केवळ विरोधामुळे उभा राहू शकला नाही. कोकणातील तरुण रोजगारासाठी सिंधुदुर्ग जवळच्या गोवा राज्यात जातो आणि रायगड, रत्नागिरीमधला तरुण मुंबईत पोटा-पाण्यासाठी धडपडतोय. अशी ही विचित्र स्थिती आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यातील तरुण गोवा राज्यात नोकरी करत आहेत. गोवा राज्यातील खासगी बड्या बँकांमधून कोकणातील तरुणांचा मोठा भरणा आहे. गोवा राज्यातील औषध कंपन्या, प्रिंटिंग प्रेस यामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक सिंधुदुर्गातील तरुण कार्यरत आहेत. वृत्तपत्र क्षेत्रातील एका संपादक मित्राने सांगितले, सिंधुदुर्गातील प्रिंटिंग प्रेसमधल्या तरुणांनी ठरवले, तर अख्ख्या गोवा राज्यात एकाही वृत्तपत्राची छपाई होणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण या प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला आहेत. गोवा राज्यातील बँकांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. सातार्डे ब्रिज शेजारी हजारो मोटारसायकल दिवसभर उभ्या असतात. त्या गाड्यांच्या संख्येवरून सहज लक्षात येऊ शकेल की, गोवा राज्यात आपल्याकडील किती हजार तरुण काम करीत आहेत. अनेक तरुण अनिच्छेने मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरात नोकरी, व्यवसायासाठी कार्यरत आहेत. कोकणातील ग्रामीण भागातील अनेक घरं बंद आहेत. त्याचं कारणही हेच आहे. दुसरे काहीही नाही.

कोकणातील तरुणांना कोकणात रोजगार उपलब्ध झाला, तर बाहेर कुठेही जाण्याची त्या तरुणांची मानसिकताच नाही. यामुळे कोणत्याही स्थितीत कोकणात नव-नवीन प्रकल्प येण्याची आवश्यकता आहे. उद्योगांची उभारणी झाली पाहिजे. आज कोणताही प्रकल्प कोकणात येतो म्हटला तरीही त्याला विरोध हा ठरलेलाच आहे. विरोध करणाऱ्यांना राजकारण करायचे असते. त्यांना कोकणातील जनतेच भल-बुरं काही समजून घ्यायचं नसते. त्यामुळे विरोध करणारे हे करतच राहणार. विरोधक विचारी झाले नाहीत तरीही चालेल; परंतु कोणत्याही स्थितीत कोकणातील जनतेने विचारी होण्याची आवश्यकता आहे. सकारात्मक विचाराने कोकणात प्रकल्प यायला पाहिजेत. पर्यटन व्यवसायातून रोजगाराची निर्मिती होईलच; परंतु त्याचबरोबर कोकणात उद्योगही उभे राहिले पाहिजेत. लाख-दोन लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणारे प्रकल्प झाले पाहिजेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे घडले पाहिजे. पर्यटन व्यवसायातही एका मर्यादेपलीकडे तिथेही व्यवसायाला निश्चितच मर्यादा आहेत हा विचार करून कोकणात उद्योगांच्या उभारणीला प्राधान्यक्रम असला पाहिजे. आता जनतेनेच उद्योगांसाठी, प्रकल्पांसाठी आग्रही असण्याची आवश्यकता आहे. विरोधाचे काळे झेंडे आणखी किती वर्षे दाखवत राहणार. विरोधाच्या या काळ्या झेंड्यांनी एका तरुण पिढीचे भविष्यच काळवंडलय. याचा आता तरी विचार करा.

कोकणातील गावातला तरुण कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत म्हणून शहरांकडे जात आहे. यामुळे गावेच्या-गावे ओस पडली आहेत. गावातील घरातून अखंड वाडी-वस्तीत चार-दोन म्हातारी माणसं केवळ मरता येत नाहीत म्हणून जगत असणारी दिसतील. गावातील असंख्य घरातील वयोवृद्धांशी गावात बोलायला माणसं नाहीत. त्यात जवळचा नातेवाईक, स्नेही किंवा ओळखीचा कोणी दिसला तर त्याने आपल्याशी खूप बोलावं याच अपेक्षेने ते वयोवृद्ध दिसतात. घरातील एकटेपणा या वृद्धांना सतावतो. मुलगा, सून अमेरिकेला परदेशात त्याचा जरूर अभिमान त्यांच्या उरात असतो; परंतु आपला लेक आपल्यासोबत नाही. या खंतावलेल्या मनाने त्यांच्या डोळ्याच्या कडा कधीच्याच ओलावलेल्या असतात. डोळ्यातलं पाणी वार्धक्याने सुरकुतलेल्या चेहऱ्यावर कधी येत ते त्या थरथरणाऱ्यांना कळतही नाही असं हे सारं भीषण वास्तव आज कोकणात आहे. यामुळेच उद्योग, प्रकल्प आले की सोबतच लक्ष्मीही येईल एवढं निश्चित…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -